डॉ. केतकी मोडक
आज जग एका मोठ्या संक्रमणकाळातून वाटचाल करत आहे. सत्ता संघर्ष – मग तो आर्थिक असो, भौगोलिक असो, राजकीय असो की व्यापारविषयक असो – आज तो चरम सीमेवर जाऊन पोहोचला आहे. देशप्रेम, स्वदेशी वस्तू, स्वकीयांचा विकास या गोष्टी निःसंशय महत्त्वाच्या आहेतच पण परकीयांशी आंतरराष्ट्रीय संबंध सुरळीत ठेवणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. या पेचप्रसंगांमध्ये विविध देशांची कोंडी होताना दिसत आहे. नकळतपणे परिस्थितीशरणता अंगी बाणवावी लागत आहे, असे एक चित्र जगभरात सर्वत्र दिसत आहे. आणि या पार्श्वभूमीवर भारत मात्र आज जगाच्या पटलावर मोठ्या दमदारपणे वाटचाल करत आहे. भारताची सिंहगर्जना पुन्हा एकदा मुखरित झाली आहे. इतकेच नव्हे तर भारताच्या उक्तीबरोबरच त्याच्या कृतींकडेही जग आज अचंब्याने बघत आहे.
जगावर आलेल्या प्राकृतिक संकटाच्या काळात स्वतःकडील भांडार जगातील गरजूंसाठी खुले करण्यातला दिलदारपणा भारताकडे आहे. स्वतःच्या देशाचे प्राणपणाने रक्षण करताना, आक्रमण करावे लागले तरी त्यामुळे त्यातील निरपराध नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही, याची काळजी घेणे ही भारताची दृष्टी आहे. स्वतःच्या देशाच्या विकासासाठी झटून प्रयत्न करत असताना, ज्यांना विकासासाठी भारतासारख्या अधिक विकसित देशाच्या साहाय्याची आस आहे, अशा देशांना बरोबर घेऊन वाटचाल करण्याची सर्वसमावेशक वृत्ती आणि उमदेपणा भारताकडे आहे. आपल्याहून बलिष्ठ असणाऱ्या देशांची अरेरावी खपवून न घेण्याची स्वाभिमानी अस्मिता भारतापाशी आहे. जगामध्ये वेगाने घोडदौड करणारी अर्थसत्ता या दृष्टीनेही भारताकडे आज पाहिले जात आहे. भारताचे नवयुवक आज जगाच्या बाजारपेठेत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. पण, भारताने केवळ या जगत-भूमीवरच स्वतःची मजबूत पकड मिळविली आहे असे नव्हे तर, अंतरिक्षामध्ये त्याने घेतलेल्या गरुडभरारीमुळे जग थक्क होऊन भारताकडे पाहत आहे. भारताच्या सामर्थ्याचा परिचय जगभरातील अनेकानेक देशांना झाला आहे. विविध घटना-प्रसंगातून याची साक्ष मिळालेली आहे.
सर्व आघाड्यांवर भारत अशी दमदार वाटचाल करत असताना, स्वत्व न गमावता, आंतरराष्ट्रीय संबंध कसे जोपासायचे, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीयांची मूळ वृत्ती कशी वाढीस लावायची, याचा वस्तुपाठ आज भारत देत आहे. भारताला आता विस्मरणात गेलेल्या आपल्या प्राचीन वारशाची जाणीव झाली आहे आणि त्यातून त्याच्यामध्ये नवजागृती निर्माण होत आहे. जगाच्या पटलावर भारताचे जे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे आणि त्याचे जे वैशिष्ट्यपूर्ण नियत कार्य आहे, त्याकडे आता भारतीयांचे लक्ष पुन्हा हळूहळू वळू लागले आहे. शांती, योग आणि अध्यात्म या बाबतीत जगाला देण्यासारखा प्रचंड वारसा भारताकडे आहे, ते भारताचे जगाला योगदान असणार आहे, याची जाणीव आता भारताला पुन्हा नव्याने झाली आहे.
स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्षांहून अधिक कालावधी लोटल्यानंतरचे आजच्या भारताचे हे आश्वासक चित्र आहे. आणि याची पाळेमुळे थेट हजारो वर्षे मागे असलेल्या आपल्या भूतकाळामध्ये रुजलेली आहेत. त्या दिव्य वारशाची नवीन पिढीला पुन्हा एकदा आठवण करून देण्याची आवश्यकता आहे. हा गौरवशाली वारसा आपल्याला लाभलेला आहे, हे लक्षात आल्यावर भारताचे नवयुवक जगाच्या भीषण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सिद्ध होतील, म्हणून आज एक ध्वनिचित्रफित सोबत देत आहोत.
आज आपण ‘भारताचा आध्यात्मिक इतिहास’ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पॉंडिचेरीजवळील विश्वनगरी असलेल्या ऑरोविलमधील ‘सोपानम्’ ही संस्था आणि ‘ज्योतिर्मयी मिडिया हाऊस’, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारताचा आध्यात्मिक इतिहास’ ही ध्वनीचित्रफीत स्वातंत्र्य दिनी प्रकाशित होत आहे. मूळ इंग्रजीमध्ये असलेल्या Spiritual History of India या ध्वनिचित्रफितीचे हे मराठी रूपांतर आहे.
(लेखिका ‘अभीप्सा’ मराठी मासिकच्या संपादक आहेत.)
अधिक माहिती साठी बघा हा व्हिडिओ