चंदीगड – मोगा जिल्ह्यातील साफूवाला हे गाव संपूर्ण लसीकरण करणारे पंजाबमधील पहिले गाव ठरले आहे. या गावातील सर्व लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. आजूबाजूच्या गावांमधील लोकांनाही लस घेण्यासाठी ते प्रेरीत करत आहेत. आरोग्य विभागाकडून सरकारला दिलेल्या अहवालानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी साफूवाला गावातील नागरिकांचे कौतुक केले असून, ग्रामपंचायतीला विशेष दर्जा देण्याची घोषणा केली आहे.
देशभरातील लोकांनी कोविड लसीकरणाची गंभीरतेने दखल घेतलेली आहे. परंतु यात मोगा जिल्ह्यातील साफूवाला गावाने बाजी मारली आहे. शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणारे ते पंजाबमधील एकमेव गाव आहे. या यशासाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट करून गावाचे कौतुक केले आहे. सरकारकडून ग्रामपंचायतीचा योग्य सन्मान केला जाणार आहे. बक्षीस म्हणून ग्रामपंचायतीला विशेष निधी दिला जाणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यभरात कोरोना लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे. ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना मोफत लस दिली जात आहे. कोविड लसीसंदर्भात अनेक गैरसमज असून, अफवाही पसरविल्या जात आहेत. तरीही १०० टक्के लसीकरण करून साफूवाला गावाने लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
उपायुक्त संदीप हंस यांनी पत्र लिहून साफूवाला गावाचे सरपंच लखवंत सिंग आणि ग्रामपंचायतीचे कौतुक केले. गावाचा आदर्श घेत इतर गावांनीही कोविड लसीकरणाची मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले. या मोहिमेला यशस्वी करणार्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा सरकारकडून सन्मान केला जाईल, असेही ते म्हणाले.