गौतम संचेती, नाशिक
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु असल्यामुळे इतर राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. या सर्व घडामोडीत शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले असले तरी शिवसेना शिंदे गटाची चिंता वाढली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र या दोन्हींच्या आक्रमक पक्षांतराच्या घडामोडीत काहीच करता येत नसल्याची खंत आहे. भाजपच्या या इनकमिंगमुळे सुप्त अंतर्गत वाद सुरु झाला असून तो पक्षासाठी मारक ठरणारा आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही भाजपने असे प्रयोग केले. पण, आताचा भाजपचा हा प्रयोग स्वपक्षींयांना दुखावणारा आहे. गेल्या काही दिवसात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पुढा-यांना बाजूला ठेवत अनेकांना पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे आमदारांपासून अनेक पदाधिकारी नाराज झाले. काहींनी तर उघड नाराजी व्यक्त केली. पण, पक्ष वाढवायचा असे सांगत हे प्रवेश देण्यात आले. त्यामुळे स्थानिक भाजपच्या अनेक नेत्यांची अडचण झाली आहे. या सर्व पक्षप्रवेश सोहळ्यात कुठेही भाजपचे नाशिकचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष दिसले नाही.
या सर्व घडामोडींचे केंद्र मंत्री गिरीश महाजन असून त्यांनी स्थानिकांचा विरोध झुकारुन अगोदर सुधाकर बडगुजर व आता गणेश गिते यांच्यासह अनेकांना प्रवेश दिला. आता या पक्षप्रवेशामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे गणितही बिघडणार आहे. अनेक भाजप कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रभागात नवीन आलेल्या नेत्यांमुळे अडचण झाली आहे. तर काहींना एकेकाळी ज्यांच्या विरोधात रान उठवले. त्यांच्याबरोबर प्रचार व पक्षात काम करणे अवघड वाटू लागले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी २०१८ साली जळगावमध्ये असाच महानगरापालिका निवडणुकीत प्रयोग केला. त्यावेळी त्यांनी अनेक राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. या बळावर त्यांनी सुरेश जैन यांच्या सत्तेला सुरुंग लावत ७५ पैकी ५७ नगरसेवक निवडून आणले. या निवडणुकीत जैन यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अवघ्या १५ जागा मिळाल्या तर एमआयएमला ३ जागा मिळाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी भोपळाही फोडू शकले नाही. पहिल्यांदा भाजपला हे मोठे यश मिळाले. पण, अवघ्या अडीचच वर्षात भाजपचे ५७ पैकी २७ नगरसेवक फुटले. त्यांनी शिवसेनेला साथ देत शिवसेनेच्या जय़श्री महाजन यांना महापौर बनवले. शिवसेनेची कमी संख्या असतांना जयश्री महाजन यांना ४५ मते पडली. त्यात शिवसेना १५, भाजप फुटीर गट २७ व एमआयएमचे ३ नगरसेवक होते. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना अवघी ३० मते पडली.
दुस-या पक्षातून नगरसेवक आपल्या पक्षात घेणे जळगावमध्ये जसे भाजपला महागात पडले. तसे नाशिकला सुध्दा होऊ शकते. त्यामुळे भाजपने नाशिकचा जळगाव पॅटर्न करु नये याची काळजी घ्यावी. नाशिकमध्ये भाजपची मुख्य लढत ही शिवसेना ठाकरे गटाशी नाही तर त्यांची लढत होणार आहे ती शिवसेना शिंदे गटाची. काँग्रेस व राष्ट्रवादीचे दोन्ही गट नाशिकमध्ये प्रबळ नाही. तर मनसेची ताकद काही प्रभागातच आहे. त्यामुळे भाजपने वेळीच सावध होणे गरजेचे आहे. नाही झाले तर नाशिकमध्ये सुध्दा जळगाव पॅटर्न घडू शकतो…