इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एका हॅाटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला होता. त्यात ५ कोटी रुपये घेऊन आल्याचे सांगण्यात आले होते.. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. त्यावरुन आता विनोद तावडे यांनी खोटं पसरवणं हेच काँग्रेसचं काम असल्याचे सांगत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांना बदनामीची नोटीस पाठवली आहे. कारण त्यांनी या प्रकरणात खोटेपणा पसरवून माझी आणि भारतीय जनता पक्षाची प्रतिमा खराब केल्याचे म्हटले आहे.
निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या तपासा दरम्यान ५ कोटी रुपयांची कथित रक्कम वसूल झाली नाही, हे सत्य सर्वांसमोर आहे. ही बाब काँग्रेसच्या खालच्या पातळीवरील राजकारणाचा पुरावा असल्याचेही तावडे यांनी सांगितले.
अगोदर केला होता हा खुलासा
वाडा येथून मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली. हितेंद्र ठाकूर व आ. क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. राहुल गांधी व सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी असेही तावडे यांनी सांगितले होते.
https://twitter.com/TawdeVinod/status/1859903197235527795