अधिकमास विशेष लेखमाला
श्री विष्णु पुराण (भाग १०)
डोळ्यांना न दिसणारी सृष्टी कशी आहे?
असे आहे अदृश्य सप्त उर्ध्वलोक!
कालच्या श्री विष्णु पुराण अंश २ भाग -१ मध्ये ध्रुवाचे चुलते प्रियव्रत आणि त्यांचे वंशज तसेच चार ते पाच हजार वर्षांपूर्वी आपल्या ॠषि मुनींना ज्ञात असलेला पृथ्वीचा विस्तार आणि तत्कालीन भरत खंडाचे महात्म्य यांची माहिती ऐकली. आजच्या भागांत पृथ्वीवरील आणखी काही द्वीपे तसेच सात पाताळ आणि आपण सगळे ज्याला घाबरतो त्या नरकाचे पराशर ॠषींनी केलेले वर्णन वाचणार आहोत.
पराशर पुढे म्हणतात – जंबूद्वीपाचा आकार एक लाख योजने एवढा असून ते खाऱ्या समुद्राने वेढलेले आहे. त्याचप्रमाणे दोन लाख योजने विस्तार असलेले ‘प्लक्ष’ नावाचे अजून एक द्वीप आहे. त्याचा अधिपती जो मेधातिथि आहे त्याला सात पुत्र आहेत. त्यांची नावे सुखोदय, आनंद, शिव, क्षेमक, ध्रुव आणि शिशिर अशी आहेत.
ते त्या द्वीपाच्या सात भागांवर राज्य करतात. प्रत्येक भागाच्या सरहद्दीवर एकेक पर्वत आहे. ते म्हणजे गोमेद, चंद्र, नारद, दुदर्भा, सोमक, सुमना आणि वैभाज हे होत. त्या द्वीपावरचे रहिवासी हे चिरंजीव असून तिथे देव व गंधर्व तसेच पुण्यात्मे राहतात. ते नित्य तरुण असून तिथे रोगराई, व्याधी यांची नावनिशाणीही नसते.
त्या द्वीपात सात नद्या वाहतात. त्यांच्या नावाचे स्मरण केले तरी अनुतप्ता, शिखी, बिपाशा, त्रिदिवा. पापांचा नाश होतो. ती नावे अकृभा, अमृता व सुकृता अशी आहेत. त्या नद्यांचे जलपान करणारे रहिवासी जसेच्या तसे निरोगी चिरकालापर्यंत असतात. तिथे म्हणजे प्लक्षद्वीपापासून शाकद्वीपापर्यंत सहा द्वीपात नेहमी त्रेतायुग हे एकमेव युग असते. पाच हजार वर्षे एवढी आयुष्याची मर्यादा तिथे आहे. तिथे आर्यक, कुरर, विदिश्य आणि भावि हे चार जातींचे लोक राहतात व तेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र आहेत.
या बेटाच्या सभोवार ऊसाच्या रसाचा समुद्र आहे. तिथे श्रीहरिला सोमरूपात भजतात.
दुसरे जे शाल्मल नावाचे बेट आहे त्याचा शासक वपुष्मान होता. त्याला श्वेत, हरित, जीमूत, रोहित, वैद्युत, मानस व सुप्रभ असे सात मुलगे असून या बेटाच्या सभोवार ऊसाच्या रसाचा सागर पसरला आहे. सात पर्वत असून सात विभाग आहेत. त्याचप्रमाणे ७ नद्या वाहत असतात. त्या पर्वतांची नावे – कुमुद, उन्नत, बलाहक, द्रोणाचल, कंक, महिष व ककुद्मान अशी आहेत. या द्वीपावर शाल्मल नावाचा एक महाप्रचंड वृक्ष असून या बेटापासून पुढे सुरासागर (दारूचा समुद्र) पसरलेला आहे.
त्याच्यामध्ये कुशद्वीप नावाचे बेट आहे. त्याचा स्वामी ‘ज्योतिष्मान’! त्याच्यानंतर आहे क्रौंचद्वीप. याचा स्वामी ‘द्युतिमान’ ! पुढे शाकद्वीप असून याचा’ स्वामी आहे ‘भव्य’! त्याच्याही पुढे ‘पुष्करद्वीप’ आहे. त्याचा स्वामी ‘सवन’ आहे. प्लक्षद्वीपापासून तो शाक द्वीपापर्यंत प्रत्येक बेटाच्या सभोवार क्रमाने खारा समुद्र, ऊसाच्या रसाचा समुद्र, मदिरा सागर, तुपाचा सागर व दुधाचा सागर असे पसरलेले आहेत.
या प्रत्येक बेटावर सात विभाग असून त्यात पर्वत व अनेक नद्या आहेत.सात राजे असून प्रत्येक द्विपाचा आकर एकाच्या दुप्पट असा आहे.
या द्वीपांवर दैत्य, दानव, मानव, देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, देवगण, महात्मे व पुण्यात्मे राहातात. प्रत्येक द्वीपामध्ये भगवान विष्णूची क्रमाक्रमाने सोम, वायू, ब्रह्म, रूद्र व सूर्य अशा रूपात आराधना केली जाते. प्रत्येक द्वीपावर वर्णव्यवस्था आहे.
शेवटचे व सातवे जे ‘पुष्कर’ नावाचे द्वीप आहे ते सर्वात मोठे असून त्याच्यावर फक्त दोन विभाग आहेत. मधोमध एक मानसोत्तर नावाचा पर्वत आहे. तिथल्या रहिवाशांची आयुष्यमर्यादा दहाहजार वर्षे एवढी आहे. तेथील रहिवासी हे राग, द्वेष विरहित असून कोणताच भेदभाव
नसतो. लौकिक व्यवहार नसून सदासर्वदा सुखदायक वातावरण असते.
आहार-विहार यांची उत्तम व्यवस्था तिथे आहे.
तिथला सभोवार पसरलेला मधुर पाण्याचा सागर कधीही खवळून उठत नाही. त्या द्वीपावर एक भला मोठा वटवृक्ष असून त्यावर ब्रह्मदेवाचे वास्तव्य असते.
अशी ही सात द्वीपे एकानंतर एक अशी सात समुद्रांनी वेढलेली आहेत. या द्वीपांच्या नंतर १०००० योजने लांबरुंद व तेवढाच उंच असा लोकालोक’ नावाचा सोन्याचा पर्वत आहे. तिथे कोणतीच वस्ती नाही. त्याच्यापुढे मात्र घोर अंधार आहे.
अशा या ब्रह्मांडाचे केंद्र आहे ‘पृथ्वी’! ती या सर्वांचा समतोल राखते. पंचभूतात्मक पृथ्वीसहित अखिल ब्रह्मांडाचा विस्तार पन्नास कोटी योजने एवढा आहे आणि उंची ७०००० योजने आहे.
असे आहे पाताळलोक!
पराशर पुढे सांगतात- “या पृथ्वीचा एकूण विस्तार चारी बाजूंनी ७०००० योजनांएवढा आहे. तिच्याखालच्या दिशेला दहा दहा हजार योजनांवर अतल, वितल, नितल, गभस्तिमान, महातल, सुतल व पाताल असे लोक आहेत. तिथल्या भूमीचे वर्णसुद्धा सफेद, काळा, तांबूस, आणि पिवळा असे आहेत. तसेच रेताड, खडकाळ व सोनेरी अशीही जमीन कुठे कुठे आहे. दैत्य, दानव, यक्ष, राक्षस व मोठमोठे नाग असे तिथले रहिवासी आहेत.
महर्षी नारद एकदा देवांना म्हणाले होते की, पाताळ लोक हा स्वर्गापिक्षाही कितीतरी पटीने अधिक सुंदर आहे. तिथल्या नागांच्या अलंकारातील एकेक रत्न पृथ्वीमोलाचे आहे. तिथे दिवसा सूर्याचा प्रकाश असतो पण उष्णता नसते व रात्री चंद्राचा प्रकाश असतो पण थंडी नसते. दैत्यांच्या व दानवांच्या सुंदर सुंदर स्त्रिया ये-जा करीत असतात.
तिथे गीत-संगीताचे सूर सतत गुंजत असतात व सर्व प्रकारचे सुखोपभोग उपलब्ध असतात. अशा त्या सर्व पाताळांच्या खाली विष्णूचा जो शेष नावाचा तमोगुणी अवतार आहे त्याचे वर्णन करणेच अशक्य आहे. त्याचे अनंत असेही एक नाव आहे. तो निर्मळ पांढऱ्याशुभ्र रंगाचा असून त्यावर स्वस्तिकाकार खवले आहेत. त्याला हजारो फणा असून प्रत्येकावर त्रिभुवने प्रकाशित करणारे मणी आहेत.
नांगर व मुसळ ही त्याची शस्त्रे आहेत. त्याची वस्त्रे निळ्या रंगाची असून, अंगावर इतर भूषणें व एकच कुंडल असते. डोळे सदैव लाल असतात. त्याची सेवा शोभा व वारुणी नावाच्या देवी करतात. ही सप्तद्वीपांकित पृथ्वी त्याच्या मस्तकी एखाद्या फुलासारखी शोभून दिसते.
ज्यावेळी तो जांभई देतो तेव्हा पृथ्वी डगमगते. त्याच्या शक्तीचा अंदाज कुणालाच येणार नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात. त्याच्या अंगावरच्या चंदनाच्या उटण्याच्या सुवासाने दिशा सुगंधित होतात. याचीच भक्ती करून गर्गमुनींना ज्योतिश्चक्राचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते.
अशा त्या शेषाने ही पृथ्वी आपल्या डोक्यावर तोलून धरलेली आहे.’
नरकात कोण जातं?
पृथ्वी व पाणी यांच्याखाली नरक आहेत. पातकी लोकांना तिथे नेले जाते. नरक लाखोंच्या संख्येने आहेत व त्या सर्वांवर यमाचे शासन आहे.. निव्वळ पापी लोकांना त्यात टाकून देतात. त्यांची हकीकत अशी आहे.
खोटे बोलणारे लोक ‘रौरव’ नरकात तर घातकी लोक ‘रोध’ नरकात जातात. गळा दाबून मारणारा, मद्यपी, सोनेचोर व त्यांचे साथीदार ‘सूकर’ नरकात जातात. गुरुपत्नीशी व्यभिचार करणारा, माय-बहिणींना भोगणारा व राजदूतांना मारणारा, स्त्रियांची विक्री करणारा, जेलर, घोडे विकणारा व हरिभक्तांना सोडून देणारा असे सर्व ‘तप्तलोह’ नामक नरकात जाऊन पडतात.
याशिवाय सूनेला व मुलीला भोगणारे, वेदनिंदक, गुरूचा अपमान करणारे, नीच स्त्रीला भोगणारे, चोरी करणारे देव, ब्राह्मण व पितर यांची निंदा करणारे, इतरांचा घात करण्यासाठी होमहवन करणारे, वैश्वदेव व नैवेद्य न करणारे, हत्यारे बनवून विकणारे, ढोंगी ज्योतिषी, निष्ठुर, चोरून
एकट्याने जेवणारे, अवैध वस्तूंची विक्री करणारे ब्राह्मण असे पापी लोक.
तसेच पशुपक्ष्यांवर जुलूम करणारे, अभक्ष्यभोजन करणारे, कोळी, आगी लावणारे, मित्रघातकी, जंगले व बगीचे उद्ध्वस्त करणारे, आश्रमधर्माचे पालन न करणारे अशाप्रकारचे असंख्य पापी लोक असून त्यांच्यासाठी लाखो नरक आहेत. पापी लोक नरकवास भोगल्यानंतर कृमी, पशुपक्षी, जलचर, मनुष्य असा जन्म घेत फिरत असतो. जेवढे म्हणून जीव स्वर्गलोकात आहेत तेवढेच नरकात आहेत पण जो मृत्यूपूर्वी प्रायश्चित्त घेतो त्याचा नरकवास टळतो.
तो कसा? तर आपल्या कर्माचा पश्चात्ताप होऊन ज्याला खेद वाटतो त्याच्याकरताच प्रायश्चित्तांची व्यवस्था आहे. त्या सर्वात सर्वकाळ हरिस्मरण करणे हे सर्वश्रेष्ठ प्रायश्चित्त आहे. चित्त प्रसन्न असणे हाच स्वर्ग होय आणि चित्ताला खेद होणे हाच नरक असे जाणून घ्या.
सुख वा दुःख या दोन्ही बाबी वस्तू वा पदार्थांवर अवलबून नसतात,तर त्यांचे कारण मन हे आहे.
शुद्ध जाणीव (ज्ञान) हेच परब्रह्म आहे व ते सर्व ब्रह्मांडाला व्यापून आहे. विपरीत ज्ञान हीच एक अविद्या असून तीच बंधनाचे मूळ कारण होय. विद्या आणि अविद्या यांचे स्वरूप उमगणे हेच ज्ञान आहे.
(श्री विष्णु पुराण अंश-२ क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल ९४२२७६५२२७
vishnu puran brahmand srushti narak vijay golesar
adhik mas article