अधिक मास विशेष-३४
श्री विष्णु पुराण अंश-४ (भाग -१ )
वैवस्वतमनू व इक्ष्वाकूचा वंशविस्तार
‘इला’ उर्फ ‘सुघुम्न’ यांच्या लिंग बदलाची कथा
आज पासून आपण श्रीविष्णु पुराणच्या अंश ४ चा परिचय करून घेणार आहोत. या भागांत पराशर ॠषींनी मैत्रेय मुनींना वैवस्वतमनू व इक्ष्वाकूचा वंशविस्तार आणि ‘इला’ उर्फ ‘सुघुम्न’ यांच्या लिंग बदलाची कथा पाहणार आहोत. हल्ली आपण लिंग बदला विषयी ऐकतो वाचतो परंतु दोन तीन हजार वर्षांपूर्वी वैदिक काळात देखील लिंग बदल होत असत हे जाणुन निश्चितच आश्चर्य वाटते.
मैत्रेयांनी विचारले- “भगवान! सत्कर्माकडे ज्याची ओढ आहे त्याने कसे वागायला हवे ते तुम्ही चांगल्या प्रकारे समजावून दिले. वर्णाश्रम धर्माची पण सविस्तर ओळख करून दिली. आता मला राजवंशांचा विस्तार जाणण्याची इच्छा आहे. तरी तेवढे सांगा.’
पराशर सांगू लागले – “मैत्रेय मुनी! आता मी मनूच्या वंशाचा विस्तार कथन करतो.
या वंशाचे मूळपुरुष स्वतः ब्रह्मदेव हेच आहेत. ती परंपरा श्रवण केल्याने तुमच्या घराण्याचे दोष नष्ट होतील. तो विस्तार असा आहे :
सर्व सृष्टीला मूळ कारण आहे भगवान् विष्णू. तो अनादि असून तीन वेद (ऋक्, यजु व साम) हे त्याचे स्वरूप आहे. अशा त्या निराकार केवळ ब्रह्मातून ब्रह्मांडरूपी हिरण्यगर्भ ब्रह्मदेव साकार होऊन प्रकटले.
मग त्यांच्या डाव्या अंगठ्यातून दक्षप्रजापती जन्मला. दक्षापासून अदिती झाली. अदितीपासून विवस्वान् आणि विवस्वानापासून मनू जन्मला. या मनूचे दहा पुत्र असून त्यांची नावे – १. इक्ष्वाकू, २. नृग, ३. धृष्ट, ४. शर्याति, ५. नरिष्यना, ६. प्रांशी, ७. नाभाग, ८. दिष्ट, ९. करुष, १०. पृषध्र अशी आहेत.
नंतर मनूने पुत्राच्या इच्छेने ‘मित्रावरुण’ नावाच्या जुळ्या देवांप्रीत्यर्थ एक यज्ञ केला. तेव्हा अशी घटना घडली की, संकल्पात काही चूक झाल्यामुळे पुत्र न होता ‘इला’ नावाची कन्या जन्मली. पुढे मित्रावरुणाची होऊन ती इला मनूचा सुघुम्न नावाचा पुत्र बनली.
कालांतराने महादेवाच्या शापाने पुन्हा स्त्रीत रूपांतर होऊन तिचा चंद्रपुत्र बुध याच्याशी संबंध आला आणि त्याच्यापासून तिच्या पोटी पुरूरवा नावाचा पुत्र जन्मास आला.
त्यानंतरही पुन्हा तिला पुरुषत्व मिळावे याकरीता परमर्षिगणांनी एक यज्ञ केला. त्याचे फळ म्हणून इला पुनश्च सुद्युम्न बनली. पुढे त्याला उकल, गय व विनत असे तीन पुत्र झाले परंतु मुळात स्त्री असल्यामुळे राज्याधिकार मात्र मिळू शकला नाही.
तरीही वसिष्ठांच्या आज्ञेवरून पित्याने त्याला प्रतिष्ठान नावाचे नगर दिले. ते त्याने पुरूरव्याला दिले. पुरुरव्याचे वंशज पुढे सर्व दिशांना क्षत्रिय होऊन फैलावत गेले.
मनूचा पृषध्र नावाचा पुत्र गुरूच्या गाईचा वध केल्यामुळे शूद्र बनला. मनूचा आणखी एक पुत्र करूष याचे वंशज कारूष नावाचे क्षत्रिय झाले. मनूचा आणखी जो दिष्ट नावाचा पुत्र होता तो वैश्य बनला होता. त्याचा पुत्र बलन्धन हा असून त्याचा वत्सप्रीति त्याचा प्रांशु त्याचा प्रजापती त्याचा खनित्र त्याचा चाक्षुष त्याचा विंश त्याचा विविंशक त्याचा खनिनेत्र त्याचा अतिविभूति – त्याचा करन्धम- त्याचा अविक्षित् व त्याचा मरुत्त नावाचा अत्यंत बलशाली व पराक्रमी पुत्र होऊन गेला. त्याच्याबाबतीत अद्यापही असे म्हणतात की,
मरुत्तासारखा यज्ञ या पृथ्वीतलावर कुणीच केला नाही. एकूण एक पात्रे त्यात सोन्याची असून मरुद्वण बाढीत होते व इंद्रासह सर्व देव तसाच ब्राह्मणवर्ग पूर्णपणे तृप्त झाला होता. अशा त्या मरुत्ताला नरिष्यन्त नावाचा पुत्र होता.
त्याचा राजवर्धन त्याचा सुद्धि त्याचा त्याचा मान त्याचा वेगवान त्याचा बुध त्याचा तृणबिंद्रा या तृणबिंदला इलविला नावाची मुलगी होती परंतु नंतर अलंबुषा नावाच्या असोशी त्याचा संबंध आला आणि तिला त्याच्यापासून विशाल नावाचा पुत्र झाला. त्याने पुढे विशाल नावाचे नगर वसविले
या विशालाचा पुत्र हेमचंद्र त्याचा चंद्र त्याचा त्रास त्याचा संजय त्याचा सहदेव त्याचा सहदेव सोमदत्त असा वंश वाढत गेला. त्या सोमदत्ताने शंभर अयमेध यज्ञ केले मग त्याला जनमेजय नावाचा पुत्र झाला. जनमेजयाचा पुत्र सुमति, असा सर्व विशालाचा वंशाचा विस्तार आहे.
आता मनूच्या शर्याति नामक पुत्राविषयी ऐका. त्याला सुकन्या नावाची एक कन्या होती तिचे लग्न च्यवन ऋषीशी झाले होते. शर्यातिला आन नावाचा एक मोठा धर्मपरायण पुत्र होता. तो कुशस्थळी या नगरात रहात असे व त्याला रैवत नावाचा एक पुत्र होता.
या रैवताचा ‘रैवत ककुद्मी’ नावाचा अत्यंत धार्मिक असा पुत्र होता. तो शंभर भावांमधला सर्वात थोरला होता. त्याला रेवती नावाची एक कन्या झाली; मग एकदा तिच्यासाठी योग्य वर कोणता? असे ब्रह्मदेवालाच विचारावे या उद्देशाने तिला घेऊन तो ब्रह्मलोकात गेला. तेव्हा ब्रह्मदेवाच्या दरबारात दोन गंधर्वांचे गायन चालले होते म्हणून तो रेवत दोन घटका थांबला.
गायन संपले तेव्हा पुढे होऊन त्याने आपला प्रश्न ब्रह्मदेवाला विचारला. तेव्हा ब्रह्मा म्हणाला “तुला कोणकोणते बर पसंत आहेत ते सांग.” मग त्या रैवताने बऱ्याच मुलांची नावे सुचविली.
तेव्हा ब्रह्मा हास्य करून बोलला की, आता त्या सर्वांपैकी कुणाचीही पृथ्वीवर नावनिशाणीसुद्धा उरलेली नाही; कारण तू एक मुहूर्तभर जे गायन ऐकलेस तेवढ्या काळात पृथ्वीवर, चार युगांची एक चौकडी अशा २७ चौकड्या संपून सांप्रत २८व्या चौकडीतील द्वापारयुग चालू आहे. तुझ्या वंशापैकी फक्त तू एकटाच उरला आहेस, तेव्हा अन्य कोणत्याही चांगल्या वराशी या कन्येचा विवाह कर.”
त्यावर रैवताने प्रणाम करून विचारले की, ब्रह्मदेवाने एखादा उत्तमपैकी वर सुचवावा, तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागला.
हे पहा या सर्व ब्रह्मांडांना आदिकारण एकमेव विष्णू आहे, त्याचा आदि-अंत, कार्यकलाप कुणीही जाणत नसून तो सनातन व एकमेव परमात्मा आहे. त्याला रूप नाही की त्याचे नाव नाही, तोच परमात्मा असून त्याच्या सत्तेनेच मी उत्पत्ती करतो, रूद्र हा क्रोधरूपाने संहार करतो आणि विष्णू पालन करतो. आम्ही तिथेही त्याचेच अंश आहेत,
तोच अग्नी बनतो, तोच पृथ्वी बनतो, इंद्र, चंद्र, सूर्य, प्राण, वायू, अन्न व अंतराळ यांच्याद्वारे तोच सर्व घडवीत असतो पण एवढे करूनही तो नामानिराळाच असतो. तो स्वयंभू व सर्वतंत्र स्वतंत्र असून सध्या त्यानेअंशरूपाने धरतीवर अवतार घेतलेला आहे. तुझी पूर्वीची कुशस्थळी हीनगरी सध्या अस्तित्वात नसून ती द्वारकापुरी या नावाने ओळखली जाते. तिथेच तो बलदेव नावाचा अंशावतार रहातो.
हे दैवता! तू तुझी मुलगी रेवती हिचा विवाह त्याच्याशी लावून दे, तो लोकप्रिय आहे.”
पराशर म्हणाले – “ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार प्रजापती रैवत पृथ्वीवर येऊन पाहतो तर मानवप्राणी बेताच्या उंचीचे, निस्तेज व बुद्धिहीन असे दिसले. ती त्याची कुशस्थळी नगरी पूर्णतया बदलून गेली होती.
तरीही त्याने बलरामशी तिचा विवाह लावून दिला परंतु एक अडचण अशी उभी राहिली की, ती बलरामापेक्षा कितीतरी पट उंच होती. बलराम तर तिच्या अंगठ्याएवढा होता.
मग बलदेवाने तिच्या माथ्यावर आपला नांगर ठेवून दाब दिल्यावर ती इतर स्त्रियांसारखी बेताच्या उंचीची झाली; नंतर त्यांचा विधीनुसार विवाह पार पडला. एवढे झाल्यानंतर रैबत तपश्चर्या करावी म्हणून हिमालयाच्या दिशेने निघून गेला. ” चक्क, राजाने दिला बालकाला जन्म
‘मान्धाता’ची जन्मकथा!
पराशर सांगू लागले – ‘रैवत ब्रह्मलोकी गेल्यानंतर पुण्यजन नावाच्या राक्षसांनी त्याच्या कुशस्थळी नगराचा बिध्वंस केला. तेव्हा रैवताचे शंभर भाऊ भीतीने दहा दिशांना पळून गेले. त्यामुळे सर्व दिशांना क्षत्रिय प्रजा वाढली. धृष्टाच्या वंशात जे जन्मले ते धार्ष्टक क्षत्रिय होत.
नाभागाचा पुत्र अंबरीष – त्याचा विरूप – त्याचा पृषदश्व त्याचा रथीतर झाला. त्याचे वंशज क्षत्रिय कुळांतील असूनही क्षत्रोपेत आंगिरस ब्राह्मण बनले.
मनूला एकदा शिंक आली असता त्यातून ‘इक्ष्वाकू’ नावाचा पुत्र जन्मला. त्याच्या शंभर पुत्रापैकी विकुक्षि, निमि व दंड हे तिघे मुख्य होते. त्यांचे शकुनि वगैरे पन्नास पुत्र उत्तर देशात व अठ्ठेचाळीस पुत्र दक्षिण देशात राज्यकर्ते बनले.
अशा त्या इक्ष्वाकूने एकदा अष्टकाश्राद्ध आरंभले. तेव्हा त्याने बिकुक्षि या पुत्राला श्राद्धासाठी योग्य मांस आणावयास सांगितले; मग विकुक्षि धनुष्यबाण घेऊन बनात गेला आणि अनेक पशूंना त्याने मारले परंतु अत्यंत भूक लागल्यामुळे त्याने एक ससा भाजून खाल्ला व बाकीचे सर्व मांस नेऊन पित्याला दिले.
त्या मांसाचा नैवेद्य दाखविण्यासाठी विनंती केली असता मुख्य आचार्य वसिष्ठ यांनी सांगितले की, विकुक्षिने मांस आणेतवेळी त्यातून एका सशाचे मांस अगोदरच चोरून खाल्ले असल्यामुळे ते मांस उष्टे व अपवित्र झाले आहे. अर्थात ते नैवेद्यासाठी चालणार नाही. तेव्हांपासून विकुक्षिचे नाव शाशद असे पडले व पित्याने त्याला हाकलून दिले.
पुढे पिता मेल्यानंतर तो राज्यावर बसला आणि नीतिधर्मानुसार राज्यकारभार केला. त्याच्या पुत्राचे नाव होते ‘पुरंजय’। त्याचे आणखीही एक नाव ‘ककुत्स्थ’ असे होते. ते नाव पडण्याचे कारण असे झाले की, पूर्वी त्रेतायुगात देव आणि असुर यांच्यात एक प्रचंड लढाई झाली, त्यात देव हरले आणि त्यांनी विष्णूची प्रार्थना केली.
त्याने प्रसन्न झालेल्या विष्णूने त्यांना अभय दिले व असे सांगितले की, राजा शशादाचा जो पुरंजय नावाचा पुत्र आहे त्याच्या शरीरात मी प्रवेश करीन व दैत्यांचा संपूर्ण नायनाट करीन तरी तुम्ही सर्व जण जाऊन पुरंजयाच्या नेतृत्वाखाली लढाईची तयारी करा, तेव्हा सर्व देव पुरंजयापाशी गेले व त्याला इत्यंभूत हकीकत सांगून नेतृत्व करण्यासाठी विनविले.
तेव्हा पुरंदराने त्यांचे म्हणणे एका अटीवर मान्य केले आणि ती अट म्हणजे तो इंद्राच्या खांद्यावर बसूनच युद्ध करील, ती अट सर्वांनी मान्य केली व इंद्राने बैलाचे रूप घेतले; मग पुरंजयाने फार त्वेषाने युद्ध करून सर्व दैत्यांचा संहार केला.
कुकुद् या शब्दाचा अर्थ खांदा असा होतो म्हणून पुरंजयाला ‘ककुत्स्थ’ (खांद्यावर बसणारा) या नावाने प्रसिद्धी मिळाली; मग पुढे ककुत्स्थाला पुत्र झाला तो अनेना -त्याचा पुत्र पृथु -त्याचा विष्टराश्व त्याचा चान्द्रयुवनाश्च- त्याचा शावस्त (त्याची राजधानी शावस्ती) – त्याचा बृहदश्व -त्याचा कुवलयाश्च (याने धुन्धु नावाच्या राक्षसाला मारले म्हणून तो ‘धुन्धुमार’) असे होते पण कुवलयाश्वाच्या एकवीस हजार पुत्रांतून फक्त दृढाश्च, चन्द्राश्च आणि कपिलाश्च हे तिघे सोडून बाकीचे युद्धात मरण पावले.
दृढाश्वाचा पुत्र तो हर्यश्च त्याचा निकुंभ त्याचा अमिताश्च त्याचा कृशाश्च – त्याचा प्रसेनजित् – त्याचा युवनाश्व असे झाले. हा युवनाश्च नि:संतान होता म्हणून त्याच्या प्रार्थनेवरून मुनि लोकांनी एक यज्ञाचे आश्रमात अनुष्ठान केले.मध्यरात्रीच्या सुमारास यज्ञाची सांगता झाली. तेव्हा मुनींनी मंत्रविलेले तीर्थ एका कलशात भरले व तो कलश एका बाजूस ठेवून ते झोपी गेले.
नंतर राजाला फार तहान लागली म्हणून तो उठला व पाण्याच्या शोधार्थ आला असता, ऋषिलोकांना न उठवता त्या कलशातील पाणी पिऊन निघून गेला. सकाळी उठल्यानंतर ऋषींनी तो तीर्थाचा कलश रिकामा पाहिला व चौकशी केली तेव्हा सर्व हकीकत समजली. खरे तर ते तीर्थ युवनाश्वाच्या पत्नीसाठी होते.
त्याचा परिणाम असा झाला की, युवनाश्वाच्या पोटात गर्भ वाढीस लागला व दिवस पूर्ण भरताच राजाची उजवी कूस फाडून बाहेर पडला. परंतु त्यामुळे राजा न मरता सुखरूप राहिला.
मग ऋषींना असा प्रश्न पडला की तो बालक काय पिऊन जगेल? तेव्हा इंद्राने प्रगट होऊन त्यांना आश्वासन दिले की, ती जबाबदारी तो घेईल. असे झाले म्हणून त्या बाळाचे नाव ‘मान्धाता’ ठेविले; मग इंद्राने आपल्या हाताची तर्जनी त्याच्या मुखात दिली. ती चाखताच तो एकाच दिवसात वाढ होऊन पूर्ण पुरुष बनला.
या चक्रवर्ती मान्धात्याची पत्नी बिंदुमती नावाची होती. तिच्यापासून त्याला पुरुकुत्स, अंबरीष आणि मुचकुंद असे तीन मुलगे झाले. शिवाय आणखी पन्नास कन्याही झाल्या.
श्री विष्णु पुराण अंश-४ भाग -१ (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७
vishnu puran gender transformation by vijay golesar