श्रीविष्णु पुराण
अंश-५ (भाग-8)
मुचकुंद तपस्या
बलरामाची व्रजयात्रा
कृष्ण-रुक्मिणीचा विवाह
मुचकुंदाची विनंती ऐकून कृष्ण म्हणाला, “हे नृपाळा! तू परम दिव्य लोकांत जाशील आणि माझ्या कृपेने अखंड ऐश्वर्य भोगशील, बन्याच काळानंतर तुला एका फार मोठ्या कुळात जन्म मिळेल तेव्हा तुला पूर्वजन्माची आठवण असेल. त्या जन्माच्या अंती माझ्या कृपेने तू मोक्षाप्रत जाशील.’
तेव्हा कृष्णाला नमस्कार करून तो गुहेतून बाहेर आला व पाहतो तर सर्वत्र लोक लहान आहेत असे त्याला दिसले; मग कलियुगाचे आगमन जाणून तो नरनारायण यांचे पवित्र क्षेत्र गंधमादन पर्वतावर तपस्या करण्यासाठी निघून गेला.
कृष्ण मथुरेत परतला आणि शत्रूचे सर्व सैन्य ताब्यात घेऊन उग्रसेनाच्या स्वाधीन केले.
तेव्हा सगळीकडे सुव्यवस्था प्रस्थापित झाली आहे असे बघून बलराम गोकुळात निघून गेला. तिथे त्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत करून गवळ्यांनी व गोपींनी त्याला गराडा घातला. त्याला क्षणाचीही उसंत न देता सगळ्यांनी त्याच्यावर एकामागून एक अशा हजारो प्रश्नांचा भडिमार केला.
कृष्णाच्या विरहामुळे वेड्या बनलेल्या गोपिकांनी तर बलरामालाच कृष्ण समजून रागाने शिव्यासुद्धा ऐकवल्या; मग बलरामाने कृष्णाचा निरोप सांगून त्यांचे सांत्वन केले व कसाबसा त्यांच्या घोळक्यातून बाहेर पडून तो नंदाच्या वाड्यावर गेला.
बलरामाचा व्रजनिवास
आपल्या शक्तीने पृथ्वीला तोलून धरणाऱ्या बलवान शेषाची मानवरूपातील लीला पाहून वरुणाने वारुणीला (दारू) सांगितले की, “हे मंदिरे! तू या अनंताची आवडती आहेस, म्हणून त्याची सेवा कर पाहू.’
तेव्हा ती वृंदावनातल्या एका कदंब वृक्षाच्या ढोलीत जाऊन राहिली. तो धुंद वास आल्यामुळे बलराम शोध घेत तिथे पोचला; मग गोप आणि गोपींसह गात व नाचत त्याने भरपूर मदिरापान केले.
त्या पिण्यामुळे धुंदी चढलेला बलराम यमुनेला म्हणाला की, “यमुने! मला आंघोळ करायची इच्छा झाली आहे. तरी तू इथे ये.” तेव्हा तो नशेमध्ये बोलत आहे असे जाणून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
मग रागावलेल्या बलरामाने गळ्यात नांगराचा फाळ टाकून तिला खेचून घेतली व म्हणाला – “अग पापिणी! तुला यायचे नव्हते तरी मी इथे ओढून आणलीच की नाही? आता इथून कशी जातेस तेच मी पाहतो “
त्यामुळे यमुनेच्या पाण्याने तो सर्व प्रदेश जलमय झाला. तेव्हा यमुने सदेह प्रगट झाली व नेत्रात अश्रू आणून त्याला क्षमा करण्यासाठी विनवणी करू लागली. बलराम बोलला “तू माझी अवज्ञा करतेस काय? आता तू बघच. या नांगराने मी तुझ तुकडे तुकडे करून टाकतो.’
तेव्हा भ्यायलेल्या यमुनेने आपला प्रवाह बदलला आणि मग स्नान करून बलराम तिथे दोन महिनेपर्यंत क्रीडा करीत राहिला आणि द्वारकेत गेला. तिथे रैवताची मुलगी रेवती हिच्याशी विवाह केला व तिला निशठ व उल्मुक असे दोन पुत्रही झाले.
रुक्मिणी हरण
विदर्भ देशाची राजधानी कुण्डिनपूर होती. तिथला राजा होता भीष्मक, भीष्मकाला रुक्मी नावाचा एक मुलगा आणि रुक्मिणी नावाची एक मुलगी होती. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचे परस्परांवर प्रेम होतेम्हणून श्रीकृष्णाने अनेकवार मागणी घातली असता, त्याच्याबद्दल रुक्मीच्या मनात अढी असल्यामुळे तो रुक्मिणीचे लग्न श्रीकृष्णाशी लावून देण्यास तयार होईना.
त्यावेळी जरासंधाने तिच्यासाठी चेदि देशाचा स्थळ सुचविले. ते सर्वांना मान्य झाले मग शिशुपाल व जरासंधासह अनेक राजे वऱ्हाड घेऊन कुंडिनपुरात आले. तेव्हा बलराम व कृष्ण यादव सैन्य घेऊन वऱ्हाडासह येऊन दाखल झाले.
लग्नाच्या आदल्या दिवशी अकस्मात रुक्मिणीला उचलून रथात बसवून कृष्ण द्वारकेच्या दिशेने पळाला. बलराम सैन्यासह मागेच राहिला.
त्यासमयी त्या प्रकाराने चिडलेल्या पौंड्रक, दंतवक्त्र, विदूरथ, शिशुपाल, जरासंध, शाल्व वगैरे राजांनी कृष्णाचा पाठलाग केला. तेव्हामोठे घनघोर युद्ध झाले आणि बलरामाकडून सर्वजण पराभूत झाले.
एकटा रुक्मी मात्र ‘मारीन किंवा मरेन’ असा निश्चय करून कृष्णापाशी जाऊन पोहोचला. त्या युद्धात कृष्णाने हसत हसत त्याचे सैन्य मारून टाकले व त्याला आपला मेव्हणा आहे असे जाणून जिवंत सोडून दिला.
त्या वेळी भीष्मकाने वेदोक्त रीतीने कृष्ण-रुक्मिणीचा विवाह लावून दिला नंतर त्यांना प्रद्युम्न नावाचा एक पुत्र झाला.
प्रद्युम्नाचे अपहरण आणि शंबरासुराचा वध
मैत्रेयांनी पराशरांना विचारले की, “हे गुरूदेव! या प्रद्युम्नाला शंबर नावाच्या राक्षसाने तान्हा असताना ठार करण्यासाठी पळवूने नेला होता. पण पुढे त्यानेच त्या राक्षसाला मारला असे ऐकतो, तर तो प्रकार काय होता?”
पराशरांनी सांगण्यास आरंभ केला! “प्रद्युम्नाचा जन्म झाल्यानंतर सहाव्या दिवशीच शंबर नावाच्या राक्षसाने जाणले की, त्याचा मृत्यू प्रद्युम्नाच्या हातून व्हावा असे विधिलिखित आहे. तेव्हा त्याने लगेच त्याला प्रसूतीगृहातून पळवला आणि महासागरात भिरकावून दिला.
तिथे मोठमोठे जलचर असताना या बाळाला एका माशाने गिळला पण त्याच्या पोटातील उष्णतेचा प्रद्युम्नावर काहीच परिणाम झाला नाही. कालांतराने तो मासा कोळ्यांच्या जाळ्यात सापडला. तेव्हा इतर माशांसह तो मासाही शंबराच्या वाड्यावर पोचता झाला.
तिथल्या मुदपाकखान्यावर शंबराची मायावती या नावाची पट्टराणी अधिकारी होती. मासा चिरला तेव्हा त्याच्या पोटात जिवंत बाळ पाहून स्वयंपाकी लोकांनी तो राणीकडे आणून दिला. तो नक्षत्रासारखा सुंदर मुलगा पाहताच तिला मोठे आश्चर्य वाटले.
त्याच वेळी तिच्यासमोर नारदमुनी प्रकट झाले व म्हणाले – “अग! हा साक्षात विष्णूचा पुत्र आहे. शंबराने याला सूतिकागृहांतून पळवून समुद्रात फेकून दिला होता. तिथे याला माशाने गिळला. आता हा तुझ्या हाती आला आहे. तर तू याचा सांभाळ कर.”
नारदांच्या सांगण्यावरून व तो बाळ तिच्या मनात भरल्यामुळे ती त्याचे पालन करू लागली. हळूहळू त्याने तारुण्यात प्रवेश केला. तेव्हा प्रेमाच्या भरात तिने त्याला सर्व मायावी विद्या शिकवल्या. तिचे त्याच्याशी वागणेसुद्धा प्रेयसीसारखे झाले.
तेव्हा प्रद्युम्नाने विचारले की, तू माझी आई असतानाही आज असे का वागते आहेस? त्यावर तिने उत्तर दिले की, तो तिचा मुलगा नसून विष्णूचा पुत्र आहे. शंबराने त्याला तान्हेपणीच पळवून समुद्रात फेकून दिला होता. मग योगायोगाने तो तिला माशाच्या पोटात सापडला पण त्याची खरी आई मात्र अजूनही रडत असेल.
असे समजल्यावर प्रद्युम्नाने शंबराला युद्धाचे आव्हान दिले. त्या युद्धात शंबराच्या सात राक्षसी माया निष्फळ करून स्वत:च्या आठव्या मायेचा प्रयोग करून, त्याला मारला नंतर मायावतीला बरोबर घेऊन तो आकाशमार्गाने द्वारकेत गेला.
जेव्हा ती दोघे अंतःपुरात शिरली तेव्हा तिथल्या सर्व स्त्रियांना तो प्रतिकृष्णच भासला. रुक्मिणीचे तर हरविलेल्या बाळाच्या आठवणीने डोळे भरून आले. तिने त्याला जवळ घेऊन त्याच्या आई-वडिलांची माहिती विचारली.
तेव्हा श्रीकृष्णासह नारद तिथे आले आणि देवी रुक्मिणीला म्हणाले की तो तिचाच मुलगा आहे. नुकताच शंबरासुराचा वध करून आला आहे. त्यानेच त्याला तान्हा असताना पळवला होता. ही जी मायावती आहे ती पूर्वजन्मातील त्याचीच पत्नी रति आहे. अर्थात रुक्मिणीची सूनच आहे.
तेव्हा सर्वत्र मोठा आनंदीआनंद झाला.
क्रमश:
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल- ९४२२७६५२२७
Vishnu Puran Balram Rukmini Muchkund by Vijay Golesar