शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मिडियावर कोण कधी काय पसरवेल, याचा नेम नाही. बरेचदा सत्यता पडताळून न बघता थेट आरोप, टीका करणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड केल्या जातात. शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या बाबतीतही अश्याचप्रकारचा एक व्हिडियो सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आणि मंदीर व्यवस्थापन व हिंदूंवर टीका करण्यात आली.
धार्मिक स्थळांच्या संदर्भात सोशल मिडियावर अफवा पसरविण्याचे प्रमाण हल्ली जास्त वाढलेले आहे. यामुळे छोटे वाद व्हायचे, पण आता दोन गटांमध्ये हाणामारी होऊन शहरात कर्फ्यू लावण्याची वेळ सुद्धा आली आहे. काही दिवसांपूर्वी अकोला येथे घडलेली घटना एकदम ताजी आहे. आता सोशल मिडियावर एका व्यक्तीने धार्मिक स्थळी लोकांनी दान केलेले पैसे पोत्यात भरताना आणि त्यानंतर ते पैसे मोजतानाचे दृष्य दाखविणारा व्हिडियो शेअर केला आहे. सर्वांत पहिले ज्या व्यक्तीने ट्विटरवर हा व्हिडियो शेअर केला, तिने ‘शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दान केलेल्य़ा पैश्यांचे काय होत आहे बघा हिंदूंनो’ अशापद्धतीचा मजकूर टाकला आहे. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया आल्य़ा. त्यानंतर अनेकांनी त्या व्हिडियोचे सत्य दाखविण्याचे काम केले आहे. मुळात कुठलीही सत्यता न पडताळून बघता सोशल मिडियावर अफवा पसरविण्याचे काम होत असल्याचे सिद्ध झाले. कारण हा व्हिडियो शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील नाही, हे एका संकेतस्थळाने केलेल्या संशोधनात पुढे आले.
व्हिडियो कुठला?
हा व्हिडियो शिर्डीचा नाही, हे तर सिद्ध झालेच. पण त्याचवेळी भारतातील कुठल्याही धार्मिक स्थळावरील हे दृष्य नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. हा व्हिडियो बांगलादेश येथील नरसुंदर नदीच्या काठावर असलेल्या २५० वर्ष जुन्या मशिदीतील आहे. या मशिदीच्या आठ दानपेट्यांना ४.१८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी देणग्या मिळाल्या आहेत.