मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयसीसी जागतिक कसोटी चषक स्पर्धेअंतर्गत भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान खेळण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला २-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. पहिला सामना जिंकल्यावरही नंतरचे दोन्ही सामने गमावून भारताने मालिकाही गमावली आहे.
मालिकेतील पराभव फलंदाजांमुळे झाल्याचे बोलले जात आहे. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या फलंदाजीतील अपयशाबद्दल कर्णधार विराट कोहलीला विचारले असता, विराट पूर्ण विश्वासाने त्या दोघांचा बचाव करताना दिसला नाही. या प्रश्नाचा चेंडू त्याने निवडकर्त्यांच्या कोर्टात टोलावला.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे सहापैकी पाच डावात अपयशी ठरले आहेत. पूर्ण वर्षातही त्यांनी विशेष योगदान दिलेले नाही. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत १-२ ने पराभूत झाल्यानंतर दोघांवरही संघातून बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. सामन्यानंतर विराट कोहलीला पत्रकार परिषदेत जेव्हा पुजारा आणि रहाणेबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, की भविष्यात काय होणार आहे हे मी सांगू शकत नाही. याची चर्चा करण्यासाठी मी येथे बसलेलो नाही. तुम्ही हे निवडकर्त्यांना विचारायला हवे. हे माझे काम नाही.
विराट म्हणाला, की मी पुन्हा सांगू इच्छितो की, आम्ही चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना कायम पाठिंबा देणार आहोत. त्यांनी भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चांगली कामगिरी केली आहे. जोहान्सबर्गमध्ये त्यांनी महत्त्वाचा डाव खेळला आहे. या सारख्या कामगिरीला आम्ही एका संघाच्या रूपाने मान्यता देतो. संघ निवडकर्ते काय निर्णय घेतात, यावर मी येथे बसून काहीच बोलणार नाही.