नाशिक: भारतीय नागरिक म्हणून एक महत्त्वाचे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड. २००९ मध्ये भारत सरकारने देशात एक विशेष आणि महत्त्वाची ओळख म्हणून आधार कार्ड लागू केले. आज प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड महत्त्वाचे आहे. अनेकदा घरातील लहान मुलांचे आधार कार्ड काढायचे असते, नाव, फोन नंबर, पत्ता, बायोमेट्रिक मध्ये बदल करायचा असतो. आता आधार कार्ड संबंधित कोणतेही काम नाशिक आधार सेवा केंद्रात अवघ्या दहा मिनिटात होऊ शकते.
इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हमध्ये नाशिक आधार सेवा केंद्राचे सेंट्रल मॅनेजर ऋषिकेश बोराडे यांची मुलाखत घेण्यात आली. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. आधार सेवा केंद्राविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, ३१ जानेवारी २०२२ रोजी नाशिककरांच्या सेवेत हे आधार सेवा केंद्र दाखल झाले. पण सुरुवातीला लोकांना याविषयी काहीही कल्पना नव्हती त्यामुळे लोकं केंद्रावर येत नव्हते. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी इंडिया दर्पणने ऑफिसमध्ये येऊन लाइव्ह केले आणि नाशिककरांना या केंद्राविषयी माहिती मिळाली. त्यानंतर रोज २५० च्या आसपास लोकं येऊ लागले. दिवसाला ५०० लोकांचे आधार संबंधित काम या केंद्रात होऊ शकते.
केंद्राच्या कामाच्या स्वरूपाविषयी ते म्हणाले की, आठवड्याचे सातही दिवस हे केंद्र सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरू असते. शनिवार रविवार ही शासकीय सुट्टी असली तर हे केंद्र सुरू असते. आणि वर्षाला ३६५ दिवसांपैकी ३५५ दिवस हे ऑफिस सुरू आहे. वर्षाला फक्त १० शासकीय सुट्ट्या आहेत. आता येणाऱ्या काळात रक्षाबंधन, दिवाळी अशा काही सुट्ट्या आहेत. पण बाकी सरकारी सुट्ट्यांच्या दिवशीही आमची सेवा सुरू राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकारी काम म्हंटल की बराच वेळ लागतो या गैरसमजाविषयी ते बोलले की, हे आधार सेवा केंद्र हे सरकारी आहे. पण इथे आल्यानंतर १० मिनिटात काम करून आपण बाहेर पडतो. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पध्दतीने काम करता येते. एखाद्याचे आधार कार्ड हरवले तर बायोमेट्रिक वरून त्याची माहिती मिळवली जाते आणि पुन्हा त्याच नंबरचे नवीन आधार कार्ड त्याला मिळते. आलेल्या अनुभवाविषयी ते म्हणाले की, अनेकांनी व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. दिव्यांग लोकांसाठीसुद्धा इथे सोय आहे. १० मिनिटात काम होत असल्याने अनेकांनी तर पेढे, गिफ्ट, फुलं देऊन आमचे अभिनंदन केले.
नाशिकच्या मध्यवर्ती भागात द्वारका सर्कल जवळ हे केंद्र आहे. द्वारका सर्कलवरून नाशिकरोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर नाशिकरोड बसस्टॉपच्या समोर खरबंदा पार्कशेजारी जानकी प्लाझा या अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर हे केंद्र आहे. पूर्णपणे आधार कार्डशी संबंधित असे हे केंद्र आहे. कितीही गर्दी असली तरी १० मिनिटात आपण मोकळे होऊ शकतो आणि सुट्टीच्या दिवशीही हे केंद्र कार्यरत असल्याने नाशिककरांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आधार सेवा केंद्राचे ऋषिकेश बोराडे यांनी केले.