नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेतर्फे (आयसीसी) १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नोव्हेंबर २०१९ नंतर विराटला एकही शतक झळकावता आले नाही. कर्णधारपदाच्या दबावामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांतही त्याला याच परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कर्णधारपदी कायम राहणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट फॉरमॅटच्या कर्णधारपदी कायम राहणार आहे. मात्र भारतात २०२३ मध्ये होणा-या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत विराट भारतीय संघाचा कर्णधार राहील किंवा नाही याबाबत आताच स्पष्ट काही सांगता येऊ शकत नाही. कार्यभार व्यवस्थापनाच्या दृष्टीने टी-ट्वेंटी फॉरमॅटचे कर्णधारपद सोडणे स्वीकार्ह कारण आहे. परंतु २०२३ पर्यंत भारतीय संघाचा व्यग्र कार्यक्रम पाहता एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेशिवाय भारताला वीस द्विपक्षीय टी-ट्वेंटी सामने खेळायचे आहेत.
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (बीसीसीआय)च्या सूत्रांनुसार, यूएईमध्ये टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली नाही, तर विराटला टी-ट्वेंटी फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून हटविले जाऊ शकते, हे विराटला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे त्याने टी-ट्वेंटीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर करून योग्य कृती केली आहे. त्याने आपल्यावरील दबाव कमी केला आहे. तो त्याच्या अटींवर काम करत होता. जर टी-ट्वेंटीमध्ये कामगिरीत घट झाल्यास ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये असे होऊ नये. आगामी काळात बीसीसीआयकडून एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून विराटला हटविले तर आश्चर्य वाटून घेऊ नये. टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत अपयश आल्यानंतर विराटला ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये फक्त फलंदाजाच्या रुपातच मैदानात उतरावे लागू शकते. ड्रेसिंग रूममध्ये उपकर्णधार रोहित शर्मालासुद्धा लीडर मानले जाते. युवा खेळाडूंना सोबत घेऊन मार्गक्रमण करण्याची पद्धत त्याने आत्मसात केली आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळताना रोहितने हीच पद्धत अवलंबली आहे.
बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात काही रोचक बाजू समोर आल्या आहेत. त्याबाबत बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी सांगतात, तुम्ही जर सौरव गांगुली आणि जय शाह यांचे वक्तव्य पाहिले तर दोघांनी शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु २०२३ पर्यंत विश्वचषकापर्यंत विराट कर्णधारपदी राहण्याबाबत काहीच सांगितले नाही. त्यामुळे विराट कर्णधारपदी कायम राहण्याबाबतचा निष्कर्ष काढता येणार नाही.