अधिक मास विशेष लेखमाला
श्री विष्णु पुराण (भाग ६)
प्रल्हादाची अविचल भक्ती कथा
हरिभक्त प्रल्हादावर संकटांचा वर्षाव!
भक्त ध्रुवा प्रमाणेच भक्त प्रल्हाद यांची सुप्रसिद्ध कथा देखील श्री विष्णु पुराणात दिलेली आहे.हिंदू धर्मांत भक्त ध्रुव आणि भक्त प्रल्हाद हे भक्तीचे दोन अत्युच्च शिखरं मानली जातात.आजच्या भागात आपण भक्त प्रल्हाद यांना श्री विष्णुंची भक्ती करतांना कोणते आणि कसे अडथळे आले आणि त्यावर त्यांनी आपल्या अविचल भक्तीद्वारे कशी मात केली तो कथाभाग पाहणार आहोत.
मैत्रेयांनी पुनश्च पराशरांना पुढीप्रमाणे प्रश्न केले. महाराज! आपण म्हणता की, सर्व ब्रह्मांडाचे मूळ श्रीविष्णू हाच आहे. पुन्हा असेही ऐकले आहे की, त्या भक्तराज प्रल्हादाला अग्नि जाळू शकला नव्हता, शस्त्रांचा आणि अस्त्रांचा त्याच्यावर काही परिणाम झाला नव्हता. त्याला बांधून खवळलेल्या दर्यात फेकला तरीही तो वाचला.
अंगावर पर्वत कोसळून सुद्धा त्याला काहीसुद्धा इजा झाली नाही. प्रल्हाद मोठा हरिभक्त असतानाही त्याच्याशी असे वैर कुणी व का करावे? त्याला आगीत व समुद्रात फेकून दिला, पर्वतावरून कडेलोट केला. महाविषारी सर्पांकडून दंश करविला ते का? का म्हणून त्याला हत्तीच्या पायी दिला? का त्याच्यावर महाभयानक कृत्या सोडली? शंबरासुराने राक्षसी मायेचे प्रहार का केले? त्याला जहाल असे विष का पाजले? खरोखर हे सर्व चरित्र फारच विलक्षण आहे. मला अजून एका गोष्टीचे नवल वाटते.
हरिभक्त प्रल्हाद सर्व संकटांवर मात करून बाहेर पडला यात मला आश्चर्य वाटत नाही. त्याचे कारण असे की, विष्णूच्या एकनिष्ठ भक्ताला कधीही कुणी इजा करून शकत नाही. श्रीहरिच्या कृपेचे कवच त्याच्या भोवती असते. प्रल्हादाच्या मनात तर कुणाहीबद्दल वैरभाव कधीच नव्हता. त्याला शत्रू असा जगात नव्हता. परंतु स्वगोत्रीय व स्वजन मात्र त्याचे कट्टर वैरी बनले. पिता तर त्याच्या जिवावर उठला. असे का व्हावे? हरिभक्तांना, त्यांच्या मताशीविरोध असणारे लोकसुद्धा त्रास देत असतात मग आपल्याच लोकांनी असे का करावे? ते मला सविस्तर सांगा.
प्रल्हादावर पित्याचा कोप
पराशर सांगू लागले ऐका तर! पूर्वी एके काळी कश्यपमुनी व दिति यांचा पुत्र हिरण्यकशिपू हा ब्रह्मदेवापासून वर प्राप्त करून घेऊन सामर्थ्यवान झाला व कुणालाही जुमानेना! त्याने सामर्थ्याच्या जोरावर स्वर्ग, मृत्यू व पाताळ असे तिन्ही लोक काबीज केले. इंद्र, चंद्र, वरुण आणि पाच महाभूते यांचे अधिकार त्याने काढून घेतले. कुबेर व यमराज यांची पदावरून हकालपट्टी करून त्रैलोक्याचा सर्व कारभार तो एकटाच पाहू लागला. त्यामुळे सर्व देव मनुष्यरूपे धारण करून पृथ्वीवर भटकत फिरू लागले.
परिणामस्वरूप त्रैलोक्यात तोच एकमेव पूजिला जात असे. नित्य मदिरापान करून तो सर्व सुखांचा भोग घेऊ लागला. सर्वत्र नाग, गंधर्व, यक्ष वगैरे त्याचीच आराधना करू लागले. त्याचा पुत्र प्रल्हाद हा गुरुगृही शिक्षण घेत असे.
एकदा प्रल्हाद आणि त्याचे गुरू हिरण्यकशिपूला भेटण्यासाठी आले असता त्यांचे स्वागत करून व पुत्राला मांडीवर बसवून पित्याने विचारले की, बाळा! तू काय शिकलास ते जरा सांग पाहू,
प्रल्हाद बोलला “पिताजी! ऐका. जो श्रीहरि अनादि व अनंत आहे. तिन्ही कालांच्याही पलीकडे असून सर्व कारणांचे मूळ कारणआहे आणि जो सर्व सृष्टीचा जन्मदाता, पोशिंदा व संहारकर्ता आहे, त्यालाच मी शरण जातो.”
असे ऐकले तेव्हा हिरण्यकशिपूने रागारागाने त्या गुरूला विचारले की, अरे दुष्टा! तू आमच्या शत्रू बद्दल असे याला शिकवून आमचा द्रोह केलेला आहेस. त्यावर गुरूंनी सांगितले – “दैत्यराज! आपण शांत व्हावे. हे ज्ञान मी याला दिलेले नाही.”
त्यावर पित्याने प्रल्हादाला पुन्हा विचारले तेव्हा तो म्हणाला की “पिताजी! प्रत्येकाच्या हृदयात असलेला परमात्मा विष्णू हाच खरा ज्ञानदाता आहे. त्याच्याशिवाय कुणीही कुणाला ज्ञान देऊ शकणार नाही.”
राजाने पुन्हा रागाने विचारले की, प्रल्हादा! तू ज्याच्याबद्दल सांगतो आहेस, तो विष्णू कोण आहे?
प्रल्हाद बोलला की, “योगी ज्याला केवळ ध्यानानेच पाहू शकतात त्याच्याविषयीचे वर्णन शब्दांतून करता येणार नाही. ज्याच्यातून हे सर्व विश्व उद्भवले आहे, तोच परमेश्वर अर्थात महाविष्णू आहे.” हिरण्यकशिपू म्हणाला की, “माझ्याविना कुणी दुसरा परमेश्वर नाहीच. तेव्हा अशाप्रकारे बडबडून तुला मरायचे आहे काय?”
प्रल्हादाने उत्तर दिले की, “तो विष्णू तर तुमच्यासह सर्वांचाच जन्मदाता व पालनकर्ता आहे. तेव्हा मजवर उगीच रागावू नका.”
हिरण्यकशिपूने रागाने थरथर कापत ओरडून विचारले – “अरे! या मूर्ख बालकाला कुणी बरे झपाटला आहे? कोण याच्या मुखातून हे अभद्र बोलतो आहे?”
प्रल्हाद म्हणाला की, “त्या विष्णूने मलाच नव्हे तर सर्व चराचरालाच व्यापले आहे. सर्व जीवांना तोच कार्यप्रवृत्त करतो म्हणून सर्वकर्ता तोच आहे.”
हिरण्यकशिपूने सेवकांना आज्ञा केली की, त्यांनी पापी प्रल्हादाला शिक्षा करावी व समज देऊन गुरूच्या हवाली करावा. तसेच केले गेले. नंतर काही काळाने प्रल्हाद व त्याचे गुरू यांना दैत्यराजाने पुन्हा बोलावून घेतले व पूसतपास केल्यावर प्रल्हादाने पूर्वीप्रमाणेच उत्तरे दिली.
तेव्हा मात्र हिरण्यकशिपू भयंकर रागावला आणि त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी त्याला सैनिकांच्या हवाली केला; मग त्या सैनिकांनी प्रल्हादाचे हालहाल सुरू केले. त्याच्यावर शस्त्रे चालविली, महाभयंकर विषारी सर्पांचे दंश करविले, पर्वताच्या शिखरावर नेऊन दरीत ढकलून दिला, धगधगत्या अग्नीच्या कुंडात फेकला तरीही त्याच्यावर या सर्वांचा काही परिणाम झाला नाही.
तेव्हा राजाच्या पुरोहितांनी विचारविनिमय केला व राजाला समजाविले की, सध्या प्रल्हादाला पुन्हा गुरुगृही पाठवावा. तरीही तो जर ऐकत नसला तर आम्ही मंत्रयोगाने कृत्या (विनाशकारी शक्ती) तयार करू व त्याचा नाश करू; मग हिरण्यकशिपू राजी झाला व त्याने तसेच केले.
तिथे प्रल्हादाने गुरूच्या उपदेशाला न जुमानता आपल्या सवंगड्यांना सुद्धा विष्णूचे महत्त्व सांगून त्यांनाही हरिभक्तीसाठी प्रवृत्त करू लागला. ते वृत्त राजापर्यंत जाऊन पोहोचले. तेव्हा हिरण्यकशिपू तर चांगलाच खवळला.
(श्री विष्णु पुराण क्रमश:)
सादरकर्ते : विजय गोळेसर मोबा.९४२२७६५२२७