अधिक मास विशेष लेखमाला
श्री विष्णु पुराण (भाग -४)
सुप्रसिद्ध ध्रुवाख्यान
अर्थांत ध्रुवाची तपसाधना
लहानपणी शाळेत असल्यापासून बाळ धृव किंवा भक्त धृव यांची कथा आपण ऐकलेली आणि वाचलेली आहे. भक्त धृव नावाचा एक हिंदी चित्रपटही अतिशय लोकप्रिय झाला होता. तर आपल्या अतूट श्रद्धेने आणि अविरत प्रयत्नानी अढळपद प्राप्त करणार्या भक्त ध्रुवाची कथा विष्णु पुराणात आहे. हजारो वर्षांपूर्वी पराशर ॠषींनी मैत्रेय मुनीना सांगितलेली तिच कथा आज आपण पाहणार आहोत.
स्वायुंभव मनूला दोन मुलगे होते. एक प्रियव्रत व दुसरा उत्तानपाद! उत्तानपादाला दोन बायका होत्या. एकीचे नाव सुनिती व दुसरी जी पट्टराणी होती तिचे नाव होते सुरुचि, ती राजाची आवडती होती व तिला उत्तम नावाचा एक पुत्र होता. सुनिती या नावडत्या पत्नीला ध्रुव नावाचा एक पुत्र होता.
एकदा पाच वर्षांचा ध्रुव दरबारात गेला व एकदम बापाच्या मांडीवर जाऊन बसला पण राजाने व सुरुचिने त्याला दूर सारून उत्तमाला जवळ घेतला. तेव्हा अपमान, राग व दुःख असह्य होऊन ध्रुव घरी परतला. त्याच्याकडून नाराजीचे कारण समजून घेतले तेव्हा त्याची आई म्हणाली,” बाळा! तू खरोखरच फार दुर्दैवी अशा गोष्टी या पूर्वजन्मांतील कर्मावर आधारित असतात.”
सुरुचिचे व उत्तमचे पूर्वपुण्य फार थोर आहे पण आपले तसे नाही. आपली पूर्वजन्मीची पातके दुसरा कुणीच दूर करू शकत नसतो. ती भोगावीच लागतात म्हणून शांतपणे ती भोगणे व असेल तशा परिस्थितीत सत्कर्मांचे आचरण करीत रहाणे आणि समाधान मानणे हेच चांगले आहे.
परंतु ध्रुवाच्या दुखावलेल्या मनाला आईने केलेला उपदेश काही पटला नाही. तो आईला बोलला की, “ते सिंहासन उत्तमलाच लखलाभ होवो, आता मी अशी तपश्चर्या करीन की, कुणीच दूर लोटणार नाही असे अढळ स्थान मिळवीन”.
एवढे सांगून रागासरशी तिरिमिरीने तो घर सोडून चरफडत बाहेर पडला. पुढे पुढे जात असताना त्याने एका जागी सात मुनी बसलेले पाहिले. त्यांना भक्तिपूर्वक प्रणाम करून तो उभा राहिला. ते सात जण ब्रह्मदेवाचे पुत्र मरिचि, अत्रि, अंगिरा, पुलस्ती, पुलह, ऋतु आणि वसिष्ठ हे होते. त्यांनी चौकशी केली तेव्हा त्याने आपला सर्व वृत्तान्त त्यांना सांगितला. तेव्हा त्यांना मोठे कौतुक वाटले.
त्याचा अढळपद प्राप्त करण्याचा निश्चय ऐकून त्यांनी त्याला उपदेश केला तो असा, “ध्रुवाची जी अपेक्षा आहे, ती एका आदिपुरुष भगवंताशिवाय कुणीही पुरी करून शकणार नाही. तो देव सकल ब्रह्मांडाचे आदिकारण असून परागती आहे. यज्ञपती, यज्ञ व योगेश्वर तो आहे. तो प्रसन्न झाला असता भक्ताला असाध्य असे काहीच नसते. भक्ताने जे मनी धरावे ते त्याला प्राप्त होत असते. तेव्हा ध्रुवाने एकाग्र चित्ताने त्याचीच आराधना करावी”.
त्यावर ध्रुवाने विनंती केली की, ती आराधना कशी करावी ते त्यांनी सांगावे. तेव्हा ते म्हणाले की, “तुझ्या आजोबांनी ज्या ॐ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करून मनूपदाची प्राप्ती करून घेतली त्याच मंत्राचा तूही जप करीत जा.” मग त्यांनी जवळ बसवून त्या ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उपदेश केला ध्रुवाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. ध्रुवानेही सर्वांच्या पायांवर मस्तक ठेवून प्रणाम केला आणि तो तिथून निघाला.
भगवान विष्णुंनी धुवाला दिले अढळपद
ध्रुव पुढे जात जात मधुवन नावाच्या क्षेत्री येऊन पोचला, ते क्षेत्र नंतर शत्रुघ्नाने मथुरा नावाने पुन्हा बसविले. तिथे एक उपद्रवरहित असे स्थान पाहून ध्रुवाने आसन मांडले आणि तो मनोमन ध्यानयुक्त जप करू लागला.
जसजसे त्याचे तप वाढत चालले तसतशी विश्वात खळबळ माजत चालली, पंचमहाभूतांचा तोल सुटू लागला. सप्तलोकात सर्वजण चिंतातुर झाले. सर्व देव-देवता इंद्रापाशी गेले व यावर काही उपाय करण्याची विनंती केली. इंद्राने शोध केला असता त्याला आढळून आले की, त्या दुरवस्थेचे मूळ कारण ध्रुवाची तपश्चर्या हेच आहे.
तेव्हा त्याने ध्रुवाचा निश्चय हाणून पाडावा असा बेत केला. नाना प्रकारचे उपाय योजून त्याने अनेक विघ्ने निर्माण केली व ध्रुवावर सोडली. त्यासाठी देवता, राक्षस वगैरे सर्वांचे साहाय्य घेतले. भीतिदायक असे अनेक प्रकार केले. तरीही ध्रुव बधत नाही असे पाहून अनेक प्रलोभने दाखविली पण ध्रुवाचा निश्चय कायम होता.
तेव्हा अंतिम उपाय म्हणून वैष्णवी मायेने त्याच्या आईचे रूप धारण केले आणि अत्यंत कळवळून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. तिने असेही सांगितले की, जर तो तप सोडून तिच्याजवळ गणार नसेल तर ती प्राणत्याग करील. तरीही त्या बालकाने तिच्याकडे ढुंकूनदेखील पाहिले नाही. तो आपल्या निश्चयावर अढळ राहिला
तेव्हा सर्व प्रकारे हरलेले ते देवगण विष्णूपाशी गेले व ध्रुवाची कामना पूर्ण करून विश्वाला निर्भय करावे, अशी त्याची विनवणी केली. त्यावर श्रीविष्णू म्हणाला, “देव हो! तुम्ही अगदी निश्चिन्त व्हा. ध्रुवाला कोणत्याच पदाचा मोह नाही. तरीही त्याची मनोकामना जी असेल ती मी पूर्ण करीन.”
मग ते सर्व देव निघून गेले. त्यानंतर विष्णू ध्रुवासमोर प्रकट झाला व म्हणाला की, तुझ्या तपाने मी संतुष्ट झालो आहे, तरी तुला काय हवे असेल ते माग. ते शब्द कानी पडताच ध्रुवाने डोळे उघडले तर समोर साक्षात विष्णू उभा होता. आनंदाच्या भरामध्ये भगवंताची स्तुती कशी करावी ते त्याला सुचेना. तो नुसता टकमक पहातच बसला.
मग श्रीविष्णूने आपल्या हातातल्या शंखाचे टोक त्याच्या गालाला हळूच लावले. तेव्हा क्षणार्धात ध्रुव भानावर आला व विष्णूचे स्तवन करून लागला. त्याने ‘सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपादः’ असा आरंभ करून पंधरा श्लोकांनी स्तुती केली. त्यावर देवाने वर मागण्यास सांगितले तेव्हा ध्रुवाने आपली इच्छा सांगितली.
विष्णू म्हणाले “बाळा! मी तुला अढळपद अवश्य देईन. मी तुला नवग्रह, देवगण, पितृदेवता या सर् प्रत्येकाची आयुमर्यादा ठरलेली आहे. कुणी चतुर्युगाची एक चौकड़ी जगतो तर कुणी एक मन्वंतर एवढा जगतो पण तुला मी एक कल्प (२८ मन्वंतरे) एवढे आयुष्य देत आहे. तुझी आईदेखील तारका होऊन तुझ्यासोबत असेल.
जे कुणी ही कथा (ध्रुवाख्यान) भक्तिपूर्वक गातील त्यांना फार मोठे पुण्य मिळेल.
या ध्रुवाच्या स्थानाला केंद्र करून सप्तर्षींसह सर्व विश्व प्रदक्षिणा करित असते.
(श्री विष्णु पुराण क्रमश:)
सादरकर्ते : विजय गोळेसर (मोबा.९४२२७६५२२७)