अधिक मास विशेष लेखमाला (भाग ३०)
श्री विष्णु पुराण अंश-३ (भाग -६)
आदर्श गृहस्थ कसा असावा -२
गृहस्थाने हमेशा देव, गायी, ब्राह्मण, सिद्धपुरुष, वृद्ध व गुरू यांचे पूजन करावे. दोन्ही वेळा संध्या वंदन करावे, अग्निहोत्र करावे. संयमाने वागावे व फाटकी नसलेली वस्त्रे नेसावी. केस विंचरलेले असावेत. नीटनेटके राहावे. दुसऱ्याचे द्रव्य लुबाडू नये, तसेच कुणाची खुशामत करण्यासाठी खोटे भाषण करू नये, परनिंदा करू नये, परस्त्रीवर कधी नजर ठेवू नये व वैर करू नये. नदीकाठी मुक्काम करू नये.
दुष्ट, पापी, मस्तवाल व अनेक शत्रू असणारा अशा बरोबर स्नेह धरू नये. स्वैरिणी स्त्री व तिचा पती, नीच, खोटारडा, उधळ्या, परनिंदक अशांची संगत धरू नये. प्रवास करताना कधीही एकट्याने करू नये. पाण्याच्या प्रवाहात धारेच्या विरुद्ध उभे राहून स्नान करू नये. जळत्या घरात शिरू नये व झाडाच्या शेंड्यापर्यंत चढू नये.
दात चावणे, नाकपुडी कोरणे व जांभई आवरणे असे करू नये. खो खो करून हसू नये व जोराने आवाज करीत पादू नये. नखे कुरतडू नयेत. गवत उपटू नये आणि जमिनीवर लिहू नये.
दाढी व मिशीचे केस उपटू नयेत, अशुभ नक्षत्रे निरखू नयेत, नग्न परस्त्री तसाच उगवता व मावळता सूर्य पाहू नये. प्रेताचा व त्याच्या वासाचा तिरस्कार करू नये. चव्हाटा, पवित्र वृक्ष, स्मशान, बाग आणि स्वैरिणी स्त्री यांचा रात्री त्याग करावा. देव व ब्राह्मण यांची सावली ओलांडू नये. ओसाड पडलेल्या घरात एकट्याने राहू नये. केस, हाडे, काटे, अशुद्ध वस्तू, जिथे बळी दिला जातो तिथे, राख व ओल्या जमिनीजवळ जाऊसुद्धा नये.
असंस्कृत व्यक्तिची संगत धरू नये, कपटी माणसाशी दोस्ती करू नये. सापापासून दूरच राहावे व झोपेतून जाग आल्यानंतर लोळत पडू नये. झोप, जागरण, स्नान, व्यायाम ही प्रमाणात असावी. शिंगवाली व सुळे असलेली जनावरे, वावटळ, कडक ऊन यांना टाळावे. स्नान, आचमन व झोप नग्नावस्थेत नसावी. केस न विंचरता आचमन व देवपूजा करू नये.
होम, देवपूजा, आचमन, पुण्याहवाचन आणि जप एक वस्त्र नेसून करू नये. संशयखोर व्यक्तीशी संगत करू नये. ज्ञानी व अज्ञानी अशांबरोबर वादविवाद करू नये. बरोबरीच्या व्यक्तीशी केला तर हरकत नाही.
वाद व वैर बाढवू नये, त्यासाठी थोडेफार नुकसान होत असेल तर ते सोसावे. आदरणीय व्यक्तींसमोर पायांवर पाय ठेवून बसू नये. पाय पसरून बसू नये, त्याचप्रमाणे उच्चासनावर बसू नये.
देऊळ, चव्हाटा, शुभ वस्तू व पूज्य व्यक्ती यांना डावी टाकून जाऊ नये. चंद्र, सूर्य, अग्नी, पाणी, वायू व थोर व्यक्तींच्या समोर मलमूत्राचा त्याग करू नये. एवढेच नव्हे तर थुंकूही नये. रस्त्यात, जाता-येता लघवी करू नये. थुंकी, विष्ठा, मूत्र व रक्त ओलांडू नये.
स्त्रियांवर फार विश्वास ठेवू नये परंतु त्यांचा कधी अपमानही करू नये. त्यांच्याशी ईर्ष्या करू नये, तसाच त्यांचा तिरस्कारसुद्धा करता नये.
घरातील थोरामोठ्यांना नमस्कार केल्याशिवाय कधी बाहेर जाऊ नये. जो पितरांना पिंडोदक देतो, अतिथीचा सत्कार करतो आणि देवाची व ऋषीची पूजा करतो तो उत्तम गतीला जातो.
जो मनुष्य इंद्रिये आवरतो , वेळप्रसंग जाणून बोलतो तोही उत्तम गती प्राप्त करतो. अवेळी जर ढगांचा गडगडाट होत असेल, पर्वणीकाळ असेल, अशौच (सुतक व सुवेर) असेल आणि चंद्रग्रहण व सूर्यग्रहाण असताना अध्ययन करू नये.
रागावलेल्या मनुष्याला शांत करावा, सर्वांना आधार द्यावा, हेवा कधी करू नये व भ्यायलेल्याला धीर द्यावा म्हणजे स्वर्ग दूर नाही. पाऊसकाळात व कडक उन्हाळ्यात सोबत छत्री असावी. हातात लाठी व पायात पायताण असलेच पाहिजे. चालताना इकडे तिकडे न पाहता समोर चार हात अंतर पाहून चालावे,
सत्य अवश्य बोलावे पण ते गोड वाटावे. जर ऐकणाऱ्याला उद्वेग वाटणार असेल तर मौन पाळावे. त्याचप्रमाणे प्रिय वाटणारे असत्य बोलू नये, असे आदर्श आचरण ठेवावे!”
अशा प्रकारे श्री विष्णु पुराणाच्या तिसर्या अंशात और्य मुनींनी सगर राजाला आदर्श गृहस्थ कसा असावा याचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे हजार वर्षांपूर्वी सांगितलेले हे नियम आजही आपल्या समाजाला तंतोतंत लागू पडतात.
श्री विष्णु पुराण अंश-३ भाग -६ ( क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७
vishnu puran gruhasthashram dos donts by vijay golesar