अधिकमास विशेष लेखमाला
श्री विष्णु पुराण (भाग ९)
||भक्त प्रल्हाद||
कहाणी अतूट, अविचल श्रद्धेची!
विष्णुचे सर्वव्यापकत्त्व
श्री विष्णु पुराणातील अतिशय प्रसिद्ध अशा भक्त प्रल्हाद यांच्या कथेचा शेवटचा भाग आज आपण पाहणार आहोत. भगवान विष्णुवरील अतूट,अविचल श्रद्धेचे यापेक्षा उत्कृष्ट उदाहरण जगात सापडणार नाही. स्वत:ला देवाचे भक्त समजणार्या प्रत्येकाने आपली भक्त प्रल्हादाशी तुलना करून पहावी म्हणजे आपण कोठे आहोत हे सहज लक्षांत येईल.
कहाणी अतूट, अविचल श्रद्धेची!
सर्व दैत्यगणांनी त्या बालकाला नागपाशात गुंडाळून महासागरात बुडविला आणि वरून मोठाले पर्वत त्याच्यावर टाकले. तशाही स्थितीत अजिबात न घाबरता प्रल्हाद विष्णूला आळवू लागला
हे राजीवलोचना! चक्रधरा!! गोब्राह्मण प्रतिपालका!!! तुला मी नमन करतो. तूच सृष्टिकर्ता ब्रह्मा, तूच पोषणकर्ता विष्णू आणि संहारक रुद्र आहेस. मुंगीसकट एकूण एक जीव, पंचमहाभूते, मन, बुद्धी, आत्मा, काळ व त्रिगुण यांत तूच भरला आहेस. तूच सर्व कर्मे, कर्मफळे व कर्मभोक्ता आहेस.
योगी ध्यान तुझेच करतात. याज्ञिक आहुत्या तुलाच देतात. अणोरणीयान व महतो महीयान तूच आहेस. तुझी जी पराशक्ती आहे तिला मी वंदन करीत आहे. ती त्रिगुणात्मिका व सर्वतंत्रस्वतंत्र आणि सर्वांच्या पलीकडे आहे. तू नाम व रूप नसणारा, अलिप्त, व सत्तारूप असा आहेस. तरीही देव तुझ्या साकार अवतारांची आराधना करीत असतात.
हे अक्षय व अव्यक्त देवा! जगताच्या आधारा! माझ्या अंतर्यामी तूच आहेस. अर्थात जो मी तो तूच आहेस व जो तू आहेस तोच मी आहे. माझ्यात व तुझ्यात भेदच राहिलेला नाही.
अशाप्रकारे विष्णूचे स्तवन करीत असताना बाळ प्रल्हाद विष्णूशी एकरूप होऊन गेला. त्याला देहभान असे काही राहिलेच नाही. त्यामुळे तो निष्पाप बनला व त्याला कर्मबंधने उरलीच नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की, त्याच्याभोवतीचे नागपाश तुटून पडले. पृथ्वीवरचे सर्व महासागर खवळले आणि पृथ्वी जोराजोराने हेलकावे खाऊ लागली. प्रल्हादाने अंगावरचे सर्व पर्वत दूर झुगारून दिले व तो पाण्यातून सुखरूप बाहेर निघाला.
तेव्हा त्याला पुन्हा देहभान प्राप्त झाले. तो विष्णूची पुन्हा स्तुती करू लागला.
ॐ नमः परमार्थाय स्थूल सूक्ष्म क्षराक्षरः।
व्यक्ताव्यक्त कालातीत सकलेश निरंजन।
गुणांजन गुणाधार निर्गुणात्मन गुणस्थितः ।
मूर्तामूर्त महामूर्ते सूक्ष्ममूर्त स्फुटास्फुट ।।
(अर्थ हे परमार्थारूपा! स्थूल व सूक्ष्म तूच आहेस. तूच चिरंतन आहेस तसाच नश्वर आहेस. व्यक्त आणि अव्यक्त (साकार व निराकार) तूच! काळाच्याही पूर्वीचा तूच! सर्वांचा नियंता, परमशुद्ध, गुणांना चेतविणारा, त्यांना आश्रय देणारा परंतु स्वतः मात्र गुणविरहित असा विश्वाकार, प्रकट व गुप्त, वाच्य आणि अनिर्वाच्य देवा! हे कुरूपा, सुरूपा! विद्या व अविद्यात्मका! विश्वबीजा! जगत्पालका (तुला नमन असो). हे अविनाशी व विनाशी देवा! तू एकमेव असून अनेक रूपधारी देवा! तुला मी शरण आहे.)
प्रल्हाद अशी स्तुती करीत असताना त्याच्यासमोर विष्णू प्रकट झाला. प्रल्हादाने त्याला पहाताच अति आनंदाने लोटांगणे घालावयास आरंभ केला. तेव्हा विष्णू म्हणाला की, बाळा प्रल्हाद! मी तुजवर अत्यंत प्रसन्नआहे. तुझी जी इच्छा असेल ती सांग. त्यावर प्रल्हादाने अखंड भक्ती मागितली. तेव्हा ‘तसेच होईल’ असे बोलून देवाने आणखी काही माग असे म्हटले त्यावर प्रल्हाद बोलला की, त्याच्या पित्याच्या मनात जी द्वेषबुद्धी आहे ती नष्ट होऊन जावी.
पित्याने माझ्या बाबतीत जी दुष्टकर्मे केलेली आहेत त्यांचे दोष त्याला न बाधता तो परममुक्तीला जावा: भगवंताने ‘तथास्तु’ असा वर दिला व ‘अजून काही मागून घे’ असे सुचविले. तेव्हा प्रल्हादाने मागितले की ‘तुझा व माझा कधी वियोग घडू नये.’ तेव्हा ‘तसेच होवो’ असे म्हणून भगवंत गुप्त झाला.
नंतर प्रल्हाद पुन्हा पित्याच्या दर्शनासाठी गेला असता हिरण्यकशिपूने त्याला जवळ घेतला. तो पुन्हा प्रल्हादाचे लाड करू लागला. पुढे दैवयोगाने जेव्हा नरसिंह अवतार धारण करून विष्णूने त्या दैत्यराजाचावध केला तेव्हा प्रल्हाद राजा झाला. पुढे पुष्कळ काळपर्यंत न्याय-नीतीने राज्य सांभाळून तो अंती निर्वाणपदी गेला. “
पराशर सांगतात- अहो मैत्रेयजी! असे हे भक्त प्रल्हादाचे चरित्र जो कुणी पठण करील अथवा ऐकेल, तो मोठ्यात मोठा पापी असला तरी निश्चयाने त्या पापांपासून मुक्त होईल. विशेषकरून जर अमावास्या, पौर्णिमा, अष्टमी व द्वादशी या तिथींना पठण केले तर गोदान केल्याचे फळ मिळते.
अशा वाचकाचे भगवंत सदासर्वदा सर्वत्र रक्षण करीत असतात.
प्रल्हादाच्या वंशाचा विस्तार
पराशर म्हणतात – संल्हादाला आयुष्यमान, शिबि, व बाष्कल असे तीन मुलगे झाले. प्रल्हादाचा पुत्र विरोचन व त्याचा बली होता. पैकी बळीला शंभर मुलगे झाले व त्या सर्वात थोरला बाणासुर होय. हिरण्याक्षाचे पुत्र उत्कुर, शकुनि, भूतसंतापन, महानाभ, महाबाहूकालनाभ! हे सर्व जण महापराक्रमी होते.
महर्षी कश्यपांची दुसरी पत्नी दनु नावाची होती. तिला पंधरा महाबलशाली पुत्र होते. हे दानव या नावाने प्रसिद्ध आहेत. त्या पंधरातील एक पुत्र ‘स्वर्भानु’ याला प्रभा नावाची मुलगी झाली. वृषपर्व्याला शर्मिष्ठा, उपदानी व हयशिरा अशा तीन मुली झाल्या.
वैश्वानराच्या दोन मुली कश्यपांना दिल्या होत्या. त्यांच्यापासून ६०,००० दानव जन्मले. याशिवाय इतर पुत्रांपासून दानवांचा वंश विस्तारत गेला. तो शेकडो, हजारोंच्या संख्येने वाढला. प्रल्हादाच्या वंशात पुढे निवातकवच नावाचे दैत्य जन्मास आले. कश्यपांची एक ताम्रा नावाची पत्नी होती. तिला सहा कन्या होत्या. त्यापैकी शुकि हिच्यापासून पोपट व घुबड, आणि कावळे, श्येनीपासून ससाणे, भासीपासून भास व गुध्रिकेपासून गिधाडे अशा प्रजाती निर्माण झाल्या.
शुचिपासून जलचर व सुग्रीवी हिच्यापासून पाळीव पशू जन्मले. ही सर्व संतती ताम्रापासून वाढत गेली. कश्यपांची पत्नी जी ‘विनता’ होती, तिला गरुड आणि अरुण असे दोन पुत्र होते. गरुड हा सर्पाचां शत्रू होता.
कश्यपांची पत्नी ‘सुरसा’ आणि ‘कद्रु’ या दोघीपासून सर्पांच्या व नागांच्या हजारो प्रजाती निर्माण झाल्या. क्रोधवशा नावाच्या पत्नीपासून क्रोधवश नावाचे क्रूर गण जन्मले, भूत व पिशाचे ही तिचीच संतती आहे. ‘सुरभी’पासून दुधाळ प्राणी झाले तर इशापासून सर्व वनस्पती बनव्या
‘खसा’ नावाच्या श्रीपासून यक्ष, राक्षस, पैदा झाले, ‘मुनि’ हिव्यापासून अप्सरा व ‘अरिष्टा’ हिच्यापासून गंधर्व उत्पन्न झाले, असा सर्व मह कश्यपांचा वंशविस्तार आहे. हा स्वारोचिष नावाच्या मन्वंतरातील आहे. आता सध्याच्या वैवस्वत नावाच्या चालू मन्वंतरातील सृष्टीचे वर्णन ऐका.
प्रारंभी वारुण नावाचा यज्ञ झाला. त्यात ब्रह्मदेव होता (यजमान) असून त्यांचा वंश वर्णन करतो.
पूर्वीच्या कल्पांतील आपल्या मानसपुत्रांकडूनच ब्रह्मदेवाने सृष्टीतील सजीवांची निर्मिती केली, ज्या वेळी दितीचे (कश्यपांची पत्नी) पुत्र इंद्राने मारले तेव्हा तिने इंद्राला मारून टाकील असा पुत्र मागितला असता, तसा वर दिला परंतु पुत्र जन्मेपर्यंत शुद्ध असावे असे सांगितले,
पुढे ही गोष्ट अंतर्ज्ञानाने जाणून, एकदा ती शौचानंतर पाय न धुता घरात गेली असे पाहून व ती संधी साधून इंद्राने तिच्या गर्भाचे वज्राने सात तुकडे केले, तेव्हा ते सातहीजण जोराजोरात रडू लागले, तेव्हा इंद्राने त्यांना दटाविले तरीही ते रडावयाचे थांबेनात मग इंद्राने पुन्हा प्रत्येकाचे सात तुकडे केले,
अशाप्रकारे विभागले गेलेले ४९ जण मरुद्रण या एकाच नावाने प्रसिद्ध झाले व ते इंद्राचे अनुचर बनले.
विष्णूचे सर्वव्यापकत्व
सृष्टीच्या आरंभकाली जेव्हा ऋषीमुनींनी ‘पृथु’ याला पृथ्वीपती म्हणून अभिषेक केला तेव्हा ब्रह्मदेवाने क्रमवार विभागणी केली, ती अशी-
नक्षत्रे, ग्रह, ब्राह्मण, वनस्पती, यज्ञ व तप यांचा अधिपती चंद्राला बनविला. त्याचप्रमाणे कुबेराला सर्व राजेलोकांचे स्वामित्व दिले. सर्व प्रवाही द्रव्यांचा स्वामी वरुण, बारा आदित्यांचा प्रमुख विष्णू तसेच सर्व बसूंचा नायक अग्नि असे नेमून दिले.
प्रजापतींसाठी दक्ष, मरुद्रणासाठी इंद्र आणि दैत्य व दानव यांच्यासाठी प्रल्हाद अशी नेमणूक केली. पितरांचा राजा धर्मराज (यम), हत्तींचा स्वामी ऐरावत, पक्षिगणांचा गरुड, देवांचा इंद्र, घोड्यांचा उच्चैःश्रवा आणि गायींचा बैल असे अधिकार दिले. जंगलाचे राज्य सिंहाला दिले व सर्वांचे स्वामित्व शेषनागाला दिले. पर्वतांचा मुख्य हिमालय, ऋषी-मुनींचा मुख्य कपिल व हिंसक जनावरांचा मुख्य वाघ असे अधिकारी नेमले. अशा तऱ्हेने सर्व चराचरांवर नेमणुका केल्या. त्याचवेळी सर्व दिशांसाठी शासक नेमून दिले. त्यात पूर्वेचा सुधन्वा, दक्षिणेचा शंख, पश्चिमेचा केतुमान आणि उत्तरेचा हिरण्यरोमा हे मुख्य आहेत.
अशाप्रकारे जेवढे म्हणून श्रेष्ठ प्रजापालक पूर्वी झाले, सध्या आहेत व भविष्यात होतील अशा सर्वात विष्णूचा अंश विशेष जास्त प्रमाणात असतो. त्याचे कारण असे आहे की, सृष्टीचे पालन व पोषण करण्याची शक्ती एका विष्णू वाचून कुणाकडेही नाही. तो एकटाच सर्वांना प्रेरणा देऊन सर्व सृष्टीचा कारभार चालवत असतो. सर्व रचना ज्याच्यापुढे शक्य होते तो काळ हाच विष्णू होय. आदिशक्ति, तीन गुण, पंचमहाभूते, सर्व तत्त्वे यात तोच आहे. साधन तोच आणि साध्यही तोच असे जाणा, अशा विष्णूचे स्थान हे परमपद आहे. योगी त्याचाच आश्रय घेतात; मग ते कधीही परत येत नसतात.
व्यक्त आणि अव्यक्त अशा त्याच्या दोन अवस्था आहेत. व्यक्त म्हणजे संपूर्ण सृष्टी व अव्यक्त म्हणजे परब्रह्म होय! मैत्रेय महाराज! जरी विष्णूचा अंश प्रत्येक वस्तूंमध्ये असला तरी तो सर्वत्र सारखाच नसून कमीजास्त असा असतो. त्यामध्ये ब्रह्मदेव, विष्णू व शंकर यांच्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात असतो.
नंतर देवदेवता, प्रजापती, मानव, जनावरे, पक्षी, जंगली प्राणी, सरपटणारे प्राणी, वृक्षवेली अशा उतरत्या क्रमाने तो तेजाचा अंश कमीकमी होत जातो. आता उत्पत्ती, स्थिती व लय हे चक्र कायम चालूच असते. ते कधीच थांबत नसते. विष्णू हाच त्याचे आदिकारण आहे.
योगीलोक याच विष्णूचे आरंभी समूर्त ध्यान करतात. आता मी विष्णूची भूषणे व आयुधे यांचे अर्थ सांगतो. हे ज्ञान मला वसिष्ठ महामुनी यांनी दिलेले आहे.
शुद्ध आत्मा म्हणजेच त्याच्या कंठातील पदक अर्थात कौस्तुभमणि आहे. शुद्ध सात्विक बुद्धी ही त्याच्या हातातील गदा आहे. तामस अहंकार हाच शंख आहे व राजस अहंकार हा त्याचे सारंग धनुष्य आहे. सात्विक अहंकार हे सुदर्शन चक्र आहे.
त्याच्या गळ्यातली वैजयंती नावाची माळ म्हणजेच पंच तन्मात्रा व पाच महाभूते आहेत. सर्व ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये हे त्याचे बाण आहेत. त्याची तलवार म्हणजे अविद्येच्या म्यानातील शुद्धविद्या हीच आहे. अशा प्रकारे सर्व सूक्ष्म जग केशवामध्ये सामावलेले आहे.
थोडक्यात असे समजा की, जे काही आहे ते विष्णूमय आहे व त्याच्याशिवाय काहीच नाही. अशी धारणा झाल्यावर अशक्य असे साधकाला अशक्य काहीच नसते.
हे पुराण जो श्रवण करील तो पापमुक्त तर होईलच परंतु त्याला सर्वत्र दैवी साहाय्य मिळेल!
येथे पराशर मुनीविरचित श्रीविष्णुपुराणाचा पहिला अंश संपूर्णझाला. या भागात आपण विश्वाचे प्रयोजन, श्री विष्णुंचा वराह अवतार, सृष्टीचा विस्तार, लक्ष्मी महात्म्य, समुद्रमंथन, ध्रुवाचे आख्यान, तसेच राजा वेन आणि पृथु यांची कथा, तसेच प्रल्हादाची अविचल विष्णु भक्ती आणि त्याच्यासाठी भगवान श्रीविष्णु यांनी घेतलेला नरसिंह अवतार या सुप्रसिद्ध कथा पहिल्या.उद्यापासून श्री विष्णु पुराणचा दुसरा अंश सुरु होत आहे.
(श्रीविष्णुपुराण कथासार अंश पहिला समाप्त क्रमश:)
सादरकर्ते : विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७