मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा १७ डिसेंबरपासून दक्षिण अफ्रिकेचा दौरा सुरू होणार आहे. यादरम्यान भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेत तीन कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. या दौर्यासाठी भारतीय संघाची निवड या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या निवडीदरम्यान विराट कोहलीच्या भविष्यातील कर्णधारपदाबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.
जगभरात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या अवताराच्या प्रादुर्भावाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. हा विषाणू दक्षिण अफ्रिकेत सर्वप्रथम आढळला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण अफ्रिका दौर्यावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि दक्षिण अफ्रिका (सीएसए) एकमेकांच्या संपर्कात असून, सीएसएने जैवसुरक्षा वातावरण देण्याचे आश्वासन दिले आहे.
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले आहे. आता टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा असेल. विराट कोहली एकदिवसीय सामन्यांसाठी कर्णधार असेल की नाही, याचा निर्णय दक्षिण अफ्रिका दौर्यासाठी संघनिवड करताना होऊ शकतो.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने ही मालिका ३-० अशी खिशात टाकली. जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमी याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. रोहित शर्मा, ऋषभ पंत यांना कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. के. एल. राहुल दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांसाठी सर्व दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.