मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येत्या २५ व २६ डिसेंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंह यांच्या चार सुपुत्रांच्या हौतात्म्यास समर्पित ‘वीर बाल दिवस’ आयोजित करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार नांदेड येथे ‘वीर बाल दिवस’ आयोजित करण्याबाबत मंत्री श्री. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला पर्यटन विभागाच्या सहसचिव उज्ज्वला दांडेकर, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. पी.एस पसरिचा, सल्लागार जसबीर सिंह धाम आदी उपस्थित होते.
पर्यटन विभाग आणि तख्त सचखंड श्री हुजुरसाहेब गुरुद्वारा, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडमध्ये वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन दि. २५ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले.
दोन दिवसीय कार्यक्रमात परिसंवाद, रागी आणि कथावाचन, गोदावरी तीरावर मार्शल आर्टचे प्रात्यक्षिक, वक्तृत्व व काव्य वाचन स्पर्धा, कथाकथन, लेजर शो आणि कीर्तनांचे आयोजन करावे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील नागरिकांसह प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी, लेखक, साहित्यिक, प्रशासनातील अधिकारी, पत्रकारांचा सहभाग नोंदविण्यासाठी निमंत्रण देण्याचे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले.
विशेष रेल्वेसाठी रेल्वे मंत्र्यांना पत्र
नांदेड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या वीर बाल दिवसानिमित्त देशभरातून भाविकांसाठी विशेष रेल्वे सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्री डॉ.अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवण्यात आले असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.
Vir Bal Divas Celebrate in This City Special Railway
Nanded Tourism Guru Govind Sing