अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड – शिर्डी या महत्वाचा राज्य महामार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच अवजड वाहतूक सुरू असते. येवला शहरात दर मंगळवारी आठवडे बाजार भरत असल्याने अनेक व्यवसायिक या महामार्गाच्या कडेला दुकाने थाटत असल्याने विंचूर चौफुलीवर प्रचंड प्रमाणात रहदारीचा खोळंबा होतो. त्यामुळे मंगळवारीच नाही तर अन्य दिवशी अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते. आज मात्र वाहतुकीची प्रचंड मोठी कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांची मात्र दमछाक झाली. येथील रस्त्यावर भरणारा बाजार इतरत्र हलवावा यासाठी नागरिकांनी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पालिकेला अनेक वेळा निवेदन दिले. मात्र पालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही. परिणामी वाहतुकीची कोंडी नेहमीची बाब झाली आहे. पालिका प्रशासन याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. प्रशासनाने वाहतूक कोंडी बरोबरच रस्त्यावर बसणाऱ्या व्यवसायिकांना बाजार स्थळावर बसविल्यास वाहतूक कोंडी होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जाते.