शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत करावे. प्रशासकीय कारणांमुळे प्रलंबित असलेल्या रस्त्यांबाबत पाणी ओसरल्यानंतर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.
पालकमंत्री विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी राहाता तालुक्यातील पिंप्रिनिर्मळ, अस्तगाव, एकरूखे, चितळी व पिंपळवाडी या गावांना भेटी देऊन पूरग्रस्त शेतीपिकांची तसेच वाड्या-वस्त्यांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली. महापूरामुळे बहुतेक रस्ते वाहून गेले असून काही ठिकाणी पाण्यामुळे ग्रामस्थांची वाहतूक थांबून असल्याचे चित्र पाहणीदरम्यान दिसून आले.
पाणी साचलेल्या ठिकाणी नळ्यांची सोय करून द्यावी, तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना दिल्या. अनेक रस्त्यांबाबत प्रशासकीय स्तरावर प्रश्न प्रलंबित असून पाणी ओसरल्यानंतर त्यांची मोजणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शेतीपिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे करण्याची प्रक्रिया गतीमान करावी. पाऊस ओसरताच पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आदेश कृषी विभागाला देण्यात आले. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास कटिबद्ध असून नुकसानीची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात सुमारे ३ लाख शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटाचा फटका बसला असून २ लाख हेक्टर क्षेत्रातील पीक बाधित झाले आहे. ८५० महसूल मंडळांमध्ये पावसाची तीव्रता कमी-अधिक प्रमाणात होती. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात दोनदा आलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
राहाता तालुक्यात ४० हजार हेक्टर क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. प्रशासनातील सर्व विभागांच्या समन्वयाने आपत्कालीन व्यवस्थापन यशस्वीपणे राबविण्यात आले. त्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे स्थलांतर सुरक्षितपणे करता आले. एक घटना वगळता तातडीच्या उपाययोजनांमुळे जीवितहानी टाळण्यात यश आले, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी नमूद केले.
याप्रसंगी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काशीनाथ गुंजाळ तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी पाहणीसाठी केला दुचाकीचा वापर
अतिवृष्टी बाधित गावांचा दौरा करतांना काही गावांमध्ये पाण्यामुळे ओढे-नाले, शेत – शिवारात सर्वत्र पाणी व चिखल झाला आहे. अशा ठिकाणी चारचाकी गाडी पोहचणे शक्य नव्हते, अशा परिस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मिळेल त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते व पोलीस विभागाच्या दुचाकीवर प्रवास करून बाधित क्षेत्राची पाहणी केली. पालकमंत्र्यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.