अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शेतकरी तसेच लोकहिताच्या मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नाही, निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही, आता तरी शासनाला जाग येईल व शेतक-यांचे प्रश्न सुटतील म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज स्वारिपचे तालुका अध्यक्ष अनकुटे, सवरखेडे सोसायटीच्या चेअरमन महेंद्रभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर पक्षाच्या वतीने जाहीर निदर्शने करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजनेची अंमल बजावणी त्वरित करण्यात यावी, नवीन केशरी रेशन कार्ड धारकांना अल्पदरात धान्य वाटप करण्यात यावे, त्याचप्रमाणे कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना का पेन्शन योजना चालु करावी, कांदा निर्यात खुली करा, पीक कर्ज तात्काळ देण्यात यावे पंतप्रधान घरकुल योजनेसाठी जाचक अटी रद्द करण्यात याव्यात शेतक-यांना जिल्हा बँकेकडून तात्काळ कर्ज उपलब्ध करून दयावे या प्रमुख मागण्या संदर्भात आंदोलन करण्यात आले. यावेळी महेंद्र पगारे यांनी आपल्या भाषणात विविध मागण्या सांगितल्या. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व महिला कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.