अधिक मास विशेषलेखमाला (भाग २९)
श्री विष्णु पुराण अंश ३ (भाग ५)
आदर्श गृहस्थ कसा असावा!
राजा सगराने आदर्श गृहस्थाचे आचरण कसे असावे असे विचारल्यावरून और्व मुनींनी पुढे सांगावयास आरंभ केला ते म्हणाले-
“हे भूपते! ऐक तर मग, जो सुराचारी असतो त्याला इहलोक परलोक दोन्ही साध्य होत असतात. ‘सत’ याचा अर्थ साधू असा आहे व साधू जे आचरण करतो त्याला सदाचार असे म्हटले जाते. त्या आचरणाची व्याख्या करणारे सप्तर्षी , मनू त्याचप्रमाणे प्रजापती हे आहेत.
शहाण्या मनुष्याने भल्या पहाटे उठून धर्म आणि धार्मिकतेचे चिंतन करावे. धर्मानुकूल अशा प्रापंचिक कर्तव्यांचे सुद्धा चिंतन करावे.जे धर्माच्या विरुद्ध असेल असे आचरण करू नये आणि जर समाजविघातक असेल असे आचरणही नसावे.
नंतर मग शौचविधी आटोपावा. कधीही वृक्ष गाय, सूर्य, अग्नी, वायू, गुरू व विप्रांच्या देखत मलमूत्र विसर्जन करू नये. नांगरलेल्या व पीक असलेल्या शेतात,गोठ्यात, येण्या-जाण्याच्या वाटेवर, नदी अगर तलावात व स्मशानात मलमूत्र विसर्जन करू नये. त्यावेळी पूर्ण मौन पाळावे.
हातपाय धुताना व इंद्रिये धुताना मातीचा वापर करावा. मात्र ती माती वारुळाची, उंदराच्या बिळाची, चिखलाची, मुंग्यांनी उकरलेली नसावी. माती लावताना लिंगाला एकदा, ढुंगणाला तीन वेळा, डाव्या हाताला दहा वेळा व उजव्या हाताला सात वेळा चोळावी; नंतर स्वच्छ पाण्याने आचमन करून स्नान करावे नंतर केस विंचरावेत व साजसज्जा करावी. त्यानंतर आपल्या चरितार्थाचा उद्योग करावा. सर्व धर्मांचा व कर्माचा आधार धन हाच आहे. तेव्हा द्रव्यार्जन केले पाहिजे. नदीत, तलावात, देवळाच्या विहिरीत अगर घरच्या विहिरीच्या पाण्याने स्नान करणे प्रशस्त आहे.
स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे नेसावीत व देव, ऋषी आणि पितर यांच्या तृप्तीसाठी तर्पण करावे. त्यात पितामह, प्रपितामह (पणजोबा) तसेच आईचे वडील, आजोबा व पणजोबा यांच्या प्रीत्यर्थ तर्पण करावे नंतर गुरू, गुरुपत्नी, मामा, मित्र व राजा त्याचप्रमाणे सर्व भूतमात्र व देवांसाठी तर्पण करावे. त्यावेळी असे म्हणावे की, देव, असुर, यक्ष, नाग, गंधर्व, राक्षस, पिशाच्च, गुह्यक, सिद्ध, कूष्मांड, पशू, पक्षी, जलचर, स्थलचर व वायुभक्षक असे एकूणएक जीव मी केलेल्या जलतर्पणाने तृप्त होतात.
जे नरकात खितपत पडले आहेत, तसेच माझे ऋणानुबंधी व संबंधित नसलेले असे सर्व जण मी दिलेल्या जलाने तृप्त होवोत; मग ते कुठेही असले तरीही!
राजा! हे सहेतूक तर्पण आहे. एवढे आटोपले की, आचमन करून सूर्याला अर्घ्य द्यावे; नंतर मग आपले कुलदेव व इष्टदेव यांची पूजा करावी. तेवढे झाल्यावर अग्निहोत्र करून क्रमाने प्रजापती, गुह्य, काश्यप व अनुमति यांना आहुती द्याव्या. त्यातून उरलेली द्रव्ये दरवाजाच्या दोन्ही बाजूंना सोडावीत. आता दिक्पालांची पूजा कशी करावी ते सांगतो.
पूर्वेला इंद्र, दक्षिणेस यम, पश्चिमेस वरुण आणि उत्तरेस चंद्रासाठी उरलेल्या हवन सामुग्रीतून बळी द्यावेत; नंतर वैश्वदेव करावा, त्यात विश्वदेव, विश्वभुते,विश्वपती,पितर व यक्ष यांना बळी द्यावेत.
नंतर आणखी अन्न घेऊन सर्व प्राणिमात्रांसाठी अन्नाचा बळी द्यावा. एवढे झाले की, मग अतिथीची वाट पाहत अंगणात उभे रहावे. जर कुणी एखादा अतिथी येईल तर त्याचे उत्तम प्रकारे स्वागत करून त्याची पूजा करावी आणि भोजन द्यावे. मात्र तो अतिथि पांथस्थ आणि वाटसरू असावा. त्याजपाशी कसलेही सामान अगर शिधा-शिदोरी नसावी; मग त्याचे नावगाव, जातधर्म, कुळगोत्र, शिक्षण इत्यादी चौकशी न करता त्याला यथेच्छ भोजन वाढून तृप्त करावे.
नंतर आपले आणखी सामर्थ्य असले तर साधू, संन्यासी व माधुकरी मागण्यासाठी आलेल्यास भिक्षा द्यावी. जो अशाप्रकारे अतिथींना संतुष्ट केल्याशिवाय एकटाच भोजन करतो, तो पापाचा भागीदार होतो.
असो! यानंतर माहेरवाशीण कन्या, विधवा व गरोदर स्त्रिया, वृद्ध व लहान मुलांना भोजन द्यावे. जो असे न करता, स्नान केल्याशिवाय, पूजा जप वगैरे न करता व सर्वांच्या अगोदर जेवतो तो अभक्ष्य भक्षण करणारा ठरतो. आत्ता मी आदर्श व पुण्यदायक भोजनविधी सांगतो.
गृहस्थाने स्नान करून, देव, ऋषी व पितर यांच्याप्रीत्यर्थ तर्पण करावे. नंतर वर सांगितले तसे अन्नदान करून स्वतः भोजनासाठी बसावे. इकडे तिकडे लक्ष न देता, गप्पागोष्टी न करता, एकाग्र चित्ताने अन्नसेवन करावे. उच्च आसनावर बसून जेवू नये. अन्न ताजे, चवदार, पवित्र आणि सुपाच्य असावे. ते षड्रसयुक्त असावे. मात्र कोरड्या चटण्या, लोणची ही शिळी होत नाहीत.
प्रथम गोड पदार्थ, नंतर खारट, आंबट, कडू व शेवटी तिखट असा क्रम राखावा. प्रथम द्रवपदार्थ (सूप वगैरे), नंतर चावून खायचे अन्न व शेवटी पुन्हा पातळ पदार्थ असा क्रम ठेवावा. पहिले पाच घास न बोलता खावे. ते पंचप्राणांची तृप्ती होण्यासाठी असतात. जेवताना अन्नाला नावे ठेवू नयेत. जेवणानंतर आचमन करून मग मुख व हात धुवावे.
जेवणानंतर काही काळ आसनावर बसून इष्टदेवाचे चिंतन करावे. त्यांची मनोमनी अशी प्रार्थाना करावी की, पंचप्राणांनी वायुने व अग्नीने या अन्नाचे आकाशतत्त्वाच्या साहाय्याने पचन करावे. शरीरातील सुप्त धातूंची व बलाची बाढ व्हावी, अग्नी, पृथ्वी, जल व वायू यांची तसेच प्राण, अपान, समान, ब्यान व उदान या पाच प्राणांची क्षमता वाढावी मला व देहाला उत्तम आरोग्य मिळो. सर्व इंद्रियांचा एकमात्र आधार विष्णूच आहे. जेवणारा, भोजन व पचविणारा तोच आहे.
अशी प्रार्थना करून पोटावरून हात फिरवावा आणि उद्योगाला लागावे तिसऱ्या प्रहरी काही शास्त्रवाचन, धर्मचर्चा करावी, कथा पुराणांचे श्रवण करावे. नंतर सायंकाळची संध्या करावी.
ती संध्या सूर्य मावळण्यापूर्वी करावी आणि प्रातःकाळी सूर्योदय होण्यापूर्वी करावी. जर सुतक, सुतक व आजारपणा असेल तर करू नये. एरवी नित्यनियमाने करावी. जर अशाप्रकारे संध्योपासना केली नाही तर पातक लागते.
सायंकाळच्या वेळीही मंत्रांविरहित बलिवैश्वदेव करून अन्नदान करावे. अतिथी आला तर त्याचाही परामर्श घ्यावा. त्याची भोजनाची व झोपेची व्यवस्था करावी. दिवसा अतिथी विन्मुख जाण्याने जेबढे पाप लागते त्याच्या आठपट पाप सायंकाळी अतिथी विन्मुख गेला तर लागते,
तद्नंतर गृहस्वामीने सायंकाळचे भोजन करावे व झोपण्यास जाये. झोपताना डोके पूर्वेस अगर दक्षिण दिशेस असावे.
शरीरसंबंध ऋतुकाली (मासिक पाळीनंतर) स्वतःच्या पत्नीशी करावा. स्त्री जर रोगी, विटाळशी, निरुत्साही, रागावलेली, दुःखी, गरोदर किंवा खिन्न असली तर मैथुन करू नये. कपटी, व्यभिचारिणी, उदासीन, उपाशी, फार जेवलेली किंवा परस्त्री असली तर संभोग करू नये. जड जेवण झाल्यानंतर अथवा उपाशी पोटी संभोग करू नये,
चतुर्दशी, अष्टमी, अमावास्या, पूर्णिमा आणि सूर्यसंक्रान्त (सूर्य राशी बदलतो तो दिवस) हे सर्व पर्वकाळ आहेत. या दिवशी अभ्यंग, स्त्रीसंभोग व मांसाहार करण्याने माणूस नरकात जातो म्हणून पर्वकाळी शास्त्राभ्यास, देवपूजा अनुष्ठान, ध्यान, जप करावे. विपरीत संभोग करू नये. पशुसंभोग करू नये.ब्राह्मणाचा आश्रम, देवालय व गुरुगृही संभोग करू नये. पवित्र वृक्षातळी, अंगणात, तीर्थक्षेत्री, गोठ्यामध्ये, चव्हाट्यावर, स्मशानात बागेत अथवा पाण्यात संभोग करणे निषिद्ध आहे.
पर्वकाळी , सकाळी, तिन्हीसांजेला तसेच मल व मूत्राचा आवेग रोखून संभोग करता कामा नये. तसे जर मैथुन केले तर धनाचा नाश होतो, पाप लागते. व्याधी जडतात व अशुभ फळे मिळतात. परस्त्रीशी प्रत्यक्ष संभोग करूच नये परंतु तिचे चिंतनही करू नये कारण परस्त्रीचा नाद इह व परलोकी नुकसान करतो. इहलोकी अल्पायु होतो व मृत्यूनंतर नरकवास प्राप्त होतो.
तेव्हा आपल्या धर्मपत्नीशीच संबंध ठेवावा व तोसुद्धा ऋतुकाळी पण तिला तीव्र इच्छा झालीच तर केव्हाही ठेवू शकतो.
श्री विष्णु पुराण अंश-३ (भाग -५)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७
vishnu puran adarsha gruhastha by vijay golesar