इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आपला गमावलेला फॉर्म शोधत आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून कोहलीने एकही आंतरराष्ट्रीय शतक केलेले नाही. परंतु आता शतक तर दूरच राहिले, कोहलीही धावाही करू शकत नाही. दमदार फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीचा फॉर्म नेमका गेला कुठे, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. परंतु कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाला विराटवर पूर्ण विश्वास आहे, हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. वेस्टइंडिज विरुद्ध झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विराटची बॅट तळपली नाही. या तीन सामन्यात तो केवळ २६ धावाच करू शकला. विराटने पहिल्या सामन्यात ८ तर दुसऱ्या सामन्यात १८ धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात तो भोपळा फोडू शकला नाही. विराटकडून धावा होत नसल्यामुळे क्रिकेटमधील तज्ज्ञ बोलू लागले आहेत. आता तर पत्रकार परिषदांमध्ये त्याच्या कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
https://twitter.com/_ratna_deep/status/1492214102231781376?s=20&t=WQ4_g8AnP00pXJ7rRTPnZA
पत्रकारांनी विराटच्या फॉर्मबद्दल विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, की, “विराटला आत्मविशासाची आवश्यकता आहे? तुम्ही काय म्हणत आहात? आम्हाला विराटच्या फॉर्मबद्दल अजिबात चिंता नाही. शतक न करणे ही वेगळी गोष्ट आहे. त्याने नुकत्याच दक्षिण अफ्रिकेत झालेल्या तीन सामन्यांमध्ये २५० धावा केल्या आहेत. त्याच्यासोबत काही चुकीचे घडत आहे असे मला वाटत नाही. त्याच्या फॉर्मबद्दल संघ व्यवस्थापनाला काळजी नाही.आम्हाला कुठे लक्ष केंद्रित करायचे आहे, हे आम्हाला खेळाडू आणि वैयक्तिकरित्या ठाऊक आहे”. यापूर्वी टी-२० विश्वचषकादरम्यान रोहितच्या फॉर्मबद्दल विचारलेल्या प्रश्नावर विराट म्हणाला होता की, “तुम्ही रोहितला टी-२० सामन्यांतून बाहेर काढणार आहात का? हे कळाल्यानंतरही त्याने आमच्यासाठी काय नाही ते केले आहे. हे खरेच अतुलनीय आहे”.