नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– येथील हौशी चित्रकार विजयकुमार थोरात यांचे मुंबईतील जहांगीर कलादालनात चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ३ ते ९ दरम्यान होणाऱ्या ‘कला साधना ‘ या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन कलासमीक्षक प्रा. डॉ. गजानन शेपाळ यांच्या हस्ते होणार आहे.
वायूदलात सेवा बजावलेल्या विजयकुमार थोरात यांनी आपला चित्रकलेचा छंद सातत्याने साधना करुन जोपासला. जहांगीर कलादालनात आपल्या चित्रांचे प्रदर्शन व्हावे हे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. विविध विषयांवरील व वेगवेगळ्या रंगमाध्यमातील सुमारे ५० चित्रे प्रदर्शित करण्यात येतील.
उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे ज्येष्ठ चित्रकार प्रा.मुरलीधर रोकडे, प्रा.बाळ नगरकर, प्रा.दीपक वर्मा, प्रा. योगेश जोशी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात वास्तववादी पध्दतीची चित्रे कलारसिकांना सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत विनामूल्य बघता येतील.