छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तीर्थयात्रा ही ज्येष्ठ नागरिकांना आनंद देणारी बाब असते. शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दात राज्याचे अल्पसंख्यांक औकाफ, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज अयोध्येकडे रवाना झालेल्या तीर्थयात्रेकरुंना शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर येथून ८०० जेष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्हयातील पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते व गृह निर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर या यात्रेकरुंना निरोप देण्यात आला. पालकमंत्री श्री. सत्तार यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ केली.
यावेळी गृह निर्माण मंत्री अतुल सावे, आमदार विक्रम काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे, सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे उपस्थित होते.आज ‘जय श्रीराम जय जय श्रीराम’ च्या जयघोषात ८०० जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले.
पालकमंत्री श्री सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत जिल्ह्यातून ही पहिली भाविकांची रेल्वे अयोध्येसाठी रवाना होते आहे. श्रीरामाचे दर्शन घेण्याची ही संधी या यात्रेमुळे आपल्या जिल्ह्यातील जेष्ठांना मिळते आहे. जेष्ठांना आनंद देणारी ही योजना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून राज्य शासनाने सुरू केलेल्या योजनेचा लाभ राज्यातील अनेक शेतकरी, शेतमजूर व सर्वधर्मीय नागरिकांना होत आहे. राज्य शासनाचा हा क्रांतीकारी निर्णय आहे. छत्रपती संभाजीनगर ते प्रभू श्री रामांची जन्मभूमी आयोध्या या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व ज्येष्ठांना रेल्वेत सर्व सोई देण्यात आल्या आहेत असे सांगून त्यांनी यात्रेकरूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.