चंदीगड – संपूर्ण पंजाबमध्ये सध्या एकाच फोटोची चर्चा आहे. ती म्हणजे, एका गावात वीज पुरवठ्याची मोठी तक्रार होती. ती समजताच मुख्यमंत्री चरणजीत सिंग चेन्नी हे गावात आले आणि ते स्वतःच वीजेच्या खांबावर चढले. त्यानंतर त्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन आम आदमी पार्टीसह भाजपने काँग्रेस व मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका सुरू केली आहे. हा व्हायरल फोटोचे सत्य असे आहे की, हा फोटो आताचा नसून तो २०१६ मधील आहे. त्यावेळी चरणजीत सिंग हे काँग्रेसचे आमदार होते. एका गावाची तक्रार आल्यानंतर ते स्वतः तेथे गेले आणि थेट खांबावर चढले होते. तेव्हाचा हा फोटो आता व्हायरल केला जात असल्याचे आपचे म्हणणे आहे. अशा जुन्या फोटोंनी सत्ताधाऱ्यांचा कारभार लख्ख असल्याचा उजेड पडणार नाही तर उलट त्यांना हा स्टंट महागात पडेल, असे भाजपने म्हटले आहे. दरम्यान, या फोटोची आता संपूर्ण देशभरातच चर्चा होऊ लागली आहे. कारण, हा फोटो आता देशभरातील सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.