नाशिक: नाशिक हे एक अतिप्राचीन असे शहर आहे. नाशिकला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा आहे. देशविदेशातील अनेक भाविक धार्मिक विधींसाठी नाशिकला येत असतात. अनेक धार्मिक विधींच्या आधी वंशावळ बघितली जाते. वंशावळला मूळ शब्द आहे नामावळ. आपल्या वंशामध्ये वडील, आजोबा, पणजोबा यांच्या वरची पिढी म्हणजे वंशावळ. नाशिक प्रमाणे अनेक तीर्थक्षेत्रावर वंशावळ पुरोहितांच्या माध्यमातून लिहिली जाते. नाशिकला ही परंपरा अतिशय प्राचीन आहे, आजच्या क्षणाला आठशे नऊशे वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहेत, असे मत पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी व्यक्त केले.
इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हमध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. पुढे ते म्हणाले की, वंशपरंपरेने आणि अनादीकाळापासून ही वंशावळ पद्धत आपले कुलगुरू जिथे आपल्या कुळाचा वृत्तांत लिहिला आहे, ज्यांच्याकडे आपले पूर्वज येऊन गेले आहेत, त्यांच्याकडे धार्मिक विधी केलेले आहेत, ते आपले गुरुजी म्हणजे पुरोहित त्यांच्याकडे सगळी माहिती असते. नाशिकच्या प्राचीन परंपरेविषयी त्यांनी सांगितले की, नाशिक हे सर्वात प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. असे म्हणतात, पृथ्वीतलावर सर्वात पहिल्यांदा पद्मासन घालून ब्रम्हदेवाने नाशिकमध्ये तपश्चर्या केली. म्हणून कृतयुगामध्ये नाशिकचे पद्मनगर नाव होते आणि त्रेतायुगात त्रिकंटक नाव होते. रावणाचे तीन भाऊ खर, दूषण आणि त्रिशी यांचे पंचवटीमध्ये राज्य होते. पंचवटीत हे तिघे ऋषीमुनींना त्रास द्यायचे. प्रभू रामचंद्रांनी ऋषीमुनींना अभयदान दिले. आणि या तिघांचा वध केला आणि म्हणून नाशिकमध्ये तिवंधा चौक आहे.
वंशावळ लिहिण्याची गरज काय याविषयी ते म्हणाले की, यामुळे आपल्या घराण्याचे गुरुजी कोण हे माहीत होते. तसेच पूर्वजांची नावे आपल्याला माहीत नसतात ती कळतात. अनेकांनी आपल्या पणजोबांना पाहिलेलं नसत पण त्याचं हस्ताक्षर, सही वंशावळीच्या वहीत जतन केलेली असते ते बघून अनेकांना त्यांना भेटण्याचा आनंद मिळतो, समाधान मिळते. पद्धतीविषयी त्यांनी सांगितले की, व्यक्ती नाशिकला आल्यावर आम्ही त्यांचं मूळ गाव विचारतो, आडनाव, समाज विचारतो. त्यानुसार गुरुजी ठरलेले असतात. त्यांच्याकडे सगळे लेख निघतात. ज्या पिढीपर्यंत लेख आहेत त्याच्या पुढच्या पिढीनुसार लेख लिहिले जातात.
आजच्या काळात इतक्या वर्षांचे रेकॉर्ड कसे जतन केले जातात याविषयी सांगताना ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पूर्वी हाताने बनवलेले कागद असायचे. तो पेपर किमती असतो. आजही आम्ही तिकडून पेपर मागवतो. हे पेपर अतिशय दुर्मिळ आहेत. तसेच पूर्वीच्या काळी शाई घरी केली जायची. बाजरी उकळून त्यात दिव्याची काजळी घालून ती उकळून शाई निर्माण व्हायची. आजही त्यातील अक्षर इकडचे तिकडे झालेले नाही. पूर्वी काबुल कंदाहार, सिंध प्रांत हे अखंड भारतात होते. त्यामुळे सिंध प्रांतातील हिंदू लोकांचे रेकॉर्ड आजही उपलब्ध आहे. आजच्या डिजिटलायझेशनच्या युगात काही पुरोहित हे रेकॉर्ड डिजिटल करायचा प्रयत्न करत आहेत. व्हिएन्नामधील एक युनिव्हर्सिटीमध्ये यावर संशोधन चालू आहे. अमेरिकेतील काही लोकांनी आमच्याकडे भेटही दिली आणि हे सगळं जाणून घेतलं. पण प्रत्यक्षात बघणं यासारखा आनंद काही वेगळाच आहे. डिजिटल हे तात्पुरता आनंद आहे. असे मत त्यांनी मांडले.