श्रीविष्णु पुराण अंश-५ (भाग-४)
कृष्णाची रासक्रीडा
वृषभासुराचा वध
आणि कंसाचे आमंत्रण!
वैदिक साहित्यात म्हणजेच वेद आणि पुराणात दोन चरित्रे लोकप्रिय आणि विश्व प्रसिद्ध आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची! श्रीविष्णु पुराणात रामायणाचा कथासार आपण थोडक्यात पहिला. श्रीविष्णु पुराणातील संपूर्ण ५ वा अंश श्रीकृष्ण चरित्राला वाहिला आहे. आज आपण श्रीविष्णु पुराणातील श्रीकृष्ण चरित्र भाग – ४ पाहणार आहोत.
कृष्णाची सुप्रसिद्ध रासक्रीडा!
इंद्र निघून गेल्यानंतर कृष्णाचे खेळगडी जमा झाले. त्यांनी विचारले “हे प्रभू! तू एवढा प्रचंड गोवर्धन उचलून धरलास आणि आमचे जीव वाचविलेस. असे पाहिल्यावर आम्हाला वाटते की, एका गवळ्याच्या मुलाचे हे कृत्य खास नव्हे. केवढे अचाट सामर्थ्य हे?
तू कालिया नागाचा पाडाव केलास, धेनुक असुर मारलास, हा पर्वत हातावर तोलून धरलास या सर्व कृती पाहून आम्हाला शंका वाटते की, ही मानवी कृत्ये खास नसावीत. आम्ही गोकुळवासीय तुझ्यावर फार प्रीती करतो. तुला आमच्यापैकीच एक समजतो पण तुझ्या चमत्कारिक कृत्यांवरून तू खरोखर कोण आहेस ते काही आम्हाला कळत नाही.
तू कुणी देव आहेस की, यक्ष, गंधर्व यांपैकी आहेस किंवा राक्षस आहेस याचा शोध घेण्याची आम्हाला काही गरज नाही. तू आमच्यातलाच एक आहेस हे आमच्यासाठी पुरेसे आहे.”
असे त्याचे म्हणणे ऐकून कृष्ण बराच वेळपावेतो स्तब्ध बसून राहिला. मग तो जराशा नाराजीच्या सुरात बोलू लागला –
“मित्रांनो! जर तुमच्या मनात मजविषयी जराही दुजाभाव नसेल तर माझी स्तुती का करता? तुम्ही मला तुमच्यासारखाच समजा म्हणजे झाले. मी काही यक्ष, राक्षस, देव किंवा गंधर्व नाही. माझा ही जन्म तुमच्यासारखा इथे गोकुळातच झाला नाही काय? मी सर्वांसमक्ष इथेच रांगलो, खेळलो, खोड्या करीत मोठा झालो; मग तुम्ही मला वेगळा का समजता? मी तुमच्यातला व तुमच्याप्रमाणेच एक आहे. मी तुमचाच आहे. आता आणखी तर्क करून डोक्याला त्रास देऊ नका.”
असे त्याचे म्हणणे ऐकून ती मुले खेळण्याकरीता निघून गेली.
मग कृष्णाने एक नजर सर्वत्र टाकली. आकाशात चंद्र चमकत होता. रानफुलांच्या व कमळांच्या सुवासाने वातावरण सुगंधित झाले होते. भुंगे फुलाफुलांवर मधाचे सेवन करण्यासाठी फिरत होते. अशावेळी गोपींसहित रस खेळावा अशी त्याला इच्छा झाली. तेव्हा त्याने मधुर लकेरी घेत एक शृंगारीक पद गाण्यास सुरुवात केली.
तो आवाज दूरदूरपर्यंत गेला आणि घरांतून निघून गवळणी खेचल्यासारख्या धावत जिथे श्रीकृष्ण उभा होता तिथे येऊन पोहोचल्या, त्यावेळी कुणी त्याला गाण्यात साथ देऊ लागल्या. कुणी डोळे मिटून टाळ्या तालात वाजवू लागल्या. कुणी मादक स्वरांनी धुंद होऊन बेभानपणे नाचत सुटल्या.
कुणी तर घरीच डोळे मिटून कृष्णाच्या ध्यानात निमग्न झाल्या, वृंदावनात कदंब वृक्षाखाली कृष्णाला गोपींनी चारी बाजूंनी घेरला, तेव्हा अचानकपणे तो तिथून नाहिसा झाला, कृष्ण दिसेनासा झाल्यावर त्या सगळ्याजणी वेड्यापिशा झाल्या. कृष्णाला हाका मारीत त्या फिरू लागल्या.
एक कृष्णाची नक्कल करू लागली. दुसरीने दंड थोपटले व जणू राक्षसांना आव्हान दिले. प्रत्येक गोपी कृष्णाला शोधीत होत्या. त्याप्रसंगी कृष्णासाठी आतुर झाल्यामुळे त्यांना अंगावरच्या वस्त्रांची शुद्ध राहिली नाही. कृष्णाला नक्की कुणातरी गवळणीने भुलवून नेला असणार अशी त्यांच्यापैकी प्रत्येकीच्या मनात शंका होती.
त्या सगळ्या जणी बराच वेळ किलबिलाट करून कृष्णाला शोधून थकल्या आणि यमुनेच्या काठी बसून राहिल्या. त्याच्या आठवणी काढीत त्या सगळ्याजणी बसलेल्या असताना कृष्ण दुरून येताना त्यांना दिसला. तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांच्या शिथिल देहात जणू नवचैतन्याचा संचार झाला. त्यावेळी सर्व गोपींनी त्याला पुन्हा घेरून टाकला.
प्रत्येकीलाच कृष्ण हवा होता. त्यासाठी त्यांची एकमेकीशी चढाओढ लागली. कृष्ण चारी बाजूंनी ओढला जाऊ लागला. तेव्हा त्याने एक चमत्कार केला.
जेवढ्या गवळणी होत्या तेवढी रूपे धारण करून त्याने प्रत्येकीचा हात धरला आणि मोठा गोलाकार फेर धरून तो प्रत्येकीसह क्रीडा करू लागला. त्या सर्व गोपींच्या मागे आलेल्या घरच्या माणसांना न जुमानता कृष्णासहित धुंद होऊन खेळत होत्या.
कुणी त्याला आलिंगन देत होत्या तर कुणी त्याची चुंबने घेत होत्या. कुणी त्याला ओढत एखाद्या वृक्षामागे नेत होत्या. तर कुणी त्याच्यासोबत नाचत होत्या. त्या नादात त्यांना काळाचे भान न राहिल्यामुळे एकेक क्षण युगासारखा वाटत होता. कृष्णसुद्धा अत्यंत तन्मय होऊन त्यांच्याशी क्रीडा करीत होता.
असा प्रकार त्या शरद पौर्णिमेला संपूर्ण रात्रभर चालला होता. रात्रभर क्रीडा करून जेव्हा सर्व गोपी थकून गेल्या तेव्हा त्या तिथेच गवतावर आडव्या झाल्या; मग हळूहळू एकेक गोपी उठली व वस्त्रे सावरून घरी निघून गेली.
यमुनेच्या काठावर पुनश्च शांतता पसरली.
वृषभासुराचा वध
“एके दिवशी संध्याकाळच्या वेळी श्रीकृष्ण रासक्रीडा करीत होता. तेव्हा अरिष्ट नावाचा एक राक्षस बैलाचे रूप घेऊन गोकुळात आला. टोकदार शिंगे, काळा रंग, वटारलेले डोळे असा उग्र दिसणारा तो खुरांनी जमीन उकरीत धावत होता. दात विचकत व शेपटी उंच उभारून तो धिप्पाड बैल पहाताच सर्व भिऊन पळाले. गायी दावी तोडून चारी दिशांना उधळल्या.
त्याचा असा धुमाकूळ चालला असताना सर्व गवळी, गवळणी वगैरे कृष्णाला हाका मारू लागले. कृष्णाने लगेच टाळ्या वाजवून व ओरडून त्या बैलाचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा तो वृषभासूर शिंगे उगारून कृष्णाच्या रोखाने वेगात धावला. सर्व गोकुळवासीय श्वास रोखून जीव मुठीत घेउन पाहू लागले.
परंतु कृष्ण मात्र हसत उभा होता, तो बैल जवळ येताक्षणी कृष्णाने -चपळाई करून त्याची दोन्ही शिंगे घट्ट पकडली आणि त्याच्या कुशीत एक सणसणीत लाथ हाणली, तेवयानेच तो अर्धमेला झाला. कृष्ण त्याची शिंगे न सोडता त्याची मान ओल्या कपड्याचा पिळा जसा पिळतात तशी पिळवटून काढली,
त्याचे एक शिंग मुळापासून उपटून काढून ते हाती धरून कृष्ण त्याला झोडपीत सुटला. शेवटी तो मार असह्य होऊन तो रक्त ओकत मरुन पडला, मग सर्व नागरिक कृष्णाभोवती गोळा झाले.”
कंसाचे आमंत्रण घेऊन अक्रूर गोकुळात येतो
पराशर पुढे सांगतात, “बैलाच्या रूपातला अरिष्ट राक्षस, धनुक व प्रलंब यांचे वध, गोवर्धन उचलून सात दिवस व रात्री हातावर तोलून धरणे, कालिया नागाचे गर्वहरण, अर्जुनवृक्ष उपटणे, पूतना राक्षसिणीचा वध व गाडा मोडून टाकणे अशा बाळकृष्णाच्या लीला गोकुळात चालूच होत्या.
तेव्हा नारद एकदा जाऊन कंसाला भेटले आणि देवकी व यशोदा यांनी बाळाची अदलाबदली केली त्या घटनेपासून सुरुवात करून कृष्णाचे सर्व पराक्रम त्याला ऐकवले, ते सर्व वृत्त ऐकले तेव्हा कंसाला अतिशय राग आला आणि त्याने भरसभेत वसुदेवाची आणि यादवांची खरडपट्टी काढली.
नंतर तो विचार करून लागला की, जोवर बलराम व कृष्ण हे लहान आहेत तोवरच यांचा काटा काढला पाहिजे. पुढे ते आणखी मोठे झाल्यावर आटोपणार नाहीत. आपल्यापाशी वीर चाणूर व बलशाली मुष्टिकासारखे मल्ल असताना त्यांच्याशी कुस्ती लावून देऊन त्या दोघांचा परस्पर आणि कायमचा बंदोबस्त करावा. त्यासाठी अगोदर धनुर्यज्ञाचे निमित्त करून त्यांना इथे बोलावून घ्यावे.
केशी राक्षसाला पाठवून कृष्णाला वृंदावनातच मारावे. तरीही ते दोघे वाचले व इथे आले तर माझा कुवलयापीड हत्ती त्यांच्यावर सोडला की ते खातरीने मरतील.
तेव्हा त्याने गोकुळात दूत पाठविण्याचे ठरविले व अक्रूराला बोलावून घेतला. अक्रूर त्याच्यापाशी आला तेव्हा कंस त्याला म्हणाला-
“हे दानपती अक्रूरा! तू माझ्यासाठी एक काम कर. तू रथ घेऊन गोकुळात जा आणि नंदाची भेट घे. तिथे वसुदेवाचे विष्णूअंशाने जन्मलेले दोन मुलगे आहेत. ते दोघेही माझ्यासाठी घातकी आहेत.
आपल्या इथे येत्या चतुर्दशीला धनुर्यज्ञ होणार आहे. तेव्हा तू त्यांना कुस्तीसाठी आमंत्रण दे व इथे तुझ्यासह घेऊन ये; मग मुष्टिक आणि चाणूर या दोघांशी त्यांचे मल्लयुद्ध लावून देऊ. तरीही ते दोघे जिंकले तर त्या दोघांवर आपला कुवलयपीड हत्ती आहे, त्याला चवताळून सोडून देऊ असा माझा बेत आहे.
एवढे करून ते दोघे मारले गेले की, मग मी दुष्ट वसुदेव, नंद व माझा पिता उग्रसेन यांनाही परलोकी पाठवून देईन. त्याची सर्व संपत्ती व गायी जप्त करीन; मग तुझ्याशिवाय सर्व यादवांना मारून टाकीन.
हे सर्व आटोपले की, आपण या निष्कंटक अशा राज्याचा सुखाने उपभोग घेत बसू.
परंतु याकरिता आधी तुला गोकुळात जावे लागेल आणि त्या दोघा भावांना इथे आणावे लागेल. तर तू सोबत भेटवस्तू घे आणि लवकरात लवकर निघ. आधीच फार उशीर झालेला आहे.”
तेव्हा तो भक्तराज अक्रूर उठला आणि आपल्याला श्रीकृष्णाचा या निमित्ताने सहवास मिळणार आहे म्हणून आनंदीत झाला व त्याने कंसाचा निरोप घेतला.
कंसाने त्याला एक सुंदर रथ दिला, अनेक मूल्यवान भेटवस्तू दिल्या आणि निरोप दिला.
श्रीविष्णु पुराण अंश-५ (कृष्ण कथा भाग-४) क्रमश:
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल- ९४२२७६५२२७
Vishnu Puran Krishna Raskrida Kans Invitation by Vijay Golesar