अधिक मास विशेष लेखमाला
श्री विष्णु पुराण (भाग १४)
गुरुशिष्य ऋभु आणि निदाघ यांची कहाणी!
काल आपण श्री विष्णु पुराणातील जडभरत आणि सौवीर राजाची प्रसिद्ध कहाणी पहिली आजच्या भागात ‘ऋभु आणि निदाघ’ या जगावेगळ्या गुरुशिष्याची आत्मबोध करणारी कहाणी पाहणार आहोत.
पराशर मैत्रेयास म्हणाले, ” भरताचे म्हणणे ऐकल्यावर राजा विचारात बुडून गेला आणि न बोलता चुपचाप बसला. त्याला तसा बसलेला बघून भरत पुढे सांगू लागला. तो म्हणाला-
” राजा याच विषयाच्या संदर्भात महात्मा निदाघ यांनी केलेला उपदेश मी तुला आता ऐकवतो.
ऋभु हा ब्रह्मदेवाचा पुत्र असून तो उपजतच आत्मज्ञानी होता. त्याचा शिष्य ‘निदाघ’ नावाचा असून तो महषी पुलस्ती यांचा मुलगा होता. ऋभुंनी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला आत्मज्ञानाचा उपदेश दिला होता पण त्यांना असे आढळून आले की सर्व विद्यांची प्राप्ती होऊन सुद्धा निद्राघाच्या मनातून द्वैतभावना काही गेलेली नाही.
देविका नावाच्या नदीच्या किनारी ‘वीरनगर’ नावाच्या एका नगरीत निदाघ रहात असे. एकदा फिरत फिरत माध्यान्हीच्या सुमारास ऋभु त्याच्या घरी अतिथीच्या रूपाने गेले. निदाघाने त्यांचे यशोचित स्वागत केले आणि जेवून जाण्याचा आग्रह केला. तेव्हा त्यांनी मधुर व स्वादिष्ट अन्न मागितले. निदाघाच्या पत्नीने तसे अन्न राधून त्यांना वाढले.
भोजनोत्तर निदाघाने त्यांची विचारपूस केली की, ते कुठले आहेत, आले कुठून व जाणार कुठे? त्याचप्रमाणे भोजन करून ते तृप्त झाले की, कसे ?त्यावर अतिथीच्या रूपातील ऋभुंनी उत्तर दिले की,
“अहो ब्राह्मणश्रेष्ठ! ज्याला भूक लागते त्याचीच तृप्ती होत असते परंतु मला भूकच लागत नाही अर्थात तृप्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. आता तुम्ही तृप्त होण्याविषयी काय विचारता? जठराग्नी प्रदीप्त झाला की, देहातील धातू क्षीण होतात व भूक लागते व जलाचा अंश कमी झाला की, तहान लागते. म्हणून भूक आणि तहान हे देहाशी संबंधित धर्म आहेत, माझ्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. म्हणून ‘मी’ सदासर्वदा तृप्तच असतो.
आणखी असे पाहा की, तृप्ती अर्थात समाधान ही मनाची वृत्ती आहे. तिचा आत्म्याशी अर्थाअर्थी कोणताच संबंध नाही. तेव्हा हे प्रश्न देहाला व मनालाच विचारा.
आता तुमचे इतर प्रश्न म्हणजे – १. तुम्ही असता कुठे? २. आलात कुणी कडून? ३. जाणार कुठे? तर या प्रश्नांना उत्तर असे –
आत्मा सर्वत्र भरला असल्याकारणाने हे तुमचे प्रश्नच गैरलागू आहेत. ‘मी’ कुठेही जात नाही, कुठूनही येत नाही आणि एकाच जागी वसत नाही. खरी स्थिती अशी आहे की, मी-दुसरा व तू असा फरक ‘मुळातच’ नाही. आणखी असे की, खरोखर गोड व स्वादिष्ट असे काहीच नसते.तरीही मी तुमच्यापाशी मधुर अन्न मागितले; कारण मला तुमचे उत्तर ऐकावयाचे होते.
तुम्ही विचार करून पहा की, आताचे मधुर अन्न काही घटकांनंतर शिळे व बेचव बनते आणि नकोसे वाटतेच ना? तर अशी रूपांतरे या जगात सतत होतच असतात. तेव्हा अशा चर गोष्टींचा त्याग करून चित समदर्शी करीत जाबे कारण समदर्शित्व हाच खरा मोक्षमार्ग आहे.
असे त्या अतिथीचे उद्गार ऐकल्यावर निदाय आश्चर्यचकित झाला व त्याने अतिथीचे पाय धरून विचारले,
“महाराज! कृपा करून मला सांगा की, माझ्या कल्याणासाठी मुद्दाम आलेले आपण खरोखरच कोण आहात. तुमच्या वचनातून मला दिव्यदृशी मिळाली आहे. माझ्यावरचा मायेचा पगडा दूर झाला आहे.
त्यावर आपले खरे रूप प्रकट करून ऋभु बोलू लागले- “अरे! मी तुझा गुरू ऋभु आहे. तुला विवेकबुद्धी देण्याकरताच मी इथवर आलो. मला जे काही दयावयाचे होते ते देऊन झाले आहे. आता तू समदर्शिन्’ होण्यासाठी साधना करीत रहा।”
असे बोलत असतानाच ऋभु त्याच्यासमोरून अदृश्य झाले.
ऋभुंनी दिले निदाघास आत्मज्ञान
या प्रसंगानंतर एक हजार वर्षे उलटून गेल्यावर महर्षी ऋभु पुन्हा एकदा निदाघास ज्ञानोपदेश करावा म्हणून त्या नगरीत वेष पालटून गेले. तिथे गेल्यावर पाहतात तर राजाची स्वारी मोठ्या थाटाने नगरात प्रवेश करीत असून, वनातून दर्भ व समिधा घेऊन आलेला आणि भूकेने व तहानेने व्याकूळ झालेला निदाघ कावराबावरा होऊन रस्त्याच्या कडेला अंग चोरून उभा होता.
ऋभु त्याजपाशी गेले आणि त्यांनी विचारले की, “अहो! आपण असे एका बाजूला उभे का आहात?”
निदाघाने उत्तर दिले-“महाराज! आज राजा नगरीत प्रवेश करतो आहे म्हणून अलोट गर्दी जमली आहे. जाण्यासाठी वाट नसल्यामुळे घरी जाण्यासाठी मी असा थांबून राहिलो आहे.”
ऋभुनी पुन्हा विचारले की, “आपण इथले रहिवासी आहात म्हणून मला असे सांगा की, या गर्दीतला राजा कोणता व प्रजानन कोणते?”
त्यावर निदाघ बोलला – “अहो, जो हत्तीवर आहे तो राजा आणि इतर सर्व प्रजानन आहेत.” तेव्हा पुन्हा ऋभुंनी प्रश्न केला की “हे मला कळले पण हत्ती कोण व राजा कोण? ते कसे ओळखावयाचे ?”
निदाघाने सांगितले की, “अहो ते अगदी सोपे आहे. हत्ती हा खाली असून त्याच्यावर जो बसलेला आहे तो राजा आहे.”
ऋभुंनी प्रश्न केला की, “ते ठीक आहे पण मला जरा अधिक खुलासेवार सांगा की, ‘खाली’ म्हणजे कुठे आणि ‘वर’ म्हणजे कुठे?”
असा प्रश्न ऐकून निदाघ एकदम उडी मारून त्यांच्या खांद्यावर चढून बसला व म्हणाला की, “नीट ऐका. तुम्ही हत्तीप्रमाणे खाली आहात व मी राजाप्रमाणे वरती आहे. तुम्हाला स्पष्ट कळावे म्हणून मी हा प्रयोग केला. “
ऋभु म्हणाले की – “तुम्ही राजाप्रमाणे आणि मी हत्तीप्रमाणे आहे असे म्हणता तर मला हे सांगा की, यांत तुम्ही कोण आहात व मी कोण आहे?” असे ऐकून निदाघ लगेच खाली उतरला व त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून बोलला की, “आता मला पुरतेपणी कळले की आपण माझे सद्गुरूच आहां.”
ऋभु हसून म्हणाले – “अरे! तुझ्या निष्ठापूर्वक सेवेवर प्रसन्न होऊन मी तुझा गुरू ऋभु तुला खरे अंतिम ज्ञान व्हावे एवढ्याचसाठी आलो आहे. ते ज्ञान म्हणजे सर्वत्र एक परमात्माच भरून उरला आहे असे जाणून आपपर भावाचा त्याग करून रहाणे, हेच आहे. परमार्थाचे तेच सार आहे.” असे बोलून महर्षी ऋभु अंतर्धान पावले.
अशी कथा सांगून भरत सौवीर राजाला म्हणाला, “हे धर्मबुद्धे! तू सुद्धा परमात्व तत्त्व जाणून सर्वांशी समभावाने वाग आणि मुक्तीचा लाभ करून घे. अज्ञानी लोकांना आकाश निरनिराळ्या रंगांचे आहे असा भास होतो. परंतु जो ज्ञानी असतो तो खरे आकाश कसे आहे ते ओळखून असतो.
पराशर मैत्रेयांना म्हणाले – “सौवीर राजाने भरताच्या उपदेशानुसार वागून तो अंती मुक्तीस गेला.
अशी ही भरताची कथा श्रद्धेने ऐकावी आणि सांगावी. त्यामुळे बुद्धी स्वच्छ होऊन आत्मजागृती कायम टिकते आणि क्रमाने जन्मांतरी मुक्तीचा लाभ होतो.”
या ठिकाणी पराशर मुनीविरचित श्रीविष्णुपुराणाचा दुसरा अंश संपूर्ण झाला आहे. काल आपण श्री विष्णु पुराणातील ‘जडभरत आणि सौवीर राजाची कहाणी’ पहिली आणि आजच्या भागात ‘ऋभु आणि निदाघ’ या जगावेगळ्या गुरुशिष्याची आत्मबोध करणारी कहाणी पहिली.या दोन कथा म्हणजे श्री विष्णु पुराणातील शिकवणीचा सारांश आहे असे म्हणता येईल.
उद्याच्या भागांत श्री विष्णु पुराण अंश-३ चा शुभारंभ करणार आहोत.
(श्री विष्णु पुराण अंश-२ समाप्त : क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
vishnu puran gurushishya rubhu nidagh story vijay golesar
adhik mas special article