अधिक मास विशेष लेखमाला (भाग २६)
श्री विष्णु पुराण अंश-३ (भाग -२)
व्यासांची गणना व ब्रह्मज्ञान
पराशरांनी कथन केलेले विष्णूतत्त्वाचे विवेचन ऐकल्यानंतर मैत्रेयांनी त्यांना वेदविस्तार व व्यासांची माहिती ऐकवावी अशी विनंती केली. त्यावर पराशर सांगू लागले,
“अहो मुनिराज! वेदरूपी वृक्षाच्या शाखांची संख्या अगणित आहे. ती संपूर्ण सांगणे कुणालाही शक्य नाही, तरीसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. भगवान् विष्णू प्रत्येक द्वापारयुगात व्यासरूपामध्ये अंशावतार घेतात. ते विश्वकल्याण व्हावे एवढ्यासाठी वेदाचे खंड करतात. माणसाची आकलन करण्याची शक्ती, आयुष्य, बळ ही सीमित आहेत असे जाणून ते सर्वांचे हित व्हावे म्हणून अमर्याद अशा बेदाचे अनेक भाग करतात, भगवंत ज्या देहाच्या द्वारे हे कार्य करतात, त्या सर्व देहांना ‘व्यास’ असे एकच नाव आहे. (अर्थात् व्यास हे एक पद आहे) ते कुणा एकाचे विशेष नाम नव्हे.
व्यासांची एकूण संख्या २८ आहे. एका कल्पातील २८ युग चौकडीत २८ द्वापरयुगे असतात. आता या वैवस्वत नावाच्या चालू असलेल्या त्यामन्वंतराच्या प्रत्येक द्वापारयुगातील व्यासांची माहिती सांगतो. व्यासपदावर आरूढ झालेले महात्मे असे आहेत :-
१ ब्रह्मदेव, २ प्रजापती, ३ शुक्राचार्य, ४ बृहस्पति, ५ सूर्यदेव, ६ मृत्युदेव, ७ इंद्र, ८ वसिष्ठमुनी, ९ सारस्वत, १० त्रिधामा, ११ त्रिशिख, १२ भरद्वाजमुनी, १३ अंतरिक्ष, १४ वर्णी, १५ त्रय्यारूण, १६ धनंजय, १७ क्रतुंजय, १८ जय, १९ भरद्वाज, २० गौतममुनी, २१ हर्यात्मा, २२ वाजश्रवा, २३ तृणबिंदू, २४ ऋक्ष (वाल्मीकी), २५ शक्ति, २६ पराशर (स्वतः), २७ जातुकर्ण व २८ कृष्णद्वैपायन. याच्यानंतर पुढच्या द्वापारात द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा हा व्यास असेल.
ॐ हे एकमेव अक्षर ब्रह्म आहे. ते अमर्याद व सर्वव्यापी आहे. त्यात तीन लोक, त्याचप्रमाणे चार वेद यांचा समावेश आहे. त्यालाच बंदन करीत जावे.
तेच सृष्टीच्या जन्माचे व विनाशाचे मूळ आहे. ते महत्त्वापेक्षाही गहन आहे. त्याचा पैलपार नाही की, त्याला कोणतेही मोजमाप नाही, ते सार्वकालिक आहे. तीन गुणांना आधार त्याचाच आहे. सांख्यविज्ञानी लोक त्यालाच भजतात. योगी तिथेच जाऊन पोहोचतात, ते सर्वांचे ते आदिकारण असून अविनाशी आहे. त्याला कुणी निर्माता नाही म्हणून ‘स्वयंभू’, तसेच ते प्रधान, अंतर्यामी, एकसंध, तेजस्वी, अविकारी ब अनेकरूपधारी आहे.
तेच परमात्म्याचे प्रतीक आहे. त्यालाच मी पुन्हा पुन्हा नमन करीत असतो. ते (ॐकार ब्रह्म) एकसंध असून तीन मात्रात विभागले आहे.वेगवेगळ्या गोष्टीतून ते एकटेच बाबरत असते. चार वेदांचे स्वरूप, सार आणि चराचरांतील आत्मा तोच आहे. तो अवर्णनीय असा शुद्धज्ञानस्वरूपी आहे.
ऋग्वेदाचा विस्तार
पराशर पुढे म्हणाले, “सष्टीच्या आरंभी एकच वेद असून त्याचे चार पाद होते. एकूण मंत्रसंख्या एक लाख होती. यज्ञाची सुरुवात तिथूनच झाली. पुढे २८व्या द्वापारयुगात माझा पुत्र कृष्णद्वैपायन याने वेदाचे चार भाग वेगळे केले. असे पूर्वीच्या व्यासांनीही केले होते म्हणून कृष्णद्वैपायन याला नारायणच समजा.
ते बेदाचे चार भाग करताना त्याने पात्रतेनुसार चार शिष्य निवडले. त्यांच्यापैकी पैल याला ऋग्वेद, वैशंपायनाला यजुर्वेद, जैमिनीला सामवेद व सुमंतु याला अथर्ववेद दिला.
आरंभी यजुर्वेद एकच होता पण नंतर त्याचेही चार भाग केले. त्यामुळे चार प्रकारांनी यज्ञ होण्यास सुरुवात झाली. ऋग्वेदात होता, यजुर्वेदात अर्ध्वयु, सामवेदात उद्गाता आणि अथर्ववेदात ब्रह्मा असे प्रमुख याजक असतात. असे चार मुख्य विभाग झाल्यावर त्या त्या विभागाच्या प्रमुखांनी आपापल्या शिष्यांना पुन्हा वेगळे विभाग करून दिले. अशा परंपरेतून पुढे वेदाचे मोठे अरण्य वाढले.
पैल याने ऋग्वेदाचे दोन भाग करून ते आपल्या दोन शिष्यांना पढविले; मग त्या दोघांनी प्रत्येकी चार भाग करून चौघा शिष्यांना दिले. अशी परंपरा पुढे पुढे वाढत चालली. नंतर त्यातील अनेक शिष्यांनी संहिता, निरुक्त वगैरे ग्रंथांच्या रचना केल्या.”
शुक्लयजुर्वेद व तैत्तिरीय शाखा
पराशर “मुनिराज! व्यासांचा शिष्य वैशंपायन याने यजुर्वेदाचे २७ भाग केले व ते शिष्यांना पढविले. त्यात याज्ञवल्क्य नावाचा एक विलक्षण प्रतिभासंपन्न शिष्य होता.
एकदा वैशंपायनांच्या हातून त्यांचा भाचा मारला गेला. तेव्हा त्यांनी सर्व शिष्यांना बोलावून ब्रह्महत्येचे पातक धुतले जावे यासाठी अनुष्ठान करण्यास सांगितले. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाला की, हे सर्व जण निस्तेज आहेत. त्यांना अनुष्ठानाचे कष्ट झेपणार नाहीत म्हणून मी एकटाच ते व्रत करीन.
त्यावर वैशंपायन संतापून म्हणाले – “अरे! तू ब्राह्मणांचा अपमान करतोस! तर मला तुझ्यासारख्या उद्घट शिष्याची जरुरी नाही. मी दिलेली सर्व विद्या परत कर आणि चालता हो.”
मग याज्ञवल्कयाने उत्तर दिले की, “ठीक आहे! जशी आपली आज्ञा.”
एवढे बोलून त्याने सर्व विद्या तिथेच ओकून दिली व तो निघून गेला. नंतर बाकीच्या शिष्यांनी तित्तिर पक्ष्यांची शरीरे धारण केली व ती विद्या वेचून घेतली.
म्हणून ते सर्व जण ‘तैत्तिरीय ब्राह्मण’ या नावाने ओळखले जाऊ लागले. नंतर ज्यांनी गुरू आज्ञेनुसार अनुष्ठान केले ते सर्व चरकाध्वर्यु झाले.
याज्ञवल्क्य तिथून बाहेर पडला तो सूर्यदेवाच्या आराधनेत मग्न झाला. नित्य सूर्याची तो स्तुती करीत असे. असे काही काळ चालले असताना एके वेळी त्याच्यापुढे सूर्य घोड्याचे रूप घेऊन प्रकट झाला व त्याला वर मागण्यास सांगितले.
तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाला की, त्याला अशा यजुर्वेदाच्या श्रुति हव्यात की, ज्या त्याचे गुरूसुद्धा जाणत नाहीत. तेव्हा भगवान सूर्यदेवाने ‘तथास्तु’ असे म्हणून त्याला यजुर्वेदाच्या ‘अयातयाम’ या नावाच्या श्रुति दिल्या, त्या वैशंपायन यांनाही अगम्य होत्या.
मैत्रेयमुनी, त्या श्रुति ज्यांनी आत्मसात केल्या ते ब्राह्मण ‘बाजी’नावाने ओळखले गेले व ती वेदशाखा बाजसेनीय म्हणून प्रसिद्ध झाली. असे होण्याचे कारण सूर्य तेव्हा घोडयाच्या (बाजी म्हणजे घोडा) रूपात होता म्हणून!
त्या बाजीश्रुतिंच्या काण्व आदिककरून १५ शाखा आहेत व त्या याज्ञवल्क्य विरचित म्हणून ओळखल्या जातात.”
श्री विष्णु पुराण अंश-३ भाग -२(क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
Vishnu Puran Maharshi Vyas Ganana by Vijay Golesar