येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वेगाने सुरु असलेल्या वाहनांना अचानक थांबण्याची विनंती मंत्री छगन भुजबळ करतात. सारेच अचंबित होतात. भुजबळ स्वत: कार बाहेर पडतात. त्यापाठोपाठ ताफ्यातील सर्व वाहनातील कर्मचारी उतरले आणि भुजबळ यांच्या दिशेने धावले. रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल संतोषच्या बाहेरील खुर्चीवर मंत्री भुजबळ बसले आणि त्यांनी थेट नाश्त्याची ऑर्डर दिली. हे पाहून सारेच थक्क झाले.
येवला येथील प्रचार रॅली आटोपून भुजबळ हे आज दुपारी विंचूर गावातील प्रचार रॅली साठी निघाले. त्यावेळी अचानक त्यांनी वाहन थांबवण्यास सांगितले. वाहनाच्या बाहेर पडून त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल संतोष मध्ये नाश्ता व चहाची ऑर्डर दिली. थेट मंत्री भुजबळ हे हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी ऑर्डर दिली हे पाहून मालकाला अतिशय सुखद धक्का बसला. त्याने तत्काळ ‘हो, देतो साहेब’, असे म्हणत वडापाव बनवण्यासाठी लगबग सुरु केली.
मंत्र्यांचा ताफा रस्त्याच्या कडेला थांबलेला पाहून रस्त्यावरून जाणारेही आश्चर्यचकित झाले. त्यांनीही हॉटेल परिसरात गर्दी केली. तेवढ्यात गरमागरम वडापाव आले. भुजबळ यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी नाश्ता आणि चहा यावर ताव मारला. प्रचाराच्या धावपळीत मंत्र्यांसह त्यांच्या कर्मचाऱ्यांची जेवण आणि नाश्त्याची वेळ चुकते आहे. मात्र या अनोख्या प्रसंगाने साऱ्यांच्याच चेहऱ्यावर समाधान दिसत होते. त्यानंतर ताफा विंचूर गावाकडे रवाना झाला.