नाशिक: अनेकदा कोणतीही गोष्ट खरेदी करताना ग्राहक म्हणून आपली फसवणूक होते. ग्राहक म्हणून आपली जबाबदारी आहे की फसवणूक झाल्यावर त्याविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. राज्य शासनाचे वेट अँड मेजरमेन्ट डिपार्टमेंट म्हणजे वैधमापन शास्त्र विभाग कार्यरत आहे. ग्राहकांनी आपली तक्रार या विभागापर्यंत पोहोचवली तर आम्ही कारवाई करतो, असे राज्य शासनाच्या वैधमापनशास्त्र विभागाचे नियंत्रक व अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितले.
इंडिया दर्पण फेसबुक लाइव्ह मध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलखात घेतली. भारतातील पहिले कायमस्वरूपी ग्राहक प्रबोधन केंद्र नाशिकमध्ये साकारण्यात आले आहे. वैधमापनशास्त्र विभाग, नाशिक महानगरपालिका आणि नाशिक फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक फर्स्टच्या तिडके कॉलनी येथील ट्रॅफिक एज्युकेशन पार्क मध्ये साकारले आहे. या केंद्राविषयी माहिती देताना ते म्हणाले की, या केंद्रात लिटर, मीटर यांच प्रमाण दाखवत जुनी पद्धत आणि नवी पद्धत व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली आहे. पॅकेज कमोडिटी कायद्या अंतर्गत येणाऱ्या गोष्टी दाखवल्या आहेत. घरी सिलेंडर आल्यावर त्यात गॅस भरल्यानंतर आणि रिकामा सिलेंडर यांच प्रमाण ठरलेलं आहे. ते विचारून चेक करणं आवश्यक आहे. हे व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही दाखवले आहे. तसेच काही बोलकी मशीन तयार केली आहेत की बटन दाबल्यावर ते मशीन संपूर्ण माहिती देते. एखादी गोष्ट एकण्यासोबत आपण बघतो तेव्हा ती गोष्ट लक्षात राहते. जेणेकरून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित माहिती मिळेल. शाळांमधल्या मुलांना आम्ही इथे नेऊन माहिती देणार आहोत म्हणजे ही मुलं पालकांना याबाबद्दल माहिती देतील.
वैधमापनशास्त्र विभागाविषयी त्यांनी सांगितले की, आपण प्रत्येक जण ग्राहक आहोत. जन्मापासून मृत्यूपर्यंत संबंधित असणारा असा हा विभाग आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या त्यांच्या तक्रारीच योग्य निवारण करणे, प्रमाणित मानकानुसार वजन केले जाते की नाही हे या विभागामार्फत बघितले जाते. एमआरपी पेक्षा जास्त किमतीला एखादी वस्तू दुकानदाराने विकली तर तो गुन्हा आहे. ग्राहक आपल्या तक्रारी व्हाट्सएप नंबर, इमेल आयडी, हेल्पलाईन नंबर वर करू शकतात.www.vaidhmapan.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही माहिती मिळवू शकतात. एखादी तक्रार आल्यावर आम्ही डमी ग्राहक पाठवून शहानिशा करतो आणि दुकानदारावर कारवाई करतो. ग्राहकांनी तक्रारीसाठी पुढे आले पाहिजे, बोलले पाहिजे. कारण नुकसान आपल आहे आणि फायदा विक्रेत्यांचा आहे. एक जण बोलला तर त्याचा फायदा अनेकांना होऊ शकतो, आणि आमचं पूर्ण डिपार्टमेंट तुमच्या सोबत आहे असे डॉ. रवींद्र सिंघल म्हणाले.