अधिक मास विशेष
श्रीविष्णु पुराण अंश-४ (भाग-१०)
कोण होते जनमेजय पुत्र
‘पुरु’चे वंशज?
पराशरांचे कथन पुढे चालू झाले – “पुरूचा मुलगा जनमेजय त्याचा प्रचिन्वान् त्याचा प्रवीर त्याचा मनस्यु त्याचा अभयद त्याचा सुचु त्याचा बहुगत त्याचा संयाति त्याचा अहंयाति त्याचा रौद्रास झाला.
रौद्राक्षाचे पुत्र ऋतेषु, कक्षेषु, स्थंडिलेषु, कृतेषु, जलेषु, धर्मेषु, धृतेषु, स्थलेषु, सजतेषु, बनेषु असे एकूण दहा जण होते. ऋतेषु याचा पुत्र अंतिनार- त्याचा सुमति, अप्रतिस्थ आणि तिसरा ध्रुव! अप्रतिरथाचा पुत्र कण्व त्याचा मेधातिथि व त्याचे पुढचे सर्व वंशज हे काण्णव ब्राह्मण झाले. अप्रतिरथाचा दुसरा मुलगा जो ऐलिन त्याला चार पुत्र झाले. त्यांच्यापैकी दुष्यंताच्या घराण्यात चक्रवर्ती सम्राट भरताचा जन्म झाला.
त्या संदर्भात देव असे म्हणाले होते की, जन्मदात्री आई ही पुत्राला पोटात धारण करते तथापि पुत्रावर खरा हक्क पित्याचा असतो. पुत्र ज्या बीजापासून जन्म घेतो त्याचेच प्रतिरूप असतो म्हणून हे दुष्यंता! तू या पुत्राचा सांभाळ कर. शकुंतलेचा अपमान करू नकोस. आपल्याच वीर्यातून जन्मणारा पुत्र बापाचा उद्धार करतो. या मुलाचा पिता तूच आहेस. शकुंतला जे सांगते आहे, तेच सत्य आहे. असो.
भरताच्या तीन बायका होत्या. त्यांच्यापासून एकंदर नऊ पुत्र झाले. भरताने आरोप केला की, हे मुलगे मुळीच माझ्यासारखे दिसत नाहीत.तेव्हा त्या स्त्रियांनी ते सर्व पुत्र मारून टाकले; मग निपुत्रिक झाल्यामुळे भरताने मरुत्सोम नावाचा एक यज्ञ केला. त्याचे फळ म्हणून मरुद्गणांनी ‘भरद्वाज’ नावाचा मुलगा त्याला दिला. त्याचे आणखी एक नाव ‘वितथ’ असे होते.
वितथाचा पुत्र मन्यु त्याचे बृहत्क्षत्र, महावीर्य, नर, गर्ग, वगैरे पुष्कळ पुत्र होते. त्यांपैकी नराचा पुत्र संकृति होता व त्याचे गुरुप्रीती व रतिदेवअसे दोन पुत्र होते. गर्गाचा पुत्र जो शिनि त्याच्या वंशात गार्ग्य व शैन्यअसे क्षत्रोपेत ब्राह्मण जन्मले.
महावीर्याचा पुत्र दुरुक्षय असून त्याचे तीन पुत्र होते नंतर त्या सर्वांनी ब्राह्मणत्व प्राप्त केले. बृहत्क्षत्राचा पुत्र सुहोत्र त्याचा हस्ती होता. हस्तिनापुराची निर्मिती त्यानेच केली. याला अजमीढ, द्विजमीढ व पुरुमीढअसे तीन मुलगे झाले. अजमीढाचा पुत्र कण्व आणि त्याचा पुत्र मेधातिथि होय. काण्णव ब्राह्मण हे यांचेच वंशज!
अजमीढाचा दुसरा पुत्र बृहदिशु याचा मुलगा बृहध्दनु-त्याचा बृहत्कर्मा -त्याचा जयद्रथ -त्याचा विश्वजीत -त्याचा सेनाजित.त्याला चार मुलगे झाले. त्यापैकी रुचिराश्व याचा पुत्र पृथुसेन त्याचा पार त्याचा नील होता. नीलाचे शंभर पुत्र होते आणि त्यातला समर हा मुख्य होता. त्याला पार, सुपार आणि सदश्च नावाचे तीन मुलगे होते.
सुपार याचा मुलगा पृथु – त्याचा सुकृति-त्याचा विभ्राज-त्याचा अणुह! अणुहाची पत्नी शुकाची कन्या कीर्ति होती. त्याचा पुत्र तो ब्रह्मदत्त – त्याचा पुत्र विष्वक्सेन- त्याचा उदकसेन व त्याचा भल्लाभ!
हस्तीचा दुसरा पुत्र द्विजमीढ याचा पुत्र यवीनर – त्याचा धृतिमान- त्याचा सत्यधृति- त्याचा दृढनेभि- त्याचा सुपार्श्व – त्याचा सुमति- त्याचा सन्नतिमान व त्याचा कृत. या कृताला हिरण्यनाभाने योगाची दीक्षा दिली होती. या कृताने श्रुतिसंहितांचे चोवीस खंड रचले होते.
कृताचा पुत्र उग्रायुध! त्याने नीपवंशी क्षत्रियांचा नायनाट केला. उग्रायुधाचा पुत्र क्षेम्य – त्याचा पुत्र सुधीर त्याचा रिपुंजय- त्याचा बहुरथ झाला. हे सगळे पुरुवंशीय राजे झाले.
अजमीढ याची पत्नी नलिनी. त्यांना नील नावाचा मुलगा झाला. त्याचा पुत्र शांति – त्याचा सुशांति- त्याचा पुरंजय – त्याचा ऋक्ष – त्याचा हर्यश्व – त्याचे पांच पुत्र मुद्गल, संजय, बृहदिषु, यवीनर आणि काम्पिल्य असे होते. त्यांना पांचाळ असेही म्हटले जात असे.
मुद्रलापासून मौद्गल्य नावाचे क्षत्रोपित ब्राह्मणांची उत्पत्ती झाली. मुद्रलांचा पुत्र बृहदश्व आणि त्याचा पुत्र दिवोदास व कन्या अहल्या अशी होती. पैकी अहल्या व तिचा पती गौतम यांचा पुत्र शतानंद- त्याचा सत्यधृति हा धनुर्विद्या निष्णात होता. एकदा त्याने ऊर्वशीला पाहिली असता त्याचे वीर्य गळून ते दर्भाच्या टोकावर पडून त्याचे दोन भागझाले. त्यातून एक पुत्र व एक कन्या निर्माण झाली. त्यांना राजा शंतनूने पाहिले व घरी घेऊन गेला.
तो पुत्र पुढे कृपाचार्य झाला व त्याची बहिण कृपी ही द्रोणाचार्यांची पत्नी बनली. अश्वत्थामा हा त्याचाच मुलगा होय!
दिवोदासाचा मुलगा मित्रायु- त्याचा च्यवन -त्याचा सुदास त्याचा सौदास – त्याचा सहदेव- त्याचा सोमक- त्याचा जन्तु हा मोठा पुत्र आणि पृषत हा धाकटा व यांच्यामध्ये ९८ पुत्र होते. पृषताचा धृष्टद्युम्न- त्याचा धृष्टकेतु असा वंश वाढला.
अजमीढ याचा ऋक्ष नावाचा आणखी एक मुलगा होता. त्याचा पुत्र संवरण- त्याचा कुरु झाला. त्यानेच कुरुक्षेत्र हे पवित्र क्षेत्र स्थापन केले. कुरूचे पुत्र जन्हु, सुधनु, परीक्षित वगैरे होते. त्यांच्यापैकी सुधनुचा मुलगा सुहोत्र- त्याचा च्यवन त्याचा कृतक- त्याचा उपरिचर वसु! या उपरिचर बसुचे सात मुलगे होते. त्यांपैकी बृहद्रयाचा कुशाग्र – त्याचा वृषभ- त्याचा पुष्पवान त्याचा सत्यहित त्याचा सुधन्वा व त्याचा जतु होय.
बृहद्रथाचा अजून एक जन्मताच उभा चिरलेला असा एक पुत्र होता. पुढे जरा नावाच्या देवतेने त्याला जोडून अखंड केल्यावर तो जरासंघ म्हणून प्रसिद्ध झाला. त्याचा पुत्र सहदेव – त्याचा सोमप- त्याचा श्रुतिश्रवा. असा हा मगध देशाचा राजवंश आहे.”
महाभारत घडविणारा कुरुवंश असा होता !
पराशर सांगू लागले – “हे मैत्रेय! परीक्षिती याचे पुत्र चार होते, ते म्हणजे जनमेजय, श्रुतसेन, उग्रसेन आणि भीमसेन हे झाले आणि जन्हुला एक पुत्र झाला तो विदूरथ- त्याचा सार्वभौम – त्याचा जयत्सेन – त्याचा आराधित- त्याचा अयुतायु- त्याचा अक्रोधन- त्याचा देवातिथि- त्याचा ऋक्ष- त्याचा भीमसेन – त्याचा दिलीप व त्याचा ‘प्रतीप’!
प्रतीपाला मुलगे तीन, देवापि, शांतनु व बाल्हीक हे होते. पैकी थोरला देवापि हा अल्पवयात वनांत निघून गेला; मग शांतनु राजा झाला. या शांतनूचे वैशिष्ट्य असे होते की, हा ज्याला हाताने स्पर्श करी तो जख्खड म्हातारा असला तरी पुन्हा नवतरुण होत असे व त्याला मन:शांतीचा लाभ होत असे म्हणून त्याला शांतनु असे म्हटले जाई.
या शांतनुच्या काळात एकदा बारा वर्षांपर्यंत पाऊस पडलाच नाही. तेव्हा राजाने ब्राह्मणांना बोलावून त्याचे कारण विचारले असता ते म्हणाले , “या राज्याच्या खरा हक्कदार देवापि असून तू याचा उपभोग घेतो आहेस, तर तू फक्त पालक आहेस.” मग ‘आता काय करावे?’ असे राजाने पुन्हा विचारल्यावर ब्राह्मणांनी सांगितले की, जोपर्यंत देवापि निर्दोषी आहे तोपर्यंत तोच खरा हक्कदार ठरतो म्हणून हे राज्य त्याच्या हाती सोपवावे. तोनिर्णय ऐकून शांतनुच्या अश्मसार नावाच्या मंत्र्याने काही पाखंडी ब्राह्मण वनात पाठवले.
त्या ब्राह्मणांनी वनात जाऊन देवापिची भेट आणि त्याचा बुद्धिभेद करून वेदविरोधी बनवला. तिकडे राजा शांतनु ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसार त्यांना सोबत घेऊन देवापिला राज्य द्यावे म्हणून अरण्यात गेला. तिथेत्या ब्राह्मणांनी वेद वचनांचे दाखले देऊन वडील भावानेच राज्याचा सांभाळ केला पाहिजे असा आग्रह करू लागले परंतु देवापिने वेदवाक्यांचे खंडन केले.
मग ते ब्राह्मण शांतनुला म्हणाले की, “हे राजा! आता आपण परत फिरू या. वेदविरोधी असल्यामुळे देवापि पतित बनला आहे. तेव्हा तूच आता राज्याचा हक्कदार झाला आहेस, तसेच दुष्काळाचा दोषही निघून गेला आहे.” मग ते सर्व जण परत फिरून राज्यांत गेले आणि निसर्गाच्या कृपेने पाऊसपाणीही मुबलक झाले.
बाल्हिकाचा मुलगा सोमदत्त व त्याला भूरि, भूरिश्रवा आणि शल्य असे तीन मुलगे झाले. गंगेशी विवाह करून शांतनुला सर्व शास्त्र जाणणारा असा श्रेष्ठ भीष्म नावाचा पुत्र झाला. शांतनुची दुसरी पत्नी सत्यवती हिला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. त्यातला चित्रांगद हा लहानपणीच एका गंधर्वाकडून मारला गेला.
विचित्रवीर्याने काशिराजाच्या अंबिका आणि अंबालिका या दोन मुलींशी विवाह केला. अनिर्बंध भोगवासनेमुळे क्षयरोग होऊन तो निपुत्रिक असा अकाली वारला नंतर वंश चालावा म्हणून त्याची आई सत्यवती हिने व्यासांपासून विचित्रवीर्याच्या दोन्ही बायकांना धृतराष्ट्र व पांडू असा एकेक पुत्र जन्मास घातला. शिवाय एका दासीलाही त्या वेळी व्यासांपासून विदुर नावाचा पुत्र झाला.
धृतराष्ट्राला गांधारी नावाच्या पत्नीपासून दुर्योधन, दुःशासन आदिकरून शंभर पुत्र झाले. दुसरा जो पांडू होता, तो शिकारीसाठी गेला असताना ऋषींच्या शापामुळे नपुंसक बनला. तेव्हा त्याच्या कुंती नावाच्या पत्नीने धर्म, वायू व इंद्र यांच्याशी संबंध ठेवून अनुक्रमे युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन अशा ‘तीन पुत्रांना जन्म दिला.
पांडूची दुसरी पत्नी व कुंतीची सवत माद्री हिनेदेखील अश्विनीकुमारांशी संबंध ठेवून दोन पुत्र नकुल व सहदेव यांना जन्म दिला. या पाचही जणांपासून त्यांची सामाईक पत्नी द्रौपदी हिला एकेक पुत्र झाला. त्यांत युधिष्ठिराचा प्रतिबिंध्य, भीमाचा श्रुतसेन, अर्जुनाचा श्रुतकीर्ति, नकुळाचा श्रुतानीक आणि सहदेवाचा श्रुतकर्मा असे होते.
यांच्याशिवाय पांडव बंधूंचे इतरही स्त्रियांपासून झालेले पुष्कळ मुलगे। होते. त्यांच्यामध्ये युधिष्ठिर व यौधेयी यांचा देवक, भीम व हिडिंबा यांचा पुत्र घटोत्कच, भीम व काशी यांचा सर्वग, सहदेव आणि विजया यांचा सुहोत्र, नकुल व रेणुमति यांचा निरमित्र, अर्जुन व नागकन्या उलूपी यांचा इरावान, अर्जुन व मणिपूरची राजकन्या यांचा बभ्रुवाहन व अर्जुन व सुभद्रा यांचा अभिमन्यु असे पुत्र होते.
पुढे कालगतीनुसार कुरुकुळ जवळ जवळ नष्ट होण्याच्या सुमारास अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भातील बाळावर व एकुलत्या एक अशा शेवटच्या अंकुरावर अश्वत्थम्याने ब्राह्मास्त्राचा प्रहार केला. त्यावेळी श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्याने ते ब्रह्मास्त्र निष्फळ करुन तो जीव वाचवला. तोच परीक्षित नावाचा राजा आजदेखील पृथ्वीचे पालन करतो आहे.”
पुढे होणारे राजेलोक
पराशर ॠषींनी मैत्रेयांना जेंव्हा हे श्रीविष्णु पुराण ऐकविले त्यावेळी पृथ्वीवर परीक्षित हा राजा राज्य करीत होता.त्यामुळे पराशर मैत्रेयांना म्हणाले- “आता भविष्यकाळात होणारे राजेलोक सांगतो.
सध्या जो परीक्षिती राजा आहे त्याचे जनमेजय, श्रुतसेन, उग्रसेन व भीमसेन असे चार मुलगे असतील. जनमेजयाचा शतानीक नावाचा मुलगा याज्ञवल्क्य मुनींचे शिष्यत्व पत्करून वेदाध्ययन करील. कृपाचार्यांपासून शस्त्रविद्या शिकेल; नंतर शौनक महर्षीींचा उपदेश प्राप्त करून घेईल व मुक्तीस जाईल.
शतानीकाचा मुलगा अश्वमेधदत्त- त्याचा पुत्र अधिसीमकृष्ण- त्याचा निचक्तु असेल. तो गंगेतून वाहत कौशांबीपूर इथे राहिल. त्याचा मुलगा उष्ण- त्याचा विचित्ररथ – त्याचा शुचिरथ- त्याचा पुत्र वृष्णिमान – त्याचा सुवेण- त्याचा सुनीथ- त्याचा नृप- त्याचा चक्षु – त्याचा सुखावल – त्याचा पारिप्लव – त्याचा सुनय- त्याचा मेधावी- त्याचा रिपुंजय- त्याचा मृदु- त्याचा तिग्म होय.
तिग्माचा बृहद्रथ – त्याचा बासुदान त्याचा दुसरा शतानीक- त्याचा उदयन- त्याचा अहीनर – त्याचा दण्डपाणि – त्याचा निरमित्र- त्याचा क्षेमक असेल.
असे सांगतात की, अनेकानेक ब्राह्मण आणि क्षत्रियांचा, तसाच नाना राजर्षींचा हा वंश कलीमध्ये क्षेमकाबरोबरच लयास जाईल.
श्री विष्णु पुराण अंश-४/भाग -९ ( क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल- ९४२२७६५२२७