इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या परंपरा दिसून येतात, समाजामध्ये वावरताना जावयांना मानाचे स्थान असते, तसेच जावयांना दहावा ग्रह असे म्हटले जाते. मात्र अनेक ठिकाणी जावयांचा खूप मानपान होतो, परंतु उत्तर प्रदेशात एक आगळे वेगळे गाव आहे, येथे बहुतांश जावयांचीच संख्या जास्त दिसते. कानपूर जिल्ह्यातील अकबरपूर तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावर दमादनपुरवा हे गाव आहे.
येथील स्थानिकांच्या मते, या गावात सर्वाधिक घरे ही जावयांचीच आहेत. गावात जवळपास 70 घरं असून त्यापैकी 40 घरं जावयांची आहेत. योगा-योगाने हळू हळू एक-एक असे जावई येथे येऊन राहू लागले. त्यामुळे आजूबाजूच्या गावांतील या वसतीचे नाव दमादनपुरवा असं ठेवलेले आहे. अखेर सरकारी दस्तावेजांमध्येही हा बदल झाला. सरियापूर गावाच्या अंतर्गत हे गाव येते. गावाचा इतिहास पाहिला तर 1970 च्या मधील एक कथा सांगितली जाते.
सरियापूर गावातल्या महिलेच्या लग्नानंतर खरं तर हे गाव वसण्यास सुरुवात झाली, असं मानलं जातं. आता ती महिला या जगात नसली तरीही गावाचा इतिहास सांगताना येथील वृद्ध नागरिक तिची आठवण आवर्जून काढतात. तसेच गावातील वृद्ध सांगतात की, सन 1970 मध्ये सरियापूर गावातील राजरानी यांचे लग्न जगम्मनपूर गावातील सावरे कठेरिया यांच्याशी झाले. सांवरे हे सासुरवाडीला राहू लागले. गावातील त्यांचे घर लहान पडू लागले. त्यानंतर त्यांना गावाबाहेर जमीन देण्यात आली. आता हे दोघेही लेक-जावई या जगात नाहीत. पण या जमिनीवर आजू-बाजूला घरं वसू लागली आणि तिथेही जास्तीत असेच जण येऊ लागले.
2005 मध्ये येथील जावयांची घरं 40 पर्यंत पोहोचली. त्यामुळे स्थानिकांनी गावाचं नाव दमादनपुरवा असं ठेवलं. तोपर्यंत हे नाव केवळ तोंडीच होतं. दोन वर्षांनी येथे शाळा उघडली. शाळेच्या दाखल्यावर मात्र दमादनपुरवा हे नाव नोंदवण्यात आलं. एकिकडे जावयांची परंपरा चालत राहिली तर दुसरीकडे गावाचं नावही अधिक ठळक होत गेलं. उत्तर प्रदेशातील गाव दमादनपुरवा गावातील ज्येष्ठ व्यक्ती रामप्रसाद यांचे वय 78 वर्षे आहे.
रामप्रसाद हे 45 वर्षांपूर्वी सासुरवाडीला येऊन राहू लागले. सर्वात नवे जावई म्हणजे अवधेश हे नुकतेच पत्नी शशीसोबत येथे वास्तव्यास आले आहेत. आता तर तिसऱ्या पिढीतील जावईदेखील येथे आले आहेत. सध्या दमादनपुरवा गावाची लोकसंख्या 500 आहे तर मतदार संख्या 270असून अनेक बाहेर गावची मंडळी या गावाचं नाव वाचून हसतात किंवा आश्चर्य व्यक्त करतात पण इथल्या लोकांना यात फारसं नवल वाटत नाही. आता तर पोस्टाच्या पत्त्यावरही हेच नाव नोंदवण्यात येत आहे.
Village of Son in Law Interesting Story Name Change of Village
Uttar Pradesh Damadanpurva Kanpur