अधिक मास विशेष लेखमाला
श्री विष्णु पुराण अंश-३ (भाग -१)
पहिल्या सात मन्वंतरांतील
मनू, इंद्र, देव, सप्तर्षी व मनूपुत्रांचे वर्णन
श्री विष्णु पुराणच्या अंश-१ आणि २ मध्ये आपण पृथ्वी, समुद्र, ग्रहनक्षत्रे, देव, ऋषी, चार जीवखाणी, ध्रुव आणि प्रल्हाद यांची चरित्रे पहिली. आता श्रीविष्णुपुराणच्या अंश – ३ आपण चौदा मन्वंतरांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पराशरांनी सांगण्यास आरंभ गेला. ते म्हणाले, “सर्वांत पहिला मनू ‘स्वायंभुव’ असून त्याच्यानंतर क्रमाने स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत व चाक्षुष असे पाच मिळून सहा मनू होऊन गेले आहेत. सांप्रत सातवे मन्वंतर चालू असून सूर्यपुत्र ‘वैवस्वत’ हा या मन्वंतराचा स्वामी आहे.
स्वायंभुव मन्वंतरातील देव, ऋषी वगैरे याआधीच सांगून झाले आहेत. आता पुढे सांगतो. स्वारोचिषांत देव ‘पारावत’ व ‘तुषितगण’ होते. विपश्चित् हा इंद्र असून, उर्ज, स्तंभ, प्राण, वात, वृषभ, निरय आणि परीवान् हे सात ऋषी होते. चैत्र, किंपुरुष वगैरे मनूपुत्र होते.
तिसऱ्या मन्वंतराचा स्वामी ‘उत्तम’ असून मनू व सुशांति हे इंद्र होते. सुधाम, सत्य, जप, प्रतर्दन आणि वशवर्ती असे देवसमूह होते, वसिष्ठांचे सात पुत्र सप्तर्षी होते, तसेच अज, परशु, दीप्त वगैरे मनूपुत्र होते.
चवथ्या तामस मन्वंतरात सुपास, हरि, सत्य व सुधि असे चार प्रकारचे देव होते. पुन्हा त्या प्रत्येक प्रकारात २७-२७ पोटजाती होत्या. शिबि हा इंद्र होता. ज्योतिर्धाम, पृथु, काव्य, चैत्र, अग्नि, बनक आणि पीवर असे सात ऋषी होते. तसेच नर, ख्याति, केतुरूप, जानुजंघ इत्यादि मनूपुत्र होते.
पाचव्या मन्वंतरामध्ये रैवत’ हा मनू, तर बिभु हा इंद्र झाला. देवांमध्ये अमिताभ, भूतस्य, बैकुंठ व सुमिधा हे चौघे व त्या प्रत्येकाचे १४-१४ गण होते. सप्तर्षींमध्ये हिरण्यरोमा, वेदश्री, ऊर्ध्वबाहु, वेदबाहु, सुधामा, पर्जन्य व महामुनी असे सातजण होते. बलबंधु, संभाव्य, सत्यक वगैरे मनूपुत्र होते.
मैत्रेय! स्वारोचिष, उत्तम, तामस आणि रैवत हे चार मनू प्रियव्रताच्या वंशातील आहेत. ते त्याच्या विष्णूभक्तीचे फळ आहे.
सहाव्या मन्वंतराचा अधिपति ‘चाक्षुष’ असून मनोजव हा इंद्र होता. देवपदावर आप्य, प्रसूत, भव्य, पृथुक व लेख असे पाचजण असून त्या प्रत्येकाचे ८-८ प्रकारचे गण होते. ऋषमध्ये सुमेधा, विरजा, हविष्मान्, उत्तम, मधु, अतिनामा व सहिष्णू असे सातजण होते. तसेच ऊरू, पुरू, शतद्युम्न आदिकरून राज्याधिकारी पुत्र होते.
सध्या चालू असलेल्या सातव्या मन्वंतराचा स्वामी सूर्यपुत्र श्राद्धदेव हा आहे. देवांमध्ये आदित्य, वसु, रुद्र इत्यादि आहेत. पुरंदर नावाचा इंद्र आहे, तर वसिष्ठ, काश्यप, अत्रि, जमदग्नि, गौतम, विश्वामित्र, व भरद्वाज असे सात ऋषी आहेत. वैवस्वत मनूचे इक्ष्वाकू, नृग, धृष्ट, शर्याति, नरिष्यंत, नाभाग, अरिष्ट, करूष आणि पृषध्र असे नऊ पुत्र आहेत.
मुनिवर! या सर्वच मन्वंतरांमध्ये विष्णूदेवाची सात्त्विक शक्ती हीच सर्वाधारा आहे. आरंभकाली सर्वप्रथम स्वायंभुव मन्वंतरान्त आकूतिच्या उदरातून विष्णूच्या अंशाने यज्ञपुरुष जन्मला; नंतर प्रत्येक मन्वंतरामध्ये तोच पुन्हा पुन्हा जन्मास येत असतो. त्याची नावे यज्ञ, अजित, सत्य, हरि, मानस, बैकुंठ, व वामन अशी असतात. पैकी वामनाने तीन पावलात त्रैलोक्य जिंकून ते इंद्राला दिले होते.
अशाप्रकारे सात मन्वंतरात विष्णूच्या अंशरूपातील मनूंकडून प्रजा वाढत असते. हे अखिल ब्रह्मांड त्या परमात्म्याच्या शक्तीने व्यापलेले आहे. म्हणून त्याला ‘विष्णू’ म्हटल अर्थात देव-देवता, मनू, सप्तर्षी, मनूपुत्र, व इंद्रासकट यच्चयावत् जे जे काही आहे, ते सर्व विष्णूचाच अंश आहे.”
भविष्यातील मन्वंतरे
मैत्रेयांनी पुन्हा येणाऱ्या मन्वंतरांची माहिती विचारल्यावरून पराशरांनी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले “मुनिवर्य! विश्वकर्म्याची मुलगी ‘संज्ञा’ ही सूर्याची बायको होती. तिला यम, यमी व मनू अशी संताने झाली पण पुढे सूर्याचे उग्र तेज असह्य झाले तेव्हा तिने आपली छाया तिथे ठेवली आणि ती तपश्चर्या करण्यासाठी दूर वनात चालती झाली; नंतर त्या छायेला शनि, एक मनू व स्थपत्ति अशी तीन मुले झाली.
एकदा छायेने रागाच्या भरात यमाला शाप दिला तेव्हा सूर्य व यम यांनी जाणले की, ही कुणीतरी वेगळीच आहे. त्यावर तिने सर्व खुलासा केल्यावर सूर्यदेवाने अंतर्दृष्टीने पाहिले तेव्हा कळले की, संज्ञा घोडीचे रूप धारण करून वनात तपश्चर्या करीत आहे मग असे झाले की, सूर्याने घोड्याचे रूप धरले व संज्ञेशी संभोग केला. तेव्हा त्याजपासून तिला अश्विनीकुमार हे दोन जुळे पुत्र व रेवन्त अशी संताने झाली.
नंतर सूर्य संज्ञेसह आपल्या स्थानी आला व विश्वकर्माने त्याचे तेज सौम्य केले. तरीही त्यामुळे सूर्याचे तेज फक्त १२% एवढेच कमी झाले; नंतर त्या तेजातून विश्वकम्पनि विष्णूसाठी चक्र, शंकरासाठी त्रिशूळ, कुबेरासाठी विमान, कार्तिकेयासाठी शक्ती व इतर देवांसाठी हत्यारे बनविली.
छायेचा एक पुत्र जो मनू बनला तो पुढे ‘सावर्णि’ नावाचा आठव्या मन्वंतराचा स्वामी होईल. त्याचेही वर्णन ऐका. तेव्हा सुतपा, अमिताभ हे मुख्य देव असतील व त्यांचे वीस-बीस गण असतील, ऋषी दीप्तिमान, गालव, राम, कृप, अश्वत्थामा, व्यास आणि ऋष्यशृंग हे सात जण असतील. बळी हा इंद्र होईल व सावर्णिपुत्र विरजा, उर्वरीवान आणि निर्मोक असे तिघे राजे होतील,
नववा मनू दक्षसावर्णि असेल, तेव्हा मरीचिगर्भ, पार व सुधर्मा हे १२- १२ गण बाळगणारे देव आणि अद्भुत नावाचा इंद्र असेल, सात ऋषींमध्ये सवन, द्युतिमान, भव्य, वसु, मेधातिथि, ज्योतिष्मान् आणि सत्य हे असतील. दक्षसावर्णिचे पुत्र धृतकेतु, दीप्तिकेतु, पंचहस्त, निरामय व पृथुश्रवा हे राजे होतील.
नंतरच्या १०व्या मनूचे नाव ‘ब्रह्मसावर्णि’ असून त्याचे दहा पुत्र राजे होतील. प्रत्येकी १०० गण असणारे सुधामा व विशुद्ध असे दोन देव राहतील. शांति नावाचा इंद्र असेल. हविष्मान्, सुकृत, सत्य, तपोमूर्ति, नाभाग, अप्रतिमौजा व सत्यकेतू असे सप्तर्षी होतील,
अकरावा मनू ‘धर्मसावर्णि’! त्यावेळी विहंगम, कामगम आणि निर्वाणरति हे ३०-३० गणांवरील मुख्य देव असून, वृष नावाचा इंद्र असेल. नि:स्वर, अग्नितेजा, वपुष्मान, घृणि, आरुणि, हविष्मान् व अनघ असे सातजण ऋषी रहातील. मनूचे सर्वत्रग, सुधर्मा, देवानीक वगैरे पुत्र राजे होतील.
रुद्राचा पुत्र सावर्णि हा बारावा मनू असेल. त्या समयी ऋतुधामा नायक इंद्र, तसेच हरित, रोहित, सुकर्मा, सुमना व सुराप हे पाच देव असतील. ऋषी सात असून त्यांची नावे तपस्वी, सुतपा, तपोमूर्ति, तपोरति, तपोधृति व तपोधन असून मनूचे पुत्र देववान, उपदेव, देवश्रेष्ठ वगैरे राजे होतील.
तेरावा मनू ‘रुचि’ असेल, तेव्हा सुत्रामा, सुकर्मा व सुधर्मा हे प्रत्येकी ३३ गण बाळगणारे देव असतील. ‘दिवस्पति’ नावाचा इंद्र असेल व निर्मोह, तत्त्वदर्शि, निष्प्रकंप, निरुत्सुक, धृतिमान्, अव्यय, आणि सुत्तपा असे सप्तर्षी होतील. मनूचे पुत्र चित्रसेन, विचित्र वगैरे राजे होतील.
चौदावा व शेवटचा मनू ‘भीम’ नावाचा होईल. त्याचे पुत्र गंभीर बुद्धि ऊरु वगैरे राजे बनतील, अभिबाहु, शुचि, शुक्र, मागध, अधिध, युक्त व जित असे सातजण ऋषी असून, शुचि याच नावाचा इंद्र असेल, चाक्षुष, पवित्र, कनिष्ठ, भाजिक आणि वाचावृद्ध हे देव असतील,
प्रत्येक वेळी चार युगांचे आवर्तन झाले की, वेद लोप पावतात. पुढच्या आवर्तनाच्या आरंभी सप्तर्षीगण पुन्हा वेद प्रकाशित करतात. मनूचा जन्म होऊन तो धर्मसंस्थापनेसाठी स्मृतिशास्त्राची रचना करीत असतो. असे चौदा मनू होऊन गेले की, एक हजार युगांचा कल्पान्त होतो; नंतर पुन्हा तेवढीच दीर्घ रात्र होते.
तेव्हा विष्णु शेषावर झोपी जातो; मग तो पुन्हा जागा होऊन सृष्टिरचना करतो. तेव्हा तो प्रत्येक रूपात प्रवेश करून सृष्टीचे पोषण करतो. सत् व असत् यांचा समतोल राखतो. अशाप्रकारे हे चक्र निरंतर तोच फिरवित असून सर्व काही तोच आहे.”
श्री विष्णु पुराण अंश-३ (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७