अधिक मास विशेष
श्री विष्णु पुराण अंश – ४ (भाग ५)
जन्हु, जमदग्नी व विश्वामित्र
जन्हू राजाने गंगा नदी पिऊन टाकली
या भागात आपण पराशर ॠषींनी सांगितलेल्या जन्हु, जमदग्नि आणि विश्वामित्र या सुप्रसिद्ध ॠषींच्या कथा पाहणार आहोत.
“पुरूरव्याला सहा पुत्र होते. ते म्हणजे आयु, अमावसु, विश्वावसु, श्रुतायु, शतायु आणि अमितायु असे आहेत. त्यांच्यापैकी जो अमावसु होता त्याचा पुत्र भीम – त्याचा कांचन सुहोत्र व त्याचा जन्हू होय. एकदा या जन्हुच्या इथे यज्ञशाळेत गंगेचे पाणी शिरले असता यज्ञपुरुषाला आपल्या देहात सामावून घेऊन त्याने रागाच्या भरात सगळीच्या सगळी गंगा पिऊन घेतली होती. त्यावेळी सर्व ऋषिमुनींनी व देवांनी मिळून त्याची विनवणी केल्यावर त्याने तिला पुत्रीच्या रूपाने सोडून दिली व तेव्हा तिला ‘जान्हवी’ असे आणखी एक नाव प्राप्त झाले.
जन्हूचा पुत्र सुमंत त्याचा अजक अजकाचा बलाकाश्व त्याचा कुश त्याचे कुशाम्ब, कुशनाभ, अधूर्न्तरजा आणि बसु असे चार पुत्र होते. त्यातला जो कुशाम्ब होता त्याने आपल्याला इंद्रासमान बलशाली पुत्र व्हावा अशा ईर्षेने तपश्चर्या केली; मग आपल्याहून श्रेष्ठ कुणी असू नये या हेतूने इंद्रच त्याचा पुत्र म्हणून जन्मला. त्याचे नाव गाधि होते तरी त्याला कुशाचा पुत्र असल्यामुळे ‘कौशिक’ असेही म्हणतात.
या गाधिच्या सत्यवती नावाच्या मुलीचा विवाह भृगुपुत्र ऋचिक याच्याशी झाला. गाधिच्या मनातून त्याला मुलगी द्यायची नव्हती म्हणून त्याने एक हजार श्यामकर्ण अबलख घोडे मागितले. तेव्हा ऋचिकाने तेवढे घोडे वरुणाकडून मागून आणले आणि गाधिला दिले. तेव्हा तो विवाह झाला.
नंतर एकदा त्याने पुत्राच्या इच्छेने दोन चरु (यज्ञातील खीर) बनविले आणि त्यातला एक पत्नीला देऊन म्हणाला की, तो चरू तिच्यासाठी असून जो दुसरा आहे तो श्रेष्ठ क्षत्रिय पुत्र होण्यासाठी तिच्या आईने खावा. नंतर तो वनात निघून गेला.
इकडे सत्यवतीने व तिच्या आईने त्या चरूंची आपसांत अदलाबदल करून ते खाल्ले. ऋचिक जेव्हा वनातून परतला तेव्हा पत्नीला पहाताच त्याला झालेला चरूंचा घोटाळा कळला. तेव्हा तो खेदाने बोलला की “तुम्ही दोघींनी मोठीच चूक केली आहे. त्याचा परिणाम असा होईल की सत्यवतीला होणारा पुत्र हा वीरवृत्तीचा निपजेल व तिच्या मातेला होणारा पुत्र जपी, तपी आणि ब्राह्मण वृत्तीचा निपजेल.’
त्यावर सत्यवतीने त्याचे पाय धरून अपराधाची क्षमा मागितली व क्षत्रियाचे गुण पुत्रात न उतरता ते नातवात उतरावेत असा काही उपाय करण्याची विनंती केली. तेव्हा पती म्हणाला- “बरे! तर मग तू म्हणतेस तसेच होवो!”
पुढे सत्यवतीला जमदग्नि हा पुत्र झाला आणि तिच्या आईच्या पोटी विश्वामित्र जन्मला; नंतर ती सत्यवती कौशिकी नावाची नदी बनली.
इक्ष्वाकू वंशातील रेणु नावाच्या राजाची मुलगी रेणुका हिच्याशी जमदग्निचा विवाह झाला. त्यांच्या चार पुत्रांतला एक होता ‘परशुराम’! तो लोकगुरू नारायण याचा अंशावतार असून त्याने क्षत्रियांचा प्रचंड प्रमाणात संहार केला. विश्वामित्राला देवांनी शुन:शेष नावाचा पुत्र दिला.
त्याशिवाय त्याला देवरात, मधुच्छंद, धनंजय, कृतदेव, अष्टक, कच्छप, हारीतक, वगैरे आणखीही पुत्र झाले. त्यांच्यापासून पुढे कौशिक वंश आणखी बहरत गेला.”
चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माता- काश्यवंश!
पराशरांचे कथन पुढे चालू झाले. “पुरुरव्याचा थोरला पुत्र जो आयु,
त्याची पत्नी ती राहूची मुलगी. त्या उभयतांना नहुष, क्षत्रवृद्ध, रंभ, रजि व अनेना असे पाच पुत्र झाले. त्यातील क्षत्रवृद्ध याचा पुत्र सुहोत्र होय. सुहोत्राचे तीन पुत्र असून त्यांची नावे – काश्य, काश आणि गृत्समद अशी होती.
त्यांपैकी गृत्समदाच्या शौनक नावाच्या पुत्राने चातुर्वर्ण्य व्यवस्था अंमलात आणली. काश्याचा पुत्र काशीनरेश काशेय हा होता. त्याचा पुत्र राष्ट्र – त्याचा दीर्घतपा – त्याचा धन्वंतरी होता. या धन्वंतरीचा देह अजरामर आणि त्रिकालाबाधित असा होता. पूर्वजन्मात त्याला भगवांन नारायणाचा वरप्रसाद लाभला होता.
त्याने पर्वतप्राय अशा आयुर्वेदाचे आठ विभाग केले होते व यज्ञातील आहुती त्यालाही मिळतात. धन्वंतरीला केतुमान् नामक पुत्र झाला -त्याचा भीमरथ- त्याचा दिवोदास व त्याचा प्रतर्दन झाला. त्याने मद्रश्रेण्य या वंशाचा नाश करून समस्त शत्रू जिंकले होते, त्यामुळे तो शत्रुजित म्हणूनही ख्यातनाम झाला.
बालपणापासून त्याचा पिता दिवोदास हा लाडाने त्याला ‘वत्स’ अशी हाक मारीत असे त्यामुळे त्याचे वत्स हे नावसुद्धा प्रसिद्ध झाले. तो सत्याचा अत्यंत उपासक होता म्हणून त्याना ‘ऋतुध्वज’ अरोही लोक म्हणत असत. पुढे त्याला कुनलय नावाचा दुर्मीळ अशा जातीचा घोडा प्राप्त झाला म्हणून ‘कुवलयाथ’ या नावानेसुद्धा लोक त्याचा उल्लेख करीत,
या वत्साचा अलर्क नावाचा एक पुत्र होता, त्याला सहासष्ट हजार वर्षांचे आयुष्य लाभले होते. तसाच तो आयुष्यभर चिरतरुण राहिला, या अलर्काचा पुत्र होता सन्नति -त्याचा सुनिथ -त्याचा सुकेतु -त्याचा पुत्र धर्मकेतु -त्याचा सत्यकेतु – त्याचा विभु- त्याचा पृष्टकेतु- त्याचा बीतिहोत्र सुविभु -त्याचा सुकुमार -त्याचा भार्ग व त्याचा भार्गभूमि
या भार्गभूमिच्या काळापासून समाजात चातुर्वर्ण्य रचना अमलात आली.”
‘रजि’चा वंशविस्तार!
“राजा रजि याला पाचशे मुलगे होते. एकदा देव व दैत्य यांनी युद्धाच्या प्रारंभी जाऊन ब्रह्मदेवाला विचारले की, जय मिळावा यासाठी काय करावे? त्यावर ब्रह्मदेव म्हणाला की, ज्यांच्या बाजूने रजि उभा राहिल ते जिंकतील,
मग दैत्यांनी रजिकडे जाऊन साहाय्य मागितले. तेव्हा तो म्हणाला की जर तुम्ही जिंकल्यानंतर मला तुमचे इंद्रपद देणार असाल तर मी तुमच्या बाजूने लढायला उभा राहिन, त्यावर दैत्यांनी सांगितले की, त्यांचा इंद्र प्रल्हाद आहे. तेव्हा रजिची अट मान्य करता येत नाही आणि ते निघून गेले.
नंतर जेव्हा देवगण रजिकडे मदतीसाठी आले तेव्हा त्याने इंद्रपद देण्याची अट घातली व ती देवांनी मान्य केली; मग प्रत्यक्ष युद्धाला आरंभ झाला आणि रजिच्या आधिपत्याखाली दैत्यसैन्याचा पुरता बीमोड झाला. त्यानंतर देवराज इंद्राने रजिच्या चरणांवर डोके ठेवले व प्रार्थना केली की भयापासून मुक्त करून आम्हाला अन्नदान केल्यामुळे आपण आमचे पिता असून श्रेष्ठ आहात व मी तुमचा पुत्र आहे.
तेव्हा त्याचा हेतू ओळखून राजा हसला व म्हणाला “ठीक आहे! शत्रू जरी शरण आला तरी त्याची उपेक्षा केली जात नसते; मग तू तर आमच्याच पक्षाचा आहेस.” असे बोलून तो आपल्या राजधानीकडे गेला.
अशा प्रकारची युक्ती करून इंद्राने आपले स्थान अबाधित राखले. पुढे कालांतराने जेव्हा रजिचे देहावसान झाले तेव्हा नारदांनी ती घटना त्याच्या सर्व पुत्रांना सांगितली; मग त्यांनी इंद्रापाशी जाऊन आपले राज्य परत मागितले.
तेव्हा इंद्राने नकार दिल्यावर त्यांनी स्वर्गभूमीवर हल्ला केला आणि इंद्राला हरवून इंद्रपद घेतले. त्यानंतर बराच मोठा काळ निघून गेला; मग एके दिवशी इंद्र बृहस्पतीला एकांतात भेटला व आपले पद पुन्हा मिळावे याकरीता त्याची विनवणी करू लागला. त्यावर गुरूने त्याला इंद्रपद परत मिळवून देईन असे वचन दिले.
मग देवगुरू बृहस्पतीने रजिच्या पुत्रांची बुद्धी भ्रष्ट व्हावी व इंद्राचे तेज वाढावे यासाठी तांत्रिक व मांत्रिक प्रयोगांना आरंभ केला. त्यांचा परिणाम होऊन रजिचे पुत्र वेदविरोधी, ब्राह्मद्वेष्टे बनले व धर्म त्याचप्रमाणे आचार यापासून भ्रष्ट झाले. तेव्हा इंद्राने त्यांच्यावर हल्ला चढवून मारून टाकले व बृहस्पतीच्या मदतीने इंद्रपदावर स्थानापन्न झाला.अशी ही इंद्राची पुनरागमनाची कहाणी जो कुणी श्रवण करील तो कधीच पदच्युत होणार नाही आणि त्याची बुद्धी तल्लख होईल.
आयुचा दुसरा पुत्र रंभ हा निःसंतान राहिला.
तिसरा जो क्षत्रवृद्ध होता त्याचा पुत्र प्रतिक्षत्र त्याचा संजय त्याचा जय त्याचा विजय त्याचा कृत- त्याचा हर्यधन- त्याचा सहदेव- त्याचा अदीन- त्याचा जयत्सेन त्याचा संस्कृति व त्याचा क्षत्रधर्मा असा वंश विस्तार आहे.”
श्री विष्णु पुराण अंश-४ भाग -५ ( क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल- ९४२२७६५२२७
Vishnu Puran Janhu Raja Ganga River Vijay Golesar