दीपक ओढेकर, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार
जोर्जिंयातील बातुमी येथे झालेल्या तिसऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेत नागपूरकन्या आणि डॉ जितेंद्र आणि डॉ नम्रता या डॉक्टर द्वायिंची अवघ्या १९ वर्षे वयाची मराठी मुलगी, दिव्या देशमुख, ही महिला विश्वचषक विजेती व्हावी यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण गेल्या काही वर्षातील तिची प्रगती आणि घोडदौड ही थक्क करणारी आहे शिवाय भारतात महिला बुद्धिबळ या खेळात मराठी महिलाच सुरुवातीला आघाडीवर होत्या, कसे ते बघा.
१९८० च्या दशकात जेंव्हा भारतीय महिला बुद्धिबळ बाल्यवस्थेत होते त्यावेळी दै नवाकाळचे संपादक निळूभाऊ खाडिलकर जे स्वतः उत्तम खेळाडू होते, यांच्या तीनही कन्या, रोहिणी, जयश्री आणि वासंती, आपल्या उत्कृष्ट खेळाने क्रीडा क्षेत्र गाजवीत होत्या. त्यावेळी पुरुष बुद्धिबळ स्पर्धात महिला खेळाडूना खेळायला परवानगी नव्हती पण निळूभाऊ नी आपल्या मुलींसाठी ( विशेषत: रोहिणी साठी ) संघटनेशी लढून महिलांना पुरुषांच्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रयत्न केले आणि रोहिणी आणि इतर महिला अधिक अनुभव मिळावा आणि चांगल्या खेळाडूंबरोबर खेळायला मिळावे म्हणून राष्ट्रीय स्पर्धेत खेळू लागल्या.
त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन भाग्यश्री प्रवीण ठिपसे ( पूर्वीची साठे ) आणि अनुपमा रघुनंदन गोखले ( पूरवाश्रमीची अनुपमा अभ्यंकर ) यांनी महिला बुद्धिबळ क्षेत्र अनेक वर्षे गाजविले. १९८७ साली विश्वनाथ आनंद हा पहिला भारतीय ग्रँडमास्टर झाला आणि त्याने भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात फार मोठी क्रांती घडायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्राबाहेरील, विशेषतः तामिळ नाडू आणि आंध्र प्रदेशातील महिला खेळाडू भारतीय बुद्धिबळ क्षितिजावर चमकू लागल्या आणि जागतिक पातळीवर भारताचा दबदबा निर्माण होऊ लागला तो खास करून कोनेरू हंपी आणि द्रोणावली हरिका यांच्या मुळे. त्यांच्या सोबत सौम्या स्वामिनाथन, पद्मिनी राऊत, वंतिका अग्रवाल, तानिया सचदेव इ खेळाडूंनी हे क्षेत्र अधिक विस्तृत केले आणि भारत हे जागतिक महिला बुद्धिबळ यात एक ‘पॉवर हाऊस ‘ म्हणून आज पुढे आले आहे.
ही क्रांती घडत असताना दिव्या देशमुख सारखी आजच्या काळातील म्हणजे २१ व्या शतकात जन्मलेली दिव्या देशमुख स्वस्थ बसणे कसे शक्य आहे?
तिच्या वडिलांच्या पुढाकाराने आणि बुद्धिबळ या खेळाची आवड निर्माण झाल्याने तिने स्वतःला या 64 घरांच्या खेळात झोकून दिले इतके की महिला विश्वविजेती होऊनही ती म्हणते ” ही केवळ सुरुवात आहे, अजून खूप काही मिळवायचे आहे “. तिची भूक केंव्हा भागेल? ज्यावेळी ती कॅन्डीडेट स्पर्धा ( यात जगातील अव्वल १४ महिला खेळतात आणि त्यातील विजेती आधीच्या विश्वविजेत्याशी चॅलेंजर म्हणून खेळते आणि जिकल्यावर विश्वविजेती होते ) जिंकेल आणि त्यानंतर माजी विश्वविजेतीबरोबर दोन हात करून ते पद स्वतःच्या नावावर करेल, त्याच वेळी भागणार असे स्पष्ट दिसत आहे.
आपल्या या रोमहर्षक प्रवासात तिने मागील वर्षी U २० चे जुनिअर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद बुद्धीची विलक्षण चमक आणि झेप दाखवून आपल्या नावावर केले. गेल्या काही स्पर्धात तिने चीनच्या आणि जगात अव्वल स्थानी असलेल्या टॅन झोन्गयी, ली टिंगजी आणि झू जिनेर यांना पराभूत करून चीनची मक्तेदारी मोडीत काढून खळबळ माजवून दिली आणि भारतात देखील वैशाली, हंपी आणि द्रोणावली या दक्षिणेतील खेळाडूंचीही मोनोपॉली मोडीत काढली.
काल ज्यांनी अंतिम लढतीसाठी झालेला टायब्रेकर बघितला असेल त्यांच्या लक्षात आले असेल की हंपीला हा पराभव फारच वर्मी लागला असावा कारण तिने हरल्यानंतर दिव्याशी फक्त हस्तादोलन केले आणि फटकन बोर्डापासून निघून गेली! आपल्यापेक्षा निम्या वयाची (दिव्या १९ वर्षे तर हंपी ३८ वर्षे) काल आलेली मुलगी पराभव करते हे पचविणे हंपीला जड गेले असावे.
काही वर्षापूर्वी ग्रँडमास्टर अभिजित कुंटे नाशिकला आले असताना बुद्धिबळ याविषयी गप्पा मारताना ते म्हणाले होते. बुद्धिबळ फार वाईट खेळ आहे. यात पत्नीकडून झालेला पराभव ही फार जिव्हारी लागतो, कोनेरू हंपीचे तसेच झाले असावे. खरंतर हंपीने दिव्याला मिठी मारून अभिनंदन करायला हवे होते असे वाटून गेले! काहीही असो पण मराठी मनाला आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी कामगिरी एका मध्यमवर्गीय मराठी मुलीने करावी याचे कौतुक करायला शब्द अपुरे पडावे!
दीपक ओढेकर
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार