अधिक मास विशेष- ४५
श्री विष्णु पुराण अंश-४ (भाग – १२)
हजारो वर्षांपूर्वी पराशरांनी सांगितलेली
कथा आपल्या आजच्या कलियुगाची!
पराशर मुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेल्या श्रीविष्णुपुराणाचा चौथा अंश आज पूर्ण होत आहे. पराशर मुनींनी त्यांच्या काळात आणि भूतकाळात होवून गेलेल्या राजांचा इतिहास तर सांगितलाच पण विशेष म्हणजे त्यांच्या नंतर हजारो वर्षांनी होणार्या कलियुगाचे देखील अचूक वर्णन केले हे पाहून मन थक्कं होते. ऐका तर मग पराशरांनी सांगितलेली कथा आपल्या आजच्या कलियुगाची!
“आता भविष्यात जन्मणाऱ्या इक्ष्वाकू कुळातील राजांचे वर्णन करतो.
बृहद्वलाचा पुत्र बृहत्क्षण असेल त्याचा पुत्र उरुक्षय- त्याचा वत्सव्यूह – त्याचा प्रतिव्योम- त्याचा दिवाकर- त्याचा सहदेव – त्याचा बृहदश्व – त्याचा पुत्र भानुरथ – त्याचा प्रतीताश्च त्याचा सुप्रतीक- त्याचा मरुदेव – त्याचा सुनक्षत्र त्याचा किन्नर- त्याचा अंतरिक्ष- त्याचा सुपर्ण- त्याचा अमित्राजित व त्याचा बृहद्राज असेल.
बृहद्राजाचा पुत्र धर्मी त्याचा कृतंजय – त्याचा रणंजय त्याचा संजय – त्याचा शाक्य – त्याचा पुत्र शुद्धोदन- त्याचा राहुल- त्याचा प्रसेनजित – त्याचा क्षुद्रक – त्याचा कुण्डक- त्याचा सुरथ आणि त्याचा सुमित्र असेल. ही सर्व वंशावळ इक्ष्वाकू कुळातील बृहद्बल याच्यापासून होईल.
असे एक भविष्यकथन आहे की, इक्ष्वाकूचा वंश राजा सुमित्रापर्यंतच टिकेल. कलीयुगात राजा सुमित्रानंतर हा वंश नामशेष होईल.”
मगधवंश
पराशर पुढे म्हणतात “आता मी मगध देशीच्या बृहद्रथाच्या वंशाचे भविष्य सांगतो. या वंशामध्ये सामर्थ्यवान आणि थोर पराक्रमी असे जरासंध आदिकरून राजे झाले आहेत व पुढे होणार आहेत.
जरासंधाचा मुलगा सहदेव- त्याचा सोमापि त्याचा श्रुतश्रवा – त्याचा अयुतायु- त्याचा निरमित्र- त्याचा सुनेत्र त्याचा बृहत्कर्मा- त्याचा सेनजित- त्याचा श्रुतंजय त्याचा विप्र व त्याचा शुचि.
शुचिचा पुत्र क्षेम्य- त्याचा सुव्रत त्याचा धर्म त्याचा सुश्रवा त्याचा दृढसेन- त्याचा सुबल- त्याचा सुनीत- त्याचा सत्यजित त्याचा विश्वजित- त्याचा रिपुंजय हा शेवटचा असेल,
हे सर्व राजे मगध देशावर एक हजार वर्षांपर्यंत राज्य करतील.”
कलीयुगातील राजे, आचारधर्म आणि पृथ्वीगीता
बृहद्रथाच्या वंशातला शेवटचा राजा रिपुंजय याचा एक मंत्री सुनिक हा रिपुंजयाला विश्वासघाताने मारील आणि स्वतःचा मुलगा ‘प्रद्योत’ याला राज्यावर बसवील. त्याचा मुलगा बलाक- त्याचा विशाखयूप- त्याचा जनक – त्याचा नंदिवर्धन – त्याचा नंदी असेल. यांचा कालखंड एकशे अडतीस वर्षांपर्यंत चालेल.
पुढे नंदीचा शिशुनाभ – त्याचा काकवर्ण- त्याचा क्षेमधर्मा त्याचा क्षतौजा – त्याचा विधिसार – त्याचा अजातशत्रू – त्याचा अर्भक त्याचा उदयन – त्याचा नंदिवर्धन – त्याचा महानंदी असेल. हे शिशुनाभाच्या वंशातील राजे तीनशे बासष्ट वर्षे राज्य करतील.
महानंदीला शूद्र स्त्रीपासून झालेला महापद्म या नावाचा नंद संपूर्ण क्षत्रियांचे उच्चाटन करील; मग तेव्हापासून शूद्र राजे बनतील. महापद्म हा एकट्यानेच सर्व पृथ्वीवर राज्य करील. त्याला आठ मुलगे असून ते नऊ जण शंभर वर्षांपर्यंत राज्य उपभोगतील नंतर एक कौटिल्य नावाचा ब्राह्मण यांचा नाश करील; मग मौर्य वंशातील राजे राज्य करतील, नंदापासूनजन्म झालेला मुरा नावाच्या दासीचा मुलगा चंद्रगुप्त याला कौटिल्य राज्याभिषेक करील.
या चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार त्याचा अशोकवर्धन- त्याचा सुयशा त्याचा दशरथ त्याचा संयुत- त्याचा शालिशूक त्याचा सोमशर्मा- त्याचा शतधन्वा – त्याचा बृहद्रथ असेल. यांचा कालखंड १७३ वर्षे एवढा राहिल.
पुढे मग बलिपुच्छक नावाचा सेवक राजा शर्मा याचा वध करून राज्याचा ताबा घेईल. तो आंध्रदेशीय असेल. त्याच्यापासून त्याचा भाऊ कृष्ण हा राजा बनेल. त्याचा पुत्र शांतकर्णी -त्याचा शातकर्णी-त्याचा शिवति-त्याचा लंबोदर त्याचा पिलक पट्ट्मान त्याचा अरिष्टकर्मा त्याचा हालाहल त्याचा पुलिदसेन त्याचा सुंदर त्याचा शातकर्णी(२) त्याचा शिवास्वाती-त्याचा गोमतिपुत्र त्याचा अलिमान त्याचा शांतकर्णी (२) – त्याचा शिवाश्रित त्याचा पुत्र शिवस्कंध त्याचा यज्ञश्री- त्याचा दिवश त्याचा चन्द्रश्री व त्याचा पुलोमाचि!
असे हे तीस आंध्रभृत्य राजे ४५६ वर्षांपर्यंत राज्य करतील, त्यांच्या मागून सात आभीर आणि दहा गर्दभिल वंशाचे राजे होतील, त्यानंतर १६ शक, ८ यवन, १४ तुर्की, १३ मुण्ड आणि ११ मौनवंशीय राजे होऊन जातील. त्या सर्वांचा एकत्रित कालखंड १०९० वर्षे एवढा राहील. ११ मौन राजांचे राज्य ३०० वर्षे चालेल. ते नष्ट पावल्यावर कैंकिल नावाचे यवन राजे होतील.
त्यांच्यातील पहिला विन्ध्यशक्ती असेल. त्याचा पुत्र पुरंजय त्याचा रामचंद्र त्याचा पुत्र धर्मवर्मा त्याचा वंग त्याचा नंदन- त्याचा सुनंदी असेल. याचे नंदियशा, शुक्र व प्रवीर असे तीन भाऊ असतील, हे सर्व मिळून एकंदर १०६ वर्षे राज्य करतील. यांच्यामागून तेरा यांच्या वंशातले व तिघे बाल्हिक राजे होतील.
नंतर पुढे पुष्पमित्र, पटुमित्र आदिकरून सात आंध्र मांडलिक राजे बनतील. नऊ जण राजे कोसलदेशाचे राज्य चालवितील, निषध देश हेच चालवितील. मगध देशीचा राजा विश्वस्फटिक हा इतर वर्णीयांना चिथावणी देईल आणि कोळी, बटु, पुलिंद व ब्राह्मण यांच्यातून अधिकारी नेमील. पुढे संपूर्ण क्षत्रियांचा पाडाव करून पद्मावतीपुरात नाग, गंगेच्या परिसरात मागध व गुप्त वंशीय राजे होतील.
कोसल व इतर चार राज्यांचा कारभार देवरक्षित हा एकटाच सांभाळील. कलिंग देशासह तीन देशांवर गुह हा एकच राजा राज्य करील. नैषध, नैमिषक आणि कालकोशक वगैरे छोट्या राज्यांवर मणिधान्यक वंशातीलराजे शासन करतील. त्रैराज्य व मुषिक या देशांवर कनक राजाची सत्ताअसेल. सौराष्ट्रात व्रात्यांची, अवंतीवर द्विजांची, शूद्र, आभीर या प्रदेशांवर आभीरांची आणि नर्मदा किनाऱ्यावर शूद्रांचे आधिपत्य असेल. काही देशांत म्लेंच्छ अधिकार चालवितील.
वर सांगितलेल्या राजवटी एकाच वेळी असतील. त्यावेळेचे राजेलोक जुलुमी, शीघ्रकोपी, खोटे बोलणारे व धर्माची पर्वा न करणारे असतील. स्त्रिया व मुले आणि गायी यांच्या हत्या करतील. प्रजेचे द्रव्य कसेही करून हिसकावून घेतील. ते सामर्थ्यहीन, पातकी, अल्पायुषी, मोठमोठ्या वल्गना करणारे व अत्यंत हावरे असतील.
हे राजे परस्परांशी हातमिळवणी करतील आणि म्लेंच्छ लोकांना हाताशी धरून आपल्याच प्रजेला लुटतील. पुढे पुढे धर्म व द्रव्य यांचा अभाव होईल. संसार नष्ट होईल. त्या परिस्थितीमध्ये श्रीमंती हेच उच्चकुळाचे लक्षण असेल. धर्माचा आधार हा अधिक सामर्थ्य वाढावे म्हणून घेतला जाईल.
स्त्री व पुरुष यांच्या संगतीने विवाह होतील, स्त्रीला उपभोगाची गोष्ट मानली जाईल. तेव्हा खोटेपणाला मोठी प्रतिष्ठा लाभेल.सुपीक जमिनींना तीर्थक्षेत्रापेक्षा महत्व दिले जाईल. जानवे धारण करण्यावर ब्राह्मणत्व ठरविले जाईल. धनवंताचीच स्तुती गाईली जाईल. वेशभूषा हेच साधुत्वाचे चिन्ह असेल, अन्याय हेच उपजीविकेचे (अर्थप्राप्तीचे) साधन होईन,
दुर्बलाची उपेक्षा करतील, अकांडतांडव करून आपले मत इतरांवर लादणे यालाच विद्वत्ता मानतील, दरिद्री साधू ढोल, स्नानालाच शुद्धी ठरवतील, दान केले की दाता धार्मिक ठरेल, एकत्र संमतीने श्री व पुरुषाने रहावे (विवाह संस्कारांची आवश्यकता नाही) याला समाजाची मान्यता राहिल.
अशाप्रकारे समाजात दोषांचा फैलाव झाला की, मग ‘बळी तो कान पिळी’ असा प्रकार सर्वत्र रूढ होईल. राजे लोकांच्या जाचाला कंटाळून जनता देशोधडीला लागेल. जे मिळेल ते खाऊन पिऊन व वस्त्रे पांघरून रहावे लागेल,
संतती बेसुमार वाढत जाईल. निसर्गात सुद्धा संतुलन राहणार नाही. सरासरी आयुर्मान केवळ तेवीस वर्षे एवढे कमी होईल, अशा तऱ्हेने सर्व समाज कलीयुगात क्षीण होईल, असा धर्माचा लोप झाला व कलीयुग संपत आले की, संभलपुर नावाच्या गावी कल्कि अवतार होईल,
तेव्हा विश्वचालक, चराचराचा नियंता, अनादि व अनंत, तत्त्वरूपी व आत्मस्वरूपी भगवान वासुदेव हा अंशरूपाने विष्णुयशा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी जन्म घेईल, तेव्हा तो निजबलाने सर्व दुष्ट व दुर्जनांचा संहार करून पुन्हा धर्माची स्थापना करील. ही घटना जेव्हा चंद्र-सूर्य-गुरू पुष्य नक्षत्री एकत्र येतील तेव्हा घडेल, असो,
परीक्षिताच्या जन्मापासून तो नंदाच्या राज्याभिषेकापर्यंतचा काळ एक हजार पन्नास वर्षांचा असेल. परीक्षिताच्या जन्मानंतर जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने आपला अवतार संपवला त्यानंतर पृथ्वीवर कलीयुग सुरू झाले.
कृष्णाने देह सोडल्यानंतर पांडवांनी परीक्षिताला राज्यावर बसवला व ते वनात निघून गेले. हे राजवंश मी थोडक्यात सांगितले आहेत. संपूर्ण वर्णन सांगण्यास बसलो तर ते कधी संपणारच नाही.
देहावरील आसक्तीने आंधळे बनलेले हे सगळे राजेलोक स्वतः पृथ्वीचे मालक समजतात, ते पृथ्वीची मालकी कायम आपल्याकडे कशी राहिल या चिंतेने झुरत राहून शेवटी मरून जातात, असे कितीतरी राजे आले व गेले. त्यांचा चाललेला खटाटोप बघून पृथ्वीला हसू फुटते आणि ती म्हणाले –
“हाय हाय! हे राजेलोक बुद्धिमान असूनही या क्षणभंगूर आयुष्याचा मोह धरतात. हे आधी स्वतःला, मग मंत्र्यांना, नोकरांना जनतेला व शत्रूना जिंकण्याचा व शेवटी पृथ्वीला जिंकण्याचा हव्यास धरतात पण अगदी जवळच खेटून उभा असलेल्या मृत्यूला मात्र जाणत नाहीत.
मन जर जिंकता आले तर त्यापुढे पृथ्वीला जिंकण्याची काय मातब्बरी आहे? मनाला स्वाधीन करता आले तरच मोक्ष मिळतो. नाहीतर यांचे वाड-वडील मला सोडून निघून गेले तरी ते माझ्या प्राप्तीसाठी तडफडतात, नातेवाईकांशी झगडतात, शत्रूबरोबर लढाया करतात व माझ्यावर मालकी हक्क सांगतात. मला तर यांची कीव करावीशी वाटते आणि हसूपण येते.”
पराशर पुढे म्हणतात “पृथ्वीने सांगितलेले हे श्लोक जो ध्यानी घेतो त्याचा मोह नाहीसा होतो. तर मी यथाशक्य मनूच्या वंशाचे वर्णन केले आहे. त्या वंशातील सर्व राजे विष्णुच्या अंशातून जन्मले होते. असा हा मनूवंश जो श्रवण करतो त्याची एकुण एक पापे जळून नष्ट होतात.
त्याला अमाप धनधान्य प्राप्त होते. या सर्व राजे लोकांची चरित्रे अवलोकन केल्याने मनुष्याची सर्व आसक्ती नष्ट होते.आजच्या घडीला हे सर्व पुरुष काळाच्या तोडी पडून त्यांची बाकी उरली आहेत.
ज्या जिलेंद्रिय पुरुषांनी तपक्षयों केली. अनेक यह अनुसने केली आज कुठे आहेत? श्रेष्ठ राजा पृथु काळाधीन होऊन कृठच्या कुठे फेकला गेला. शत्रूना जिंकून सप्तद्वीपवती पृथ्वीचा भोग एकट्याने घेणारा कार्तवीर्य झाला होता की नव्हता असा संशय ऐकणाव्याला वाटतो.
त्रैलोक्यविजयी रावण, अविक्षित, श्रीरामचंद्र यांचे ऐश्वर्य तुच्छ आहे. कारण काळाच्या तडाख्याने त्यातील चिमूटभर सुद्धा वाचू शकले नाही चक्रवर्ती मान्धाता हा या संपूर्ण पृथ्वीचे शासन करीत होता. त्याचे फक्त नाव तेवढे कथा व पुराणांतून ऐकायला मिळते.
हे सर्व ऐकल्यावर, ऐश्वर्यावर तर सोडाच पण आपल्या शरीरावर करील असा मूर्ख कुणी असेल का? भगीरथ, सगर, काकुस्थ, राम- लक्ष्मण, रावण, युधिष्ठिर असे कैकजण थोर थोर होऊन गेले हे खरेच आहे परंतु आज ते कुठे आहेत कोण जाणे?
मैत्रेय मुनी! आज या घडीला विदयमान असलेले तसेच पुढे होणारे राजेसुद्धा काळाच्या तोडी सापडून त्यांची फक्त नावे तेवढी उरतील. अशी कालगती मनुष्याने जाणून आपल्या देहाचीसुद्धा आसकी न घरता निर्लेप रहावे।”
पराशर मुनीविरचित श्रीविष्णुपुराणाचा चौथा अंश संपूर्ण.उद्या पासून श्री विष्णु पुराणातील सर्वांत इंटरेस्टिंग असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रातील अदभुत,अतर्क्य आणि लोकप्रिय कथा!
श्री विष्णु पुराण अंश-४/ भाग -१० (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७
Vishnu Puran Kaliyug Story Rishi Parashar by Vijay Golesar