श्री विष्णु पुराण (भाग ७)
कहाणी प्रल्हादाच्या अविचल भक्तीची!
प्रल्हादाच्या वधाचे प्रयत्न
प्रल्हादाचे चाललेले उद्योग जेव्हा दूतांनी हिरण्यकशिपूला सांगितले तेव्हा त्याचा राग अनावर झाला. त्यासरशी त्याने स्वयंपाक्याला बोलावला आणि प्रल्हादाला अन्नामधून विष द्यावे अशी आज्ञा दिली. त्याप्रमाणे तसे करण्यात आले पण भगवंताचे नाम घेत प्रल्हादाने ते अन्न खाऊनही त्याच्यावर त्या विषाचा काहीही दुष्परिणाम झाला नाही.
ती बार्ता आचाऱ्याने दैत्यराजाला सांगितली. तेव्हा राजाने पुरोहितांना बोलावून घेतले व प्रल्हादावर अघोरी कृत्येचा प्रयोग करण्यास सांगितले. पण त्या पुरोहितांनी प्रल्हादाची भेट घेतली वत्यास समजावण्याचा प्रयत्न केला.
नानाप्रकारे पुरोहितांनी सांगूनसुद्धा प्रल्हाद आपला हेका सोडायला तयार होईना. तेव्हा पुरोहितांनी त्याला धमकी दिली की, जर तो ऐकणार नसेल तर मग त्यांना भयंकर कृत्या सोडून त्याचा जीव घ्यावा लागेल.
प्रल्हादाने उत्तर दिले की, मारणे आणि मरणे या गोष्टी कुणाच्या हाती आहेत? आपल्या बऱ्यावाईट कर्मांची फळे मिळून रक्षण अथवा नाश होत असतो. कर्म हेच जन्मास कारण आहे व तेच बऱ्यावाईट भोगांचे आहे म्हणून नेहमी चांगली कर्मे करीत जावे.
असे बोलणे ऐकल्यावर पुरोहितांच्या अंगाचा अगदी तिळपापड झाला. त्यांना मंत्रप्रयोगाने अघोरी शक्ती जागृत केली व ती त्या बाळ प्रल्हादावरसोडून दिली. तिने क्षणार्धात त्याच्या छातीत त्रिशूळ खुपसला परंतु तो त्रिशूळच मोडून पडला व प्रल्हाद सुरक्षित राहिला.
तेव्हा आपला वार वाया गेला असे पाहताच ती कृत्या उलट फिरली आणि विजेच्या वेगाने जाऊन तिने त्या पुरोहितांवर आघात केला आणि निघून गेली. ते कृत्य पाहून प्रल्हादाला त्या बिचाऱ्या पोटार्थी पुजाऱ्यांचा कळवळा आला आणि त्याने देवाची प्रार्थना करताच ते सगळे जिवंत झाले व त्यांनी जाऊन सर्व वृत्तान्त राजाच्या कानावर घातला.
कृत्येचा प्रयोग निष्फळ झाला असे जेव्हा ऐकले तेव्हा राजाने प्रल्हादाला बोलावला व मांडीवर बसवून प्रेमाने विचारले –
“बाळा प्रल्हादा! तुझा प्रभाव मोठा विलक्षण आहे. तुझ्यापाशी अशी कोणती मंत्रविद्या आहे? की, ही तुझीच काहीतरी शक्ती आहे. तेव्हा प्रल्हाद म्हणाला की, “पिताजी! माझ्याकडे कसलीच विद्या नाही की शक्ती नाही. ज्याच्या हृदयात श्रीअच्युत प्रकट होतो, त्याला अशक्य असे काहीच नसते. जो दुसऱ्याचे वाईट काही इच्छित नसतो, त्याचेही कधी बाईट होत नसते.
पण काया, वाचा, मनाने जर इतरांना पीडा दिली तर मात्र ते कर्म बीज होते व त्याचे दुःखदायक फळ आपणास मिळते. मी कधीही दुसऱ्याचे बाईट चिंतित नसतो, वाईट करत नसतो आणि कुणाबद्दल वाईट बोलत नसतो; मग मला कसले दुःख होणार? तेव्हा जेवढे जमले तेवढे सर्वांबर प्रेम करीत जा.”
हे प्रल्हादाचे भाषण ऐकून हिरण्यकशिपूचा जळफळाट झाला. त्याने दूतांना बोलावून सांगितले की, या पोराचा दूर नेऊन कडेलोट करा म्हणजे याचे तुकडे तुकडे होऊन हा मरेल. तेव्हा त्या दैत्यांनी त्या बालकाला धरून ओढून नेला आणि उंचावरून खाली ढकलून दिला पण जसे एखादे फूल जमिनीवर पडावे तसा तो अलगद जमिनीवर पडला. ते पाहिल्यावर हिरण्यकशिपूने शंबरासुराला बोलावून सांगितले की, हा दुर्बुद्धी कारटा काही केल्या मरत नाही. तरी तू तुझ्या मायावी शक्तींचा वापर कर आणि याला संपवून टाक.
जेव्हा शंबरासुराने राक्षसी माया पसरविण्यास आरंभ केला तेव्हाच विष्णूने प्रल्हादाच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र सोडून दिले व त्या शंबराच्या हजारो माया निष्फळ केल्या मग त्याने त्या बालकावर प्रचंड वादळ सोडले पण हरिकृपेने प्रल्हादास काहीच इजा झाली नाही.
मग तो बालक गुरुगृही गेला. तिथे गुरुजींनी त्याला शुक्राचार्य प्रणित राजनीती शिकविली; नंतर गुरुजी त्याला घेऊन दैत्यराजाकडे आले व प्रल्हादाच्या शिक्षणातील प्रगतीविषयी राजाला सर्व काही कथन केले. राजाने आनंदित होऊन प्रल्हादाला राजनीती व राजधर्म याविषयी प्रश्न केले तेव्हा प्रल्हाद बोलला की, “पिताजी! मी सर्व तऱ्हेची नीतिशास्त्रे शिकलो परंतु मला मनातून कुणाबद्दल आपपरभाव वाटत नाही. मला कुणी शत्रू नाही की, माझा कुणी मित्र नाही. मला एका विष्णु शिवाय दुसरे काहीच दिसत नाही.
अशा परिस्थितीत या नीतिशास्त्रांचा मला काय बरे उपयोग? पिताजी! मी सांगतो ते थोडे ऐकून घ्या. राजसंपदा, लौकिक गोष्टी या नशिबानेच प्राप्त होत असतात. त्याचे कारण खरे म्हणजे पुण्यदायक कर्मे हे आहे. मानवी प्रयत्नांचा तिथे उपयोग नसतो म्हणून पुण्यसंग्रह वाढवीत जावा. नाहीतरी सर्वदा सर्वत्र एकमेव विष्णूच कणाकणात व्यापून राहिला आहे असे ध्यान करीत जावे.
एकदा का असा साक्षात्कार झाला की, मग नेहमी सुखच सुख मिळेल.” अशी वचने ऐकताच दैत्यराज संतापाने लाल झाला आणि त्याने उठून प्रल्हादाच्या छातीवर जोराने लाथ मारली; मग रागाने थरथरत त्याने दैत्यांना बोलावून सांगितले की, या पोराला तुम्ही नागपाशात बांधा व महासागरात नेऊन बुडवा, नाही तर हा सर्व जगाला बुद्धिभ्रष्ट करून सोडेल.
तेव्हा सर्व दैत्यगणांनी त्या बालकाला नागपाशात गुंडाळून महासागरात बुडविला आणि वरून मोठाले पर्वत त्याच्यावर टाकले. तशाही स्थितीत अजिबात न घाबरता प्रल्हाद विष्णूला आळवू लागला
हे राजीवलोचना! चक्रधरा!! गोब्राह्मण प्रतिपालका!!! तुला मी नमन करतो. तूच सृष्टिकर्ता ब्रह्मा, तूच पोषणकर्ता विष्णू आणि संहारक रुद्र आहेस. मुंगीसकट एकूण एक जीव, पंचमहाभूते, मन, बुद्धी, आत्मा, काळ व त्रिगुण यांत तूच भरला आहेस. तूच सर्व कर्मे, कर्मफळे व कर्मभोक्ता आहेस.
योगी ध्यान तुझेच करतात. याज्ञिक आहुत्या तुलाच देतात. अणोरणीयान व महतो महीयान तूच आहेस. तुझी जी पराशक्ती आहे तिला मी वंदन करीत आहे. ती त्रिगुणात्मिका व सर्वतंत्रस्वतंत्र आणि सर्वांच्या पलीकडे आहे. तू नाम व रूप नसणारा, अलिप्त, व सत्तारूप असा आहेस. तरीही देव तुझ्या साकार अवतारांची आराधना करीत असतात.
हे अक्षय व अव्यक्त देवा! जगताच्या आधारा! माझ्या अंतर्यामी तूच आहेस. अर्थात जो मी तो तूच आहेस व जो तू आहेस तोच मी आहे. माझ्यात व तुझ्यात भेदच राहिलेला नाही.
(श्री विष्णु पुराण क्रमश:)
सादरकर्ते : विजय गोळेसर मोबा.९४२२७६५२२७