इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राहुल गांधी यांनी मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकलले. सुजयच्या निवडणुकीवेळी त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहायला राहुल यांनी सांगितले. जागांची अदलाबदल करावी, असे आम्ही म्हणत होतो. नगर दक्षिणची निवडणूक सलग तीन वेळा राष्ट्रवादी हरली होती. मी शरद पवार यांना दोनदा भेटलो. ते म्हणाले, की माझे कार्यकर्ते ऐकत नाही. त्यानंतर मी राहुल यांना भेटलो. खरगेही तिथे होते. सुजय राष्ट्रवादीकडून का लढत नाहीत, असे राहुल म्हणाले. काँग्रेसचे अध्यक्षच असे बोलत असतील तर पुढे काय करायचे. मग आम्ही भाजपत प्रवेश केला, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
एका मुलाखतीत विखे पाटील म्हणाले, की राहुल यांच्या भेटीनंतर मी सुजयला फोन केला. तू देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून निर्णय घे. जिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांचे ऐकत नाही. तिथे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकिट घेऊन लढायचे, याचा अर्थ राजकीय आत्महत्या केल्यासारखे आहे, असे त्यांनी म्हटले. विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत विखे पाटील-थोरात संघर्षाला शरद पवार यांना जबाबदार धरले.
भाऊसाहेब थोरात असेपर्यंत जिल्ह्यात संघर्षाची स्थिती नव्हती. त्यानंतर राजकीय स्थित्यंतरे झाली. काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली. शरद पवार यांचा राजकीय घडामोडीत हात होता. नगर जिल्ह्यात विखे पाटील आणि थोरात यांचा संघर्ष तीव्र करण्यात शरद पवार यांचा हातभार होता. त्यामुळे हे चित्र आज पाहायला मिळते.
पहिल्यापासून आमच्या वडिलांचा आणि शरद पवार यांचा संघर्ष झाला. जिल्ह्यात जोपर्यंत राजकीय अस्थिरता निर्माण करत नाही, तोवर त्यांचेही जिल्ह्यात राजकीय गणित साध्य होणार नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना आमच्या वडिलांविरोधात भूमिका घ्यायला लावली. शरद पवारांच्या राजकारणाला बाळासाहेब बळी पडले. त्यातून संघर्ष आणखी वाढत गेला, असा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.