इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारताची भूमी सांस्कृतिक विविधतेने भरलेली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी जुन्या परंपरा केवळ धार्मिक प्रथांपुरत्या मर्यादित न राहता बंधुभावाचा संदेशही देतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की असे एक गाव आहे जिथे ३ हजार लोकसंख्येमध्ये एकही मुस्लिम नाही, तरीही येथील ग्रामस्थ ५ दिवस मोहरम साजरा करतात. मोहरमचे आगमन होताच गावातील प्रत्येक गल्ली विद्युत रोषणाईने उजळून निघते. ग्रामस्थ मोहरमचा जुलूसही काढतात आणि अल्लाहची पूजाही करतात.
कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील हेरबिदानूर गावात इस्लामचे कोणतेही चिन्ह असेल तर ती गावाच्या मध्यभागी असलेली मशीद आहे. या मशिदीत फक्त एक हिंदू पुजारी राहतो आणि तो हिंदू पद्धतीने पूजा करतो. हे गाव बेळगावपासून ५१ किमी अंतरावर आहे. येथे राहणारे बहुतांश लोक कुरुबा किंवा वाल्मिकी समाजाचे आहेत.
गावातील दर्गा ‘फकीरेश्वर स्वामींची मशीद’ म्हणूनही ओळखला जातो. ग्रामस्थ आपल्या इच्छेने येथे येतात आणि नवस करतात. येथील आमदार महांतेश कौजलागी यांनी मशिदीच्या नूतनीकरणासाठी नुकतेच आठ लाख रुपये मंजूर केले आहेत. मशिदीचे पुजारी यलप्पा नायकर म्हणाले, “आम्ही मोहरमच्या निमित्ताने जवळच्या गावातील मौलवीला बोलावतो. तो येथे आठवडाभर राहतो आणि इस्लामिक पद्धतीने नमाज अदा करतो. बाकीचे दिवस मशिदीच्या आतील पूजा आणि देखभालीची जबाबदारी माझ्यावर आहे.
त्यांनी सांगितले, दोन मुस्लिम बांधवांनी ही मशीद बांधली होती. त्यांच्या मृत्यूनंतर येथील लोकांनी मशिदीमध्ये पूजा करण्यास सुरुवात केली आणि दरवर्षी मोहरम साजरा करण्यास सुरुवात केली. गावातील शिक्षक उमेश्वर मरगळ यांनी सांगितले की, या पाच दिवसांत गावात अनेक प्रकारच्या परंपरा आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. येथे दूरदूरवरून कलाकार येतात आणि आपल्या कलेचे प्रदर्शन करतात. मिरवणूक काढली जाते आणि या वेळी करबल नृत्य देखील होते. दोरीवर चालणे आणि आगीवर चालण्याचा कार्यक्रमही आहे. या निमित्ताने गावातील ज्येष्ठांना प्रथम पूजा करण्याची संधी दिली जाते. उमेश्वर म्हणाले, लहानपणापासून दोन धर्मांचा हा संगम मी पाहत आलो आहे. त्यानंतर कोणताही बदल झालेला नाही.
Village Celebrate Muharram but not Single Muslim in Village
Karnataka Belgavi