नवी दिल्ली – नवनवीन वस्तू खरेदी करणे, हा मानवी स्वभाव आहे. परंतु त्याचप्रमाणे जुन्या वस्तूंचा संग्रह करणे देखील अनेकांना आवडते. मग एखादा पेन असो की जुन्या काळातील मुर्ती असो. त्याचप्रमाणे जुन्या काळातील चांगल्या स्थितीतील विशेष वाहने खरेदी करण्याचा देखील अनेकांना छंद असतो, त्यांचा हा छंद पूर्ण होऊ शकतो….
कारण सन 1934 च्या कॅडिलॅक इम्पीरियल सेडानपासून ते व्हिंटेज फियाट टोपोलिनोपर्यंत अशा सुमारे 20 विंटेज कार डिसेंबरमध्ये लिलावासाठी ठेवल्या जातील. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच लिलाव असेल, असे आयोजकांनी सांगितले. आयोजकांच्या म्हणण्यानुसार सन 1971 च्या युद्धात भारताच्या विजयाच्या 50 वर्षांच्या स्मरणार्थ देश यावर्षी सुवर्ण विजय वर्ष साजरे करण्यात येत आहे, सदर लिलाव देखील याप्रसंगाची स्मृती जतन करेल. भारतीय लष्कराच्या मालकीची एक विंटेज महिंद्रा जीप CJ-3B ही पूर्वी वापरण्यात आली होती. त्याचाही लिलाव होणार आहे.
आयोजकांनी सांगितले की, या कारच्या विक्रीतून मिळालेली रक्कम सैन्यातील कल्याण गटाला प्रदान केली जाईल. या कारचा लिलाव डिसेंबरमध्ये होणार असून तो ऑनलाइन केला जाणार आहे. तसेच प्रख्यात चित्रपट निर्माते आणि कलाकार मुझफ्फर अली यांची 16 चित्रे, त्यांच्या विंटेज कारच्या बालपणीच्या अनुभवांनी प्रेरित असून संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आली होती. ही चित्रे देखील डिसेंबरमध्ये होणाऱ्या लिलावाचा भाग असतील.
मुझफ्फर अली म्हणाले की, कारच्या बाबतीत भारतातील नागरिकांमध्ये इतकी आश्चर्यकारक आवड पाहणे खूप चांगले आहे. तेव्हा मी जुन्या गाड्यांमध्ये खेळायचो तेव्हाच्या माझ्या बालपणातील अनुभवांवरून वर्षानुवर्षे चित्रे काढली आहेत. अशा गाड्या घेणे हे अनेकांसाठी स्वप्नवत असते. विशेष म्हणजे या लिलावापूर्वी गाड्या दाखवण्यासाठीच्या प्रदर्शनाचे मारवाड-जोधपूरचे महाराजा गजसिंग हे प्रमुख पाहुणे होते. तसेच अभिनेत्री गुल पनाग, काही परदेशातील राजदूत आणि विविध विंटेज ऑटोमोबाईल संग्राहक देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी प्रतिष्ठित हेरिटेज मोटरिंग क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष केटीएस तुलसी यांच्या हस्ते महाराजा गजसिंग आणि पनाग यांना मानद आजीवन सदस्यत्व प्रदान करण्यात आले. पूर्वावलोकनासाठी प्रदर्शित करण्यात आलेल्या नऊ व्हिंटेज कारमध्ये 1934 कॅडिलॅक 355 D7 पॅसेंजर इम्पीरियल सेडान आणि 1924 ऑस्टिन 7 यांचा समावेश आहे, तिला बेबी ऑस्टिन म्हणून ओळखले जाते, आतापर्यंतच्या सर्वात लहान कारपैकी ती एक होती.