इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमधील वडोदरा येथील रावपुरा भागात दोन गटांमध्ये हिंसक चकमक उडाली. दोन मोटारसायकलींची टक्कर होण्यावरुन वाद सुरू झाला आणि प्रकरण खूप पुढे गेलं. एका गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक केली. या हिंसाचारात चार जण जखमी झाले असून १०हून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केल्यानंतर प्रकरण मिटले आहे.
वडोदराचे पोलिस आयुक्त शामहर सिंह म्हणाले, “रावपुरा भागात अपघातानंतर दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. शहरात सध्या शांतता आहे. पोलिसांचे पथक गस्त घालत आहे. इतर दलांनाही सतर्क करण्यात आले आहे. आम्ही तसे आदेश दिले आहेत. लोकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.” यापूर्वी गुजरातमधील हिम्मतनगर आणि खंभात शहरात रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये जातीय संघर्ष झाला होता. खंभात येथे झालेल्या जातीय हाणामारीत एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जातीय चकमकी दरम्यान, दगडफेक करणाऱ्या जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत, जिथे ते अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी गांधीनगर, बनासकांठा, जामनगर आणि दाहोद येथील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांचा तीन दिवसीय दौराही सोमवारपासून सुरू होणार आहे. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.