भागा वरखेडे, जेष्ठ पत्रकार
भारत-पाकिस्तान संघर्षाच्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माझ्या इशाऱ्यानंतरच दोन्ही देशांनी माघार घेतल्याचे सांगितले होते. भारताने द्विपक्षीय संबंधात तिसऱ्याची मध्यस्थी नेहमी नाकारली. वारंवार त्याबाबत स्पष्टीकरण दिले. युक्रेन-रशिया युद्धातही असाच आगाऊपणा ट्रम्प यांनी केला. आता इराणवर हल्ला केल्यानंतर इराण-इस्त्रायल संघर्षात ट्रम्प यांनी परस्पर शस्त्रसंधी जाहीर करून टाकली. इराण आणि अमेरिकेतील संघर्षात किती सच्चेपणा आहे, याबाबत आता साशंकता घेतली जात आहे.
इराणने कतारमधील अमेरिकन लष्करी तळ अल-उदेदवर क्षेपणास्त्र हल्ला करून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील अणु तळांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने हा हल्ला केला; पण नंतर जगभरात असे वृत्त आले, की इराणने कतार आणि अमेरिकेला या हल्ल्याची आगाऊ माहिती दिली होती. आता प्रश्न निर्माण होतो, की हा कोणत्या प्रकारचा हल्ला होता. कतारमधील अमेरिकन हवाई तळावर इराणचा हल्ला केवळ प्रतीकात्मक होता. जीवित आणि मालमत्तेचे नुकसान कमीत कमी व्हावे म्हणून ही माहिती आगाऊ देण्यात आली होती. परिणामी, इराणची बहुतेक क्षेपणास्त्रे नष्ट झाली आणि त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर बदला घेण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी इराणने हा हल्ला केला होता. याची पुष्टी स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट केली, की इराणचा प्रतिसाद ‘कमकुवत आणि अपेक्षित’ होता आणि ‘आशा आहे की आता यापुढे द्वेष निर्माण होणार नाही.’ आधीच माहिती दिल्याबद्दल ट्रम्प यांनी इराणचे आभार मानले. त्यामुळे एकही जीवितहानी झाली नाही आणि कोणीही जखमी झाले नाही. कदाचित आता इराण या प्रदेशात शांतता आणि सौहार्दाकडे वाटचाल करू शकेल आणि मी इस्रायलला शांततेचा मार्ग अवलंबण्यास सांगू शकेल. काही तासांनंतर ट्रम्प यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये घोषणा केली, की इराण आणि इस्रायल ‘पूर्ण आणि कायमस्वरूपी युद्धबंदी’वर सहमत झाले आहेत. पुढील सहा तासांत ती लागू होईल; पण ट्रम्प यांचा हा दावाही आतापर्यंत खोटा ठरला आहे. इराण आणि इस्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे.
अमेरिकेने २२ जून रोजी इराणच्या अणु तळांवर हल्ला केला होता आणि हा एकदाचा हल्ला असल्याचे आधीच सांगितले होते. त्यानंतर, इराणवर प्रत्युत्तर देण्यासाठी दबाव होता. हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कतारमधील अमेरिकेन तळावर हल्ला करतानाही इराणला मोठे युद्ध नको होते, कारण त्याची अर्थव्यवस्था आधीच कमकुवत आहे. म्हणूनच, इराणने कतारमधील अल-उदेइद तळावर लक्ष्य केले. तिथे अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडचे मुख्यालय आहे. कतारमध्ये हल्ला का करण्यात आला याचे एक कारण म्हणजे इराण आणि कतार यांच्यात चांगले संबंध आहेत. कतारने या भागात तटस्थ मध्यस्थीची भूमिका बजावली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील चर्चेत कतारचीच मध्यस्थता यशस्वी झाली होती. हल्ल्यापूर्वी इराणने कतारला माहिती दिली. त्यानंतर कतारने त्याचे हवाई क्षेत्र बंद केले. अमेरिकेने गेल्या एका आठवड्यात अल-उदेइदवरून आपली बहुतेक विमाने हटवली. १९ जूनपर्यंत फक्त पाच अमेरिकन विमाने तिथे उरली होती. यावरून हे स्पष्ट होते, की इराणचा उद्देश मोठे नुकसान करणे हा नव्हता, तर आपली ताकद दाखवणे होता.
गेल्या १२ दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. इस्रायलने इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (आयआरजीएस) च्या मुख्यालयासह अनेक तळांवर हल्ला केला. त्यात अनेक शास्त्रज्ञ, सैनिक, कमांडर मारले गेले आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणच्या संरक्षण यंत्रणेचे, लष्कराचे आणि अणु तळांचे मोठे नुकसान झाले. प्रत्युत्तरादाखल इराणने पहिल्यांदाच इस्रायलवर आपल्या देशाचे मोठे क्षेपणास्त्र डागले आहे. त्यामुळे इस्त्रायलचेही मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही देशांना, विशेषतः इराणला आता युद्ध नको आहे. इराणला युद्ध नको आहे, म्हणूनच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देऊनही तसे केले नाही. जगभरातील इराणी ऊर्जेच्या गरजांसाठी हा जलमार्ग महत्त्वाचा आहे. याशिवाय, इराणने या हल्ल्यात येमेनच्या हुथी किंवा लेबनॉनच्या हिजबुल्लाहसारख्या आपल्या सहयोगी गटांना सामील केले नाही. यावरून हे स्पष्ट होते, की तणाव आणखी वाढू नये म्हणून इराणने विचारपूर्वक आणि मर्यादित प्रतिसाद दिला. ट्रम्प ज्या पद्धतीने युद्धबंदीबद्दल बोलत आहेत, त्यावरून असे दिसते, की अमेरिकेला मध्य पूर्वेत दीर्घ युद्ध नको आहे.
प्रश्न असा आहे, की इस्रायलने इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे संपवण्यासारखे सर्व लक्ष्य पूर्ण केले आहे का, इराणने अमेरिकेच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत का, हे काळच सांगेल; पण सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची शक्यता आहे असे दिसते. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीबाबत ट्रम्प यांचा अहंकार पुन्हा एकदा समोर आला आहे. राष्ट्रपती कार्यालयातील, व्हाईट हाऊसमधील कर्मचारीदेखील ट्रम्प यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ट्रम्प यांनी यापूर्वीही भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्याचा दावा केला होता. त्यांनी युद्धबंदीबाबत परस्परविरोधी विधाने केली. ट्रम्प यांनी सोमवारी रात्री घोषणा केली, की त्यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी घडवून आणली आहे. ट्रम्प म्हणाले, की त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून बोलून त्यांना युद्धबंदीसाठी राजी केले. ट्रम्प यांनी कतारचे अमीर आणि पंतप्रधान अल थानी यांच्याशीही फोनवर बोलल्याचे वृत्त आहे आणि त्यांना युद्ध थांबवण्यासाठी इराणला राजी करण्याची विनंती केली आहे; पण त्यानंतर काही तासांनीच ट्रम्प यांनी एक नवीन दावा केला.
त्यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले, की सोमवारी रात्री इराण आणि इस्रायल दोघांनीही जवळजवळ एकाच वेळी त्यांच्याशी संपर्क साधला आणि शांतीची इच्छा व्यक्त केली. मला माहीत होते, की आता वेळ आली आहे. जग आणि मध्य पूर्वेसह दोन्ही देशांच्या आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा. भविष्य त्या दोन्ही देशांचे आहे. एक महिना आधी, जेव्हा भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे उद्ध्वस्त झालेल्या पाकिस्तानने भारताला युद्धबंदीची विनंती केली, तेव्हाही ट्रम्प यांनी तेच केले. दोन्ही देशांमधील युद्धबंदीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी, ट्रम्प यांनी दावा केला, की त्यांनी मध्यस्थी केली आहे आणि दोन्ही देशांना यासाठी राजी केले आहे; परंतु भारताने लगेच ते नाकारले. ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेचे वाईट स्वागत कसे झाले, हे यावरून दिसून येते, की घोषणेनंतरही इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागणे सुरूच होते.
इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी यापूर्वी युद्धबंदी पूर्णपणे नाकारली होती. ट्रम्प यांचे १२ दिवसांत अनेक वेळा बढाई मारणे दिसून आले. १३ जून रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला, तेव्हा ट्रम्प म्हणाले, की इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नाही. नंतर त्यांनी सांगितले, की इराणकडे अजूनही अणुकार्यक्रम सोडण्याची तयारी करण्यासाठी वेळ आहे. ४८ तासांत त्यांनी पुन्हा सूर बदलला. जी ७ शिखर परिषद सोडून घाईघाईने वॉशिंग्टनला पोहोचलेल्या ट्रम्प यांनी असे संकेत दिले होते, की अमेरिका इराणविरुद्धच्या इस्रायलच्या युद्धात सामील होईल की नाही हे दोन आठवड्यात ठरवेल; परंतु ४८ तासही उलटले नाही, तोच अमेरिकेने बी२ बॉम्बर्सने इराणच्या तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला. या हल्ल्याबद्दल त्यांनी खूप बढाई मारली २२ जून रोजी अमेरिकेच्या हल्ल्याची माहिती देताना, बढाई मारणाऱ्या ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांना ताबडतोब आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. त्यांनी असेही म्हटले, की अमेरिकेला सत्तापालट नको आहे; पण त्यानंतर २३ जून रोजी ‘मेक इराण ग्रेट अगेन’चा नारा देत त्यांनी तेथे सत्ता बदलण्याचे आवाहन केले. तथापि, त्यांनी पुन्हा एकदा २४ तासांच्या आत युद्धबंदी करण्याचा दावा करून स्वतःला शांतता प्रस्थापित करणारा म्हणून सादर केले. एकूणच ट्रम्प यांच्या धोरणात नसलेले सातत्य, त्यांचा आगाऊपणा, वारंवार भूमिका बदलणे यामुळे जगात त्यांचे हसे झाले आहे.