-विशाखा देशमुख, जळगाव
आपल्या जादुई आवाजाने एके काळी सर्वांना आपलेसे करणारे ज्येष्ठ गायक वसंतराव देशपांडे यांची ३० जुलै रोजी पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या जीवन चरित्राचा घेतलेला हा आढावा……निसर्गात ठायीठायी संगीत भरलेलं आहे यावर श्रद्धा असलेला मी एक वाटसरू. स्वरांच्या शोधार्थ निघालेला मी एक स्वरवेडा आहे’, हे उद्गगार आहेत आपल्या अनोख्या आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणारे प्रतिभावंत चतुरस्त्र कलावंत वसंतराव देशपांडे यांचे. त्यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या नाटकातील खान साहेबांची भूमिका अजरामर करून नाट्यसंगीतात अनोखे राज्य प्रस्थापित केले. वसंतराव व त्यांचं गायन यांचा प्रभाव रसिक मनावर पडला तो कट्यार नाटकानेच. पण केवळ नाट्यसंगीतच नव्हे तर गायनातील शास्त्रीय संगीताबरोबरच इतरही प्रकार सहजतेने गाणारे वसंतराव देशपांडे यांचे पूर्ण नाव वसंत बाळकृष्ण देशपांडे. वसंतरावांचा जन्म २ मे रोजी मूर्तिजापूर येथे झाला. स्वतःच्या गळ्याला सूर आहे ही जाणीव त्यांना लहानपणीच झाली होती. त्यांची आई राधाबाई यांचा आवाज अतिशय गोड होता. मंदिरातील काकड आरती, भजन व गाणी यांचं पाठांतर राधाबाई यांचं थक्क करणार होतं. मातृभक्त वसंताने या सर्व गोष्टी आईच्या सहवासात पाठ केलेल्या होत्या. घरात लहान मुलगा गातो याचेही कौतुक सगळ्यांना वाटत असे. प्रत्यक्ष वसंताचे आजोबा गोविंदराव देशपांडे यांचं गायक म्हणून अमरावती जिल्ह्यात नाव होतं. वडील तबला वाजवत आणि गाण्यातली जाणकार असणारी व्यक्ती म्हणून त्यांना सर्व ओळखत. पुढे देशपांडे कुटुंब नागपूर मुक्कामी आले. याच नागपुरात त्यांचा बराचसा काळ गेला. त्यामुळे त्यांच्या नावाने वसंतराव देशपांडे सभागृह तेथे दिमाखात उभे आहे.
या काळात गणपतीच्या दिवसात मेळे होत. त्यात हे दोघे गाण्याचे काम करीत. या मेळ्यात काम केल्याने वसंतामध्ये सभाधीटपणा आला होता. काही दिवसांनी वसंतरावांना ‘कालिया मर्दन’ या बोलपटातील कृष्णाच्या भूमिकेसाठी बोलावणे आले आणि ती भूमिका सर्वांनाच भावली. चरितार्थासाठी त्यांनी बरीच वर्षे संरक्षण हिशेब खात्यात नोकरी केली. संगीताची उपासना सुरू होती. याच काळात त्यांनी आफ्रिकेचा दौराही केला होता. जन्मजात गोड गळा असल्याने अनेक भावगीते, गझल, चित्रपट गीते त्यांनी गायली आहेत. ‘पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, अष्टविनायक, अवघाची संसार’ अशा चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. पु.ल. देशपांडे आणि वसंतराव यांची दाट मैत्री होती. पुलंनी संगीत दिलेल्या प्रत्येक चित्रपटात वसंतराव गायलेले आहे. त्यांच्या ‘तुका म्हणे आता’ आणि ‘दूध भात’ या चित्रपटातून कामेही केली होती. वसंतराव केवळ पार्श्वगायक म्हणूनच वावरले नाही तर माडगूळकर यांनी रचलेल्या ‘इंद्रायणी काठी’ या अभंगाची स्वररचना पु.ल. यांची आहे. ते गायले आहे पंडित भीमसेन जोशी यांनी मात्र ऑर्गनची साथ केली आहे, ती वसंतराव देशपांडे यांनी, खरं पाहिलं, तर वसंतरावांना ‘संगीताचा ज्ञानकोश’ असेच म्हणावे लागेल.
ते तबला उत्तम वाजवीत. नुसतं वाजवत नसत तर त्या वाद्याचा सखोल अभ्यास वसंतराव यांनी केला होता. तबला या विषयावर पुणे विद्यापीठाच्या संगीत रसग्रहण सत्रात त्यांनी प्रदीर्घ व्याख्यान दिलं होतं. त्यांनी अनेक भावगीते, गझल, चित्रपट गीते गाऊन आपला वेगळा ढंग लोकांसमोर ठेवला आहे. ‘लागी करेजवा कटार, शतजन्म शोधिताना, दाटून कंठ येतो, बगळ्यांची माळ फुले, प्रथम तुला वंदितो, कानडा राजा पंढरीचा, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, छेडीयल्या तारा, कुणी जाल का सांगाल का, या भवनातील गीत पुराणे, माझ्या कोंबड्याची शान, वाटेवर काटे वेचीत चाललो, दाटून कंठ येतो’ अशी त्यांची कितीतरी गाणी रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. नाट्यसंगीत या विषयावर तर वसंतराव तासनतास बोलत असत. त्यातही सौभद्र नाटक व त्याचे संगीत हा त्यांचा आवडीचा विषय. सौभद्र हे संपूर्ण नाटक वसंतरावांचे पाठ होतं. आपण गायक होण्यात ते अनेकांना श्रेय देतात.
त्यांचे मामा यांनीही आपल्याला घडवले हे सांगण्यास ते विसरत नसत. तसेच माझ्या आयुष्याला वेगळं वळण लावायचं श्रेय सर्वस्वी बेगम साहेबांना आहे. फार मोठे उपकार करून ठेवले आहेत त्यांनी माझ्यावर. ‘बेगम साहेब माझ्यावर जर माया ना करत्या तर मी जन्मभर कारकुनीच करत राहिलो असतो” असे ते म्हणत. कारण पिंड कलावंतांचा आहे हे ठाऊक असूनही नक्की काय करावं हे त्यांना ठरवता येत नव्हतं. पण बेगम साहेबांच्या बोलण्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि गाण्यासाठी पुढील आयुष्य समर्पित केले. नोकरीच्या पाशातून मुक्त झाल्यावर त्यांनी नाट्यसंपदाच्या ध्वनिमुद्रिका रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्या. एकूण १० नाटकातील २७ पदे त्यांनी केलेली आहे. त्याबरोबर भावगीतांच्याही ध्वनिमुद्रिका आहे. चित्रपटगीते आहे. शास्त्रीय संगीताच्या काढलेल्या पाच रागांच्या दीर्घ ध्वनिमुद्रिका आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना नाट्यसंगीत कला अकादमी दिल्लीतर्फे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता. नाट्य परिषदेतर्फेही त्यांचा सत्कार झाला होता. अशा अत्यंत आकर्षक व श्रवणीय आवाज असणाऱ्या वसंतरावांच्या गायनाने रसिक नेहमीच चिंब न्हाऊन निघणार आहे.