नाशिक – संस्कृत नाटक हे साध्य म्हणून पाहिलं जातं म्हणजे नाटकाची स्पर्धा आहे त्यात नाटक करायचं, पण एवढ्यापुरत ते मर्यादित न ठेवता त्याकडे साधन म्हणून पाहिले पाहिजे. संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी संस्कृत नाटक हे आवश्यक आहे. भाषा आपण शाळेत किंवा क्लासमध्ये शिकतो पण अधिक रंजकपणे, सहजपणे ती नाटकातून किंवा कलेतून समजते. म्हणून नाटक हे महत्त्वाचे माध्यम आहे. आपल्या संस्कृतीचे, साहित्याचे अनेक पुरावे हे संस्कृत भाषेत दडलेले आहेत. आणि संस्कृत नाटक हा साहित्याचा एक भाग आहे. आपली संस्कृती, वारसा जतन करायचा असेल तर संस्कृत नाटक जपणं ही आपली जबाबदारी आहे, असे मत नाट्यकलावंत आणि संस्कृत अभ्यासक तन्मय भोळे यांनी व्यक्त केले.
इंडिया दर्पण फेसबुक लाईव्हमध्ये ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य संस्कृत राज्यनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेते ‘मृगयाकलह:’ या नाटकाविषयी आणि संस्कृत रंगभूमीची गरज याविषयी नाट्यकलावंत तन्मय भोळे, चैतन्य गायधनी आणि सागर संत यांची विशेष मुलाखत आयोजित केली होती. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. आपली संस्कृती, वारसा ही आपली ओळख आहे. आज प्रत्येकजण आपली ओळख निर्माण करण्यासाठी बाहेर पडतो पण संस्कृत नाटक बाजूला ठेवून आपण आपली ओळखच गमावून बसतोय हे आपल्या लक्षात येत नाही. ती ओळख टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे असे मत तन्मय भोळे यांनी व्यक्त केले.
अनेकदा संस्कृत नाटकाच्या बाबतीत भाषा हा मुद्दा येतो त्याविषयी चैतन्य गायधनी म्हणाले की, संस्कृत भाषा कळत नाही हा मुद्दा नाटकाच्या बाबतीत योग्य नाही. नाटकासाठी भाषा कधीच अडसर ठरत नाही. कारण कलेची स्वतंत्र अशी भाषा असते बऱ्याचदा नाटक हे भाषा विरहितही असू शकते. पण या मुद्यावर विचार करता आम्ही एक उपक्रम सुरू केला आहे की प्रेक्षकवर्गाला मराठीत नाटकाविषयी एक पत्रक देणार ज्यात नाटकाची थोडक्यात कथा असेल म्हणजे नाटक बघताना अडचण येणार नाही. याबाबतीत समीक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे मराठी नाटकाचं, स्पर्धेचं परीक्षण केले जाते त्याप्रमाणे संस्कृत नाटकाचं परीक्षण होत नाही. भाषा हा मुद्दा बाजूला ठेवून नाटक या दृष्टीने याकडे पाहिले पाहिजे.
नाटकाच्या अनुभवाविषयी सागर संत म्हणाले की, याआधी मी संस्कृत नाटकात काम केले आहे पण नाटकात काम करायचं या दृष्टीने मी बघायचो. पण आता मी संस्कृतशी जोडलो गेलो आहे. मोठमोठ्या लोकांना मी मेहटन करताना बघतोय त्यामुळे यापुढे मी सुद्धा संस्कृत भाषेला जपणार आहे. माझा व्यवसाय याज्ञीकी असल्याने अजून शिकण्याची आवड निर्माण झाली आहे. नाशिकच्या प्रयोगापेक्षा पुण्यात प्रयोग करताना भीती होती कारण पुण्यात अनेक जाणकार प्रेक्षक समोर होते. दुसऱ्या आलेल्या संघाने प्रतिक्रिया दिली की तुमचं नाटक पहिलं आलं याचा आम्हाला आनंद झाला. आमचा विचार, उद्देश त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचा आनंद आहे.
नाटकाच्या विषयाबद्दल तन्मय भोळे यांनी सांगितले की, नाटकाचा विषय ही महाभारतातील एक प्रसिद्ध कथा आहे. अर्जुन पाशुपतास्त्रविद्या प्राप्त करण्यासाठी शंकराची आराधना करतो हा विषय आहे. पण नाटक एवढ्यावरच आधारित नाही तर ४५ मिनिटांच्या नाटकात १२ मिनिटांची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत संस्कृत रंगभूमीच्या समस्या, लोकं का वळत नाही हे विनोदी पध्दतीने मांडलं आहे. या नाटकाची विषय ही जमेची बाजू नसून सादरीकरण ही जमेची बाजू आहे. नवीन कलाकारांनी आव्हानात्मक गोष्टी कराव्या आणि संस्कृत नाटक नक्कीच आव्हानात्मक आहे. यामुळे भाषा शुद्धी, उच्चारण सुधारते. आणि नवीन माहिती मिळेल आणि अभ्यासपूर्ण नाटक करण्याचा आनंद यातून नक्कीच मिळेल असे मत चैतन्य गायधनी यांनी व्यक्त केले.