नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मान्सूनपुर्व काळात संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेता जिल्हा परिषदेने तालुका व गावनिहाय आपत्ती व्यवस्थापनचा आराखडा सादर करून पूरप्रमाणित कार्यपद्धती तयार करावी. तसेच गाव पातळीवर संदेश पोहचविण्यासाठी सरपंच, पंचायत समिती सदस्य, पोलिस पाटील, ग्रामसेवक यांचा व्हॉटस्अपच्या माध्यमातून ग्रुप तयार करावा. अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने जिल्हा परिषद यंत्रणेला दिल्या आहेत.
जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने कळविल्यानुसार, तालुका व गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करतांना सक्षम नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आदी माहिती तयार करावी. पर्यटन स्थळे, धोकेदायक व जोखीमेचे ठिकाणे निश्चित करून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या नोंदी ठेवून कायदा व सुव्यवस्थेसाठी लक्ष आराखडा तयार करण्यात यावा. मान्सून काळात शालेय बस वाहतूक सुस्थितीत सुरु असल्याबाबतची खात्री करावी. हवामान विभागाकडून व जिल्हा नियंत्रण कक्षाकडून वेळोवेळी प्राप्त होणारे संदेश तात्काळ या ग्रुपच्या माध्यमातून माहितीसाठी व पुढील उपाय योजनांकरीता पोहचविण्यात यावेत, असे जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणामार्फत जिल्हा परिषद यंत्रणेला कळविले आले आहे.
नदीकाठच्या गावांची यादी तयार करून गावनिहाय आराखडा तयार करावा. पूरप्रवण क्षेत्रातील ठिकाण निश्चित करून त्याठिकाणी किती कुटुंब राहतात यांची संख्या निश्चित करावी. नदीप्रवाहात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेवून नदी काठावरील अतिक्रमणे काढून घेण्यात यावीत. गावपातळीवर निवाऱ्याची ठिकाणे, दवाखाने, पोहणारे, शोध व बचाव साहित्य, बोटस् आदींची व्यवस्था करण्याबरोबरच पाझर तलावांना तडे गेले किंवा गळती सुरू झाल्यास त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यासाठी वेळीच नियोजन करण्यात यावेत, असेही जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणामार्फत जिल्हा परिषद यंत्रणेला कळविले आले आहे.
मान्सूनमध्ये कोविड-19 च्या अनुषंगाने काळजी घेण्यासाठी पूरेशा प्रमाणात ऑक्सिजन व औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा. याबरोबरच कोविड सेंटर व रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ, रुग्ण व शव वाहिका उपलब्ध करून ठेवण्यात यावेत. या काळात लसीकरण मोहिमेवर परिणाम होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात यावी. अतिवृष्टी व चक्री वादळामुळे कोविड सेंटर व हॉस्पिटल मधील रुग्णांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास त्यासाठी पर्यायी व्यवस्थेचे नियोजन करावे. स्थलांतरीत केलेल्या इमारतीमध्ये ऑक्सिजन व्यवस्थेसोबतच बॅटरी बॅकअप, पर्यायी विद्युत व्यवस्था करण्यात यावी. अतिवृष्टीमुळे मुळे रुग्ण सेवेवर कोणताही विपरित परिणाम होवू नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने जिल्हा परिषद यंत्रणेला दिल्या आहेत.
मान्सूनकाळात नुकसान झाल्यास पंचनामे करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच मृतांच्या वारसांना व जखमींना नियमानुसार तात्काळ योग्य ती मदत उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. याचबरोबर विविध क्षेत्रात मदत करणाऱ्या सेवाभावी संस्थांची यादी तयार करून निवारा स्थळे व स्वयंसेवक, बचाव पथके यांची एकत्रित यादी तयार करावी. आपत्ती नियंत्रण कक्षात महत्वाचे दूरध्वनी क्रमांक, फॅक्स, इंटरनेट, प्रिंटर्स, संगणक, व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा, जीव रक्षकांची यादी, पोहणारे, गिर्यारोहक, पक्षी मित्र, सर्प मित्र यांची यादी त्याचप्रमाणे आपत्ती प्रवण क्षेत्राचा नकाशा आणि संदेश नोंद वही इत्यादींची व्यवस्था करून ठेवण्याबाबतच्या सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने जिल्हा परिषदेला दिल्या आहेत.