भागा वरखेडे, जेष्ठ पत्रकार
कोणत्याही महत्त्वाच्या पदावर निवड किंवा नियुक्ती करण्यासाठी राजकीय पक्ष सध्या त्या व्यक्तीची पात्रता पाहण्यापेक्षा तिची निवड केल्यामुळे आगामी निवडणुकीत मतांची बेगमी कशी करता येईल, याचा विचा करीत असतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत तर हा विचार अलिकडच्या काळात नेहमीच केला जातो. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मास्टर स्ट्रोक’ खेळला आहे. भाजपच्या दक्षिणानायनसाठीची ही चाल विरोधकांत फूट पाडण्याबरोबरच त्यांच्यात दरी निर्माण करण्यासाठी केलेली खेळी आहे.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष प्रणीत ‘एनडीए’ आघाडीने एकमताने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ही उमेदवारी जाहीर करताना महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा, झारंखड या पाच राज्यांतील मतांची बेगमी करण्याची खेळी भाजपने केली आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे दक्षिणायनाचे स्वप्न आहे. ते पूर्ण होत नाही. राधाकृष्णन यांची निवड करताना तमिळनाडू विधानसभेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवण्यात आल्या आहेत. राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांनी दक्षिण भारतात भाजपसाठी अनेक वर्षे काम केले आहे. ते तामिळनाडूत भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करून भाजपने दक्षिण भारताला थेट संदेश दिला आहे. तमिळनाडू आणि केरळ ही दक्षिण भारतातील अशी दोन राज्ये आहेत, जिथे सर्व प्रयत्न करूनही पक्षाची पकड तितकीशी मजबूत झालेली नाही. अशा परिस्थितीत राधाकृष्णन यांना इतके मोठे पद देऊन पक्षाने दक्षिण भारतातील राजकारण त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे, तेथील नेते त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे दाखवून दिले आहे. मागच्या वेळी जगदीश धनखड यांना उमेदवारी देतानाही पश्चिम बंगाल, हरियाणा आणि राजस्थानच्या मतपेढीचा विचार भाजपने केली होता. आता राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करून भाजपने द्रमुकची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी प्रतिभा पाटील यांची उमेदवारी राष्ट्रपतिदासाठी काँग्रेसने जाहीर केली होती, तेव्हा शिवसेनेने उघडउघड ‘एनडीए’च्या विरोधात भूमिका घेतली होती. मागच्या वेळी तृणमूल काँग्रेसने भाजपचा फायदा करून दिला होता. आता राधाकृष्णन यांना पुढे करून भाजपने ‘मास्टर स्ट्रोक’ खेळला आहे. त्यांना विरोध करणे कोणालाही सोपे जाणार नाही.
राधाकृष्णन हे स्वतः तामिळनाडूचे आहेत आणि सध्या तिथे द्रमुकचे सरकार आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांच्यापुढे पेच निर्माण होणार आहे. भाजपसाठी तामिळनाडूमध्ये आपली उपस्थिती मजबूत करणे हे अनेक वर्षांचे स्वप्न आहे. पक्षाने निश्चितच काही सुधारणा केल्या आहेत. संघटनात्मक बळ वाढवले आहे; परंतु तरीही अपेक्षेनुसार पाठिंबा मिळत नाही. त्यामुळेच आता पक्षाने राधाकृष्णन यांना पुढे करून ‘ओबीसी कार्ड’ खेळले आहे. राधाकृष्णन हे गॉन्टर (कोंगू वेल्लार) समुदायातून येतात. या समाजाला तामिळनाडूच्या राजकारणात एक महत्त्वाची ‘व्होट बँक’ मानले जाते. ही ‘व्होट बँक’ राज्याच्या पश्चिम पट्ट्यात आणखी निर्णायक ठरते, म्हणून भाजपने मोठा जुगार खेळला आहे.
राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार जाहीर करणे हा भाजपचा एक नवीन प्रयोग आहे. हा जुगार ‘इंडिया’ आघाडीत फूट पाडू शकतो. सर्वात मोठा धोका द्रमुकला आहे. त्याचे ३२ खासदार आहेत. काही वर्षांपूर्वी एका द्रमुक नेत्याने राधाकृष्णन यांच्याबद्दल म्हटले होते, की ते एक चांगले व्यक्ती आहेत; परंतु त्यांनी चुकीचा पक्ष निवडला आहे. द्रमुकच्या काही इतर नेत्यांनाही वैयक्तिकरित्या राधाकृष्णन आवडतात. अशा परिस्थितीत, द्रमुकसाठी त्यांना विरोध करणे सोपे होणार नाही. जर असे झाले, तर विरोधी पक्षात फूट पडू शकते. उपराष्ट्रपतिपदाच्या, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पक्षांमध्ये फूट पडणे सामान्य आहे. शिवसेनेने ‘एनडीए’चा भाग असताना प्रतिभा पाटील यांना त्या महाराष्ट्रातील असल्याने पाठिंबा दिला होता. अशा परिस्थितीत, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या मर्यादा ओलांडून मतदान करणे ही नवीन पद्धत नाही. राधाकृष्णन भाजपच्या साच्यात बसतात. त्यांना निवडण्याचे एक कारण म्हणजे त्यांची राजकीय पार्श्वभूमी. ते बराच काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले होते. त्यांच्यात एक शिस्त आहे, एक अशी विचारसरणी आहे, जिच्याशी कोणतीही तडजोड होणार नाही. गेल्या काही महिन्यांत असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये फूट पडल्याच्या बातम्या आल्या आहेत; परंतु भाजपला हे समजते, की दक्षिणेत विस्तारासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन अजूनही खूप महत्वाचे आहे, म्हणून संघाला खूश करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कधीकधी असे होते, की विरोधी पक्ष आपली रणनीती बनवतात; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक अशी चाल खेळतात, की विरोधी गट गोंधळून जातो. उपराष्ट्रपतिदासाठी राधाकृष्णन यांचे नाव पुढे करणे हा असाच एक ‘मास्टर स्ट्रोक’ आहे.
भाजपने उपराष्ट्रपतिपदासाठी धनखड यांना उमेदवारी दिली, तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अडचणीत सापडल्या होत्या. कारण धनखड त्या वेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल होते आणि ममता विरोधी पक्षांच्या टीममध्ये होत्या. शेवटी, त्यांनी धनखड यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. आता राधाकृष्णन यांच्या नावाच्या घोषणेमुळे शरद पवार, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन आणि स्टॅलिन यांच्यासमोरही तोच पेच आहे. मोदी यांनी सीपी राधाकृष्णन यांचे नाव पुढे करून या नेत्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासाठी समस्या अशी आहे, की जर त्यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला नाही, तर त्यांनी त्यांच्याच राज्यपालांच्या विरोधात मतदान केले असा थेट संदेश जाईल. म्हणूनच खा. संजय राऊत यांनी, ‘राधाकृष्णन खूप चांगले व्यक्ती आहेत. वादग्रस्त नाहीत आणि अनुभवी आहेत,’ असा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
स्टॅलिन यांचाही गोंधळ होणार आहे. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे आहेत आणि त्यांनी नेहमीच स्वतःला ‘अभिमानी आरएसएस केडर’ म्हटले आहे. आता स्टॅलिन यांनी त्यांना पाठिंबा दिला, तर द्रमुक मतदार प्रश्न करतील की स्टॅलिन यांनी ‘आरएसएस’ विचारसरणी असलेल्या नेत्याला का पाठिंबा दिला. जर त्यांनी विरोध केला, तर असा आरोप केला जाईल, की त्यांनी तमिळनाडूच्या पुत्राला नाकारले. म्हणजेच स्टॅलिनसाठीही ही निवडणूक धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशा स्थितीतील आहे. राहुल गांधी यांना सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन चालायचे आहे. त्यांच्यासमोर अशा परिस्थितीत सर्वात मोठे आव्हान आहे. ते ज्या विरोधी एकतेचा दावा करतात, ती राधाकृष्णन यांच्या उमेदवारीने डळमळीत होऊ शकते. आता ठाकरे आणि स्टॅलिन यांनी ‘एनडीए’ उमेदवाराला पाठिंबा दिला तर हा संदेश जाईल, की विरोधी आघाडीला एकसंध ठेवण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जातील. मोदी आणि अमित शाह यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते निवडणूक लढाईला केवळ आकड्यांचा खेळ मानत नाहीत, तर ती मानसिक लढाई बनवतात. राधाकृष्णन यांचे नाव जाहीर करून त्यांनी एकाच बाणाने तीन लक्ष्ये ठोकली आहेत. उद्धव यांना विरोध न करण्यास भाग पाडले गेले. स्टॅलिन यांना अशा परिस्थितीत टाकण्यात आले ,की कोणताही निर्णय त्यांच्यासाठी महागात पडेल. राहुल यांची ‘इंडिया’ आघाडीवर पकड नाही, असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण आता विरोधी एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठाकरे आणि स्टॅलिन यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला, तर विरोधी आघाडीतील दरी स्पष्टपणे दिसून येईल. त्यांची मतेही कमी होतील. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करून भाजपने काँग्रेसला सध्या बॅकफूटवर ढकलले आहे. ‘एनडीए’ आघाडीकडे असलेले सध्याचे संख्याबळ पाहता राधाकृष्णन यांचा विजय नक्की आहे. त्यांच्या निवडीने झारखंडचे माजी राज्यपाल राहिलेल्या दोघांना एकाचवेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती होण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झारखंडच्या राज्यपाल होत्या. त्याचबरोबर राधाकृष्णन हे तमिळनाडूचे तिसरे नेते उपराष्ट्रपतिपदी विराजमान होतील.