अधिक मास विशेष
श्री विष्णू पुराण (भाग २)
रुद्र-सृष्टी व लक्ष्मी-माहात्म्य
पराशरांचे कथन पुढे चालू राहिले. ते म्हणाले कल्पारंभी ब्रह्मदेव चिंतनात मग्न असताना त्याच्या कुशीतून एक लालनिळ्या रंगाचा बालक उत्पन्न झाला. त्याने जन्मत:च मोठमोठ्याने रडण्यास आरंभ केला व तो सर्वत्र धावू लागला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला रडण्याचे कारण विचारले.त्यावर तो म्हणाला की, “माझे नाव काय?”
ब्रह्मदेव म्हणाला की, “तुझे नाव रुद्र आहे. आता रडणे पुरे कर व शांत हो.” तरीही तो आणखी सात वेळा रडला; मग ब्रह्मदेवाने त्याला आणखी सात नावे दिली. ती अशी भज, शर्व, ईशान, पशुपती, भीम, उग्र आणि महादेव!
नंतर त्या आठही जणांसाठी आठ स्त्रिया तसेच पुत्र यांची योजना केली. त्या सर्वांना क्रमाने सूर्य, पाणी, पृथ्वी, वायू, अग्नी, आकाश, ब्राह्मण व चंद्र अशी ८ स्थाने नेमून दिली. त्यांच्या स्त्रियांची नावे सुवर्चला, उषा, विकेशी, अपरा, शिवा, स्वाहा, दिशा व रोहिणी अशी आहेत.
शनि, शुक्र, लोहितांग (मंगळ), मनोजब, स्कन्द, सर्ग, संतान व बुध हे त्यांचे पुत्र आहेत. रुद्रदेवाने दक्ष प्रजापतीच्या सती नावाच्या मुलीबरोबर लग्न केले; नंतर पुढे तिने पित्यावरच्या रागापोटी स्वत:ला हवन कुंडात जाळून घेतले होते; मग ती हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी जन्मास आली.
भृगु ऋर्षीपासून ख्यातीला धाता व विधाता असे दोन पुत्र आणि लक्ष्मी नावाची कन्या झाली. तीच पुढे विष्णूची पत्नी झाली.”
लक्ष्मी-माहात्म्य
मैत्रेयांनी विचारले की – “प्रभू! लक्ष्मी तर अमृतमंथनाच्या वेळी क्षीरसागरामधून निघाली असे मी ऐकले आहे. तर याचा खुलासा कसा?”
पराशर बोलले – अहो मुनिवर्य! ती भगवंताशी अभिन्न असणारी लक्ष्मी सतत आहेच. त्याचप्रमाणे ती सर्वव्यापिनी आहे. विष्णू व लक्ष्मी ही जोडी सर्वत्र आहे. ती वाचा आहे तर विष्णू अर्थ आहे.
जशी बोध व बुद्धी, सत्कर्म व धर्म, नियम व नीती, स्रष्टा व सृष्टी, पर्वत व भूमी, तृप्ती व संतोष ही जोडी आहे, तशीच ती सर्वांतरी असणारी जोडी आहे. तो काम तर ही इच्छा आहे. यज्ञ व दक्षिणा, पुरोडाश व आहुती, अग्नि व स्वाहा, साम व उद्गीती, शिव व गौरी, सूर्य व त्याची प्रभा, पितृदेवता व स्वधा, अवकाश व स्वर्ग, चंद्र व चांदणे, समुद्र व लाट, इंद्र व शची ही सर्व रूपे त्यांचीच आहेत.
यम व त्याची पत्नी, कुबेर व ऋद्धि, वरुण व गौरी, कार्तिकस्वामी आणि देवसेना, आधार व शक्ति, मुहूर्त व कला, दिवा व त्याची ज्योती, वृक्ष व लता, दिवस व रात्र अशा रूपात ती दोघे सामावलेली आहेत.
असे वर्णन तरी कुठवर करीत बसणार? म्हणून तुम्हाला संक्षेपाने सांगतो की, या ब्रह्मांडात जे जे म्हणून काही पुरुषवाचक असेल ते ते सर्व हरिचा अंश आहे आणि जे जे काही स्त्रीवाचक असेल ते लक्ष्मीचा अंश आहे असे जाणा.
या दोघांच्या पलीकडे काहीच नाही!
इंद्राला दुर्वासांचा शाप,
पराशर सांगू लागले “मी मरीचि ऋषींकडून या बाबतीत जे ऐकलेले आहे, ते आता तुला सांगतो. कोणे एकेकाळी शिवावतार दुर्वासमुनी फिरत असताना त्यांनी एक विद्याधरी पाहिली. तिच्या हातात एक फुलांचा हार होता. त्याच्या सुवासाने तो सर्व परिसर दरवळला होता. तेव्हा दुर्वासांनी तिच्यापाशी तो हार मागितला असता तिने तो त्यांना अर्पण केला.
मग तो हार मस्तकावर धारण करून ते पुढे निघाले. तेव्हा समोरून ऐरावतावर बसून इंद्र येताना त्यांना दिसला. त्यांनी आनंदाने तो हार त्याच्या अंगावर टाकला असता त्याने तो हार ऐरावताच्या मस्तकाचर फेकला, त्या मदोन्मत्त हत्तीने तो हार सोडेत घेऊन फिरवला आणि खाली पृथ्वीवर टाकला.
असा त्या हाररूपी प्रसादाचा अपमान झालेला पाहताच दुर्वासांची तळपायाची आग मस्तकात गेली.ते इंद्राला म्हणाले –
“अरे गर्विष्ठ इंद्रा तू माझ्या देणगीचा घोर अपमान केलेला आहेस. तू. काय मला सामान्य ब्राह्मण समजलास? अरे या तुझ्या कृत्याचे फळ म्हणून तुझे संपूर्ण त्रैलोक्याचे राज्य श्रीहीन व वैभवहीन होईल, जा!”
त्यावर इंद्राने खाली उतरून, लोटांगण घालून वारंवार क्षमा मागितली. परंतु दुर्वासांना काही दयेचा पाझर फुटला नाही. ते बोलले की “माझे तप सर्व जग जाणते आणि माझा क्रोधही जाणते, तू हे क्षमा मागण्याचे ढोंग बंद कर आणि येथून मुकाट्याने चालता हो.”
असे बोलून ते तरातरा निघून गेले; मग इंद्र नाईलाजाने अमरावतीला गेला. त्याचे सर्व वैभव आणि बळ लयाला गेले. तेव्हा ती संधी साधून दानव व दैत्य यांनी त्याच्यावर आक्रमण केले. त्या घनघोर लढाईत इंद्र हरला; मग तो देवांसहित ब्रह्मदेवापाशी गेला आणि त्याला सर्व हकीकत सांगितली.
(श्रीविष्णुपुराण क्रमश:)
सादरकर्ते : विजय गोळेसर (मोबा.९४२२७६५२२७)