नाशिक: रस्त्यावरील मुके, भटके प्राणी यांचे रस्ता हेच घर असते. ती जागा त्यांच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. अनेकदा आपण बाहेर जाताना कुत्र्याला लाथ मारतो, दगड मारतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतो पण अशा गोष्टीला कायद्यात तरतुदी आहेत. कायद्याने या प्राण्यांना संरक्षण दिले आहे. असे माहिती सामाजिक कार्यकर्त्या भारती जाधव यांनी सांगितली.
इंडिया दर्पण फेसबुक लाईव्हमध्ये भटक्या प्राण्यांसाठी असलेले कल्याणकारी कायदे आणि उपक्रम याविषयी सामाजिक कार्यकर्त्या भारती जाधव आणि डॉ. वर्षा चित्तीवाड बोलत होत्या. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. त्यांच्याकडे कशाप्रकारे दुर्लक्ष केले जाते याविषयी डॉ वर्षा चित्तीवाड म्हणाल्या की, रस्त्यावर एखाद्या कुत्र्याचा अपघात झाला किंवा आजारी असलेले कुत्रे रस्त्यावर पडले असेल तर नागरिक म्हणून त्याला मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. रस्त्यावरच्या कुत्र्यांकडे कायम दुर्लक्ष केले जाते, माणुसकी आज कुठेतरी लोप पावत चालली आहे आणि ही शोकांतिका आहे. आपल्या संस्कृतीत भूतदया सांगितली आहे, त्यांनाही भावना असतात हे आपण विसरता कामा नये. पशुप्रेमी, प्राणीप्रेमी किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात आपण फोन लावू शकतो.
प्राण्यांसाठी असलेल्या कायद्यातील तरतुदीविषयी भारती ताई म्हणाल्या की, भटक्या, मुक्या प्राण्यांसाठी कायद्यात अनेक तरतुदी आहेत. सेक्शन 11 (1A), (1I), (1J) यामध्ये काही तरतुदी आहेत. प्राण्यांचे हक्कही त्यात सांगितले आहेत. ते हक्क हिरावले गेले तर कारवाई होऊ शकते. या कायद्यानुसार प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. त्यांना मारणे, त्रास देणे, अत्याचार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. कुत्र्याला दगड मारला किंवा लाथ मारली तर ५ ते ७ वर्षांची कैद होऊ शकते. तसेच माकड, पोपट, मैना, बुलबुल हे पक्षी आपण घरात पाळू शकत नाही. हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी ५ वर्षांची कैद किंवा २५ हजार रुपये दंड होऊ शकतो. पुढे त्या म्हणाल्या की बऱ्याचदा लोक तक्रार करतात की कुत्रे त्रास देतात, चावतात पण त्यामागे काही कारणे असतात म्हणजे त्यांच्या पिल्लाच्या अंगावरून गाडी गेलेली असते, ते खूप दिवसांपासून उपाशी असतात किंवा त्यांची कोणतरी खोडी काढलेली असते.
उपक्रमांविषयी बोलताना डॉ वर्षा चित्तीवाड यांनी सांगितले की, नाशिकमध्ये ऍनिमल लव्हर या नावाने आम्ही व्हाट्सएप ग्रुप तयार केला आहे. प्राण्यांविषयी प्रेम असलेले सगळे लोकं यात एकत्रित आलो आहोत. या माध्यमातून आम्ही प्राण्यांसाठी रुग्णवाहिकेची मागणी करणार आहोत. तसेच पशुवैद्यकीय दवाखाना २४ तास चालू राहावा यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या १००-१५० लोकांनी एकत्र येऊन आम्ही पाण्याचे पॉटस तयार केले आहेत. ज्यांना गरज लागेल त्यांना आम्ही हे देतो. सध्या आम्ही जॉगिंग ट्रॅकवर जनजागृतीसाठी कार्ड्स घेऊन उभे राहतो. पुढे त्या म्हणाल्या की, कुत्र्यांना निर्बीजीकरणाकरता नेले जाते अशावेळी त्यांना अँटी रेबीज इंजेक्शन दिले पाहिजे त्याचबरोबर सेव्हन इन वन इंजेक्शन त्यांना दिले तर अधिक फायदा होईल. यात सात वेगवेगळ्या आजारांवर हे काम करते. त्यामुळे कुत्र्यांचे अकाली मरण वाचवता येईल. कोणाला चावले तरी धोका निर्माण होणार नाही. नाशिक महानगरपालिकेने हे उपक्रम राबवावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
उन्हाळ्यात आपल्याच अंगांची लाही लाही होते तर रस्त्यावर राहणाऱ्या कुत्र्यांना प्रचंड त्रास होतो. म्हणून नागरिकांनी आपल्या भागत या प्राण्यांसाठी पाण्याचे पॉटस ठेवावे आणि त्यांच्या खाण्याची सोय करावी. आपल्या भागातील भटके, मुके जीव उपाशी राहू नये यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.