नवी दिल्ली – विराट कोहलीने टी-ट्वेंटी फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्यापासून त्याच्यामागील शुक्लकाष्ठ संपताना दिसत नाहीये. त्याच्या वागणुकीला कंटाळून एका वरिष्ठ खेळाडूने त्याची तक्रार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांच्याकडे केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या जागतिक कसोटी क्रिकेट चषकाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर त्याने केलेल्या वक्तव्याने संघातील अनेक खेळाडू नाराज झाले आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर विराट कोहली पत्रकारांशी बोलताना म्हणाला होता की, अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंमध्ये जिंकण्याची भावनाच नव्हती. त्याचे हे वक्तव्य संघातील काही खेळाडूंना आवडले नाही. त्यानंतर त्यांनी जय शाह यांच्याकडे तक्रार केली. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, कोहलीचे आता स्वतःवरील नियंत्रण ढासळत आहे. तो आपला सन्मान गमावत आहे. काही खेळाडूंना त्याची वागणूक अजिबात आवडत नाहीये. तो आता प्रेरणादायी कर्णधार राहिलेला नाही. त्याला खेळाडूंकडूनही सन्मान मिळत नाही. अनेक वेळा तो मर्यादेची सीमा ओलांडतो. आजकाल फलंदाजी बहरत नसल्याने विराट आणि प्रशिक्षक शास्त्री यांचे खटके उडताना दिसत आहेत. विराट सध्या संघाला व्यवस्थितरित्या हाताळू शकत नाही. ही गोष्ट त्याच्या वागणुकीवरून कळते आहे.